वारंग (किडिया कॅलिसीना) : (१) वृक्ष, (२) फुले, (३) फळे.

(किडिया कॅलिसीना). वारंग हा वृक्ष माल्व्हेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव किडिया कॅलिसीना आहे. हा लहान किंवा मध्यम आकाराचा पानझडी वृक्ष आहे. भारतात अतिपर्जन्य, तसेच कमी पावसाचा प्रदेश सोडल्यास बाकीच्या विस्तृत भूभागावरील पानझडी वनांमध्ये हा आढळतो. हा एक आकर्षक व दुर्मीळ वृक्ष असून त्याला रानभेंडी, भेंडक असेही म्हणतात.

वारंग हा वृक्ष सु. १२ मी. उंच वाढतो. त्याचे कोवळे शेंडे रोमल असतात. पाने साधी, एकाआड एक, गोलसर, खंडयुक्त व हृदयाकार असून वरच्या बाजूस हस्ताकृती शिरा स्पष्ट दिसतात. पानांची खालची बाजू लवदार असते. हिवाळ्याच्या अखेरीस पानगळ होते. फुले सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात येतात. फुलोरे स्तबकासारखे आणि पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकास येतात; ती लहान, नाजूक व जांभळट किंवा हिरवट पांढरी असतात. फुललेला असताना हा वृक्ष आकर्षक दिसतो. फुलाला ४–६ सहपत्रके (छदके) असतात. निदलपुंज घंटेसारखा असून फळाबरोबर वाढतो. पाकळ्या पाच असून पुंकेसर एकत्र जुळलेले असतात. अंडाशयात तीन कप्पे असतात; कुक्षिवृंत (किंजले) तीन व कुक्षी छत्राकृती असते. फळे (बोंडे) लहान, वाटाण्यासारखी, गोलसर व लवदार असतात. बोंड तडकून तीन शकले होतात आणि बिया बाहेर पडतात. बिया गर्द पिंगट व वृक्काच्या आकाराची (घेवड्यासारखी) असून रेषांकित असतात.

वारंगाचे लाकूड करड्या रंगाचे असते. ते मध्यम प्रतीचे असून फारसे टिकाऊ नसते. त्याचा उपयोग झोपड्या, शेतीची अवजारे, तसबिरींच्या चौकटी, प्लायवुड, कागदाचा लगदा, काड्यापेट्या इत्यादी करण्यासाठी होतो. खोडात व फांद्यात असलेला चिकट द्रव उसाच्या रसातील मळी वेगळी करण्यासाठी वापरला जातो. हा वृक्ष रस्त्याच्या कडेने सावलीसाठी, उद्यानात शोभेसाठी तसेच वनीकरणासाठी व वनशेतीसाठी उपयुक्त आहे.