कोबी : वनस्पती व गड्डा.

कोबी ही औषधी वनस्पती ब्रॅसिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ब्रॅसिका ओलेरॅसिया (प्रकार कॅपिटॅटा) आहे. ही मूलत: भूमध्यसामुद्रिक प्रदेशातील असून यूरोप खंडातील इतर प्रदेशांत तिचा प्रसार झाला आहे.

कोबी ही ४०-४५ सेंमी. पर्यंत वाढते. खोड आखूड व रोमहीन असते. वनस्पतीची वाढ होत असताना तिच्या मध्यभागी चेंडूच्या आकाराचा, पानांचा गड्डा तयार होतो. यालाच कोबीचा गड्डा म्हणतात. गड्ड्यातील पाने खोडावर वाढणारी (स्तंभिक) तीन प्रकारची असतात. बाहेरील पाने आकाराने मोठी, जाड देठाची, ठळक शिरांची, गडद रंगाची आणि तरंगित कडांची असतात. मधली लांबट व अंडाकृती, तर आतील लांबट आकाराची असतात. पाने मांसल व रोमहीन असतात. कोबीच्या शेंगा चतुष्कोनी, एकबीजी असून बी गोलाकार असते.

भारतात थंड हवामानात कोबीचे पीक घेतले जाते. बियांपासून तिची लागवड करतात. पानांचा आकार, आकारमान आणि रंग, तसेच गड्ड्याचा आकार, आकारमान व रंग यांवरून कोबीचे प्रकार ठरतात. गोल्डन एकर, प्राइड ऑफ इंडिया, कोपनहेगन मार्केट, पुसा ड्रमहेड, जर्सी वेकफिल्ड अशी त्यांची नावे आहेत.

कोबीत भरपूर खनिजे तसेच  आणि  ही जीवनसत्त्वे असतात. भाजी, कोशिंबीर, सॅलड व सूप या स्वरूपात तसेच उकडून वा निर्जलीकरण करून तिचा विविध प्रकारे उपयोग करतात. गुरांच्या व कोंबड्यांच्या खाद्यातही तिचा उपयोग होतो. तिच्यामधील घटकद्रव्यांची सर्वसाधारण टक्केवारी पुढीलप्रमाणे आढळते : पाणी ९०.२, प्रथिने १.८, मेदयुक्त पदार्थ ०.१, तंतू १.०, कर्बोदके ५.८, खनिज द्रव्ये ०.३, कॅल्शियम ०.०३, फॉस्फरस ०.०५

सर्वसाधारणत: गोल व घट्ट पानांच्या कोबीच्या गड्ड्याला बाजारात जास्त मागणी असते. हल्ली निळसर गुलाबी झाक असलेला कोबीचा एक प्रकार उपलब्ध झाला आहे. या रंगामुळे तिचा उपयोग कोशिंबीर किंवा सॅलडसाठी होतो.

कोबीची पाने गोड, शीतल, मूत्रल व कृमिनाशक आहेत. पोटदुखी, हगवण, त्वचाविकार, दमा व ताप यांवर ती गुणकारी आहेत, असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो. हिरड्यांच्या रोगावर कच्ची पाने चघळणे उपयुक्त ठरते.