विद्युत् ऊर्जा ही रोहित्रे व तारांचे जाळे इत्यादी घटकांमार्फत ग्राहकांना पुरविली जाते. सर्वच ग्राहकांची अशी अपेक्षा असते की, त्यांना मिळणाऱ्या ऊर्जेचा विद्युत् दाब (voltage) पूर्णपणे स्थिर (constant) असावा. या विद्युत् दाबाच्या ठराविक मूल्यामध्ये कमी किंवा जास्त असे बदल होत राहिले तर ग्राहकाने जोडलेल्या साहित्यास किंवा उपकरणास धोका पोहोचण्याची शक्यता असते. अशा कमी-जास्त होणात्या दाबामुळे जोडलेली उपकरणे नीट तऱ्हेने काम करत नाहीत किंवा ती उपकरणे पूर्णपणे निकामी होऊ शकतात.
ग्राहकांच्या इच्छेनुसार विद्युत् दाब पूर्णपणे स्थिर ठेवणे शक्य होतेच असे नाही, कारण विद्युत् दाब स्थिर ठेवणे हे एक अवघड काम आहे. म्हणून विद्युत् दाबाचे मूल्य ठराविक सीमेच्या बाहेर जाणार नाही, याची खात्री ग्राहकास द्यावी लागते. सर्वसाधारणपणे सरकारी नियमांनुसार ग्राहकास दिलेल्या विद्युत् दाबाचे मूल्य जास्त होण्याची शक्यता कमी असते. ते कमी होण्याचीच शक्यता जास्त असते. विद्युत् दाब कमी होण्याची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात.
विद्युत् जनित्रे, विद्युत् रोहित्रे, प्रेषण तारा (Transmission lines), वितरण, उपवितरण तारा (Distributors and Feeders) इत्यादी घटकांमध्ये तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारा असतात. काही ठिकाणी या तारा चुंबकीय गाभ्यावर (magnetic core) गुंडाळलेल्या असतात. अशा तारांना विद्युत् प्रवाहास विरोध करण्याचा गुणधर्म असतो. या गुणधर्मास संरोध (impedance) असे संबोधिले जाते. या विरोध करण्याच्या गुणधर्मामुळे, ग्राहकास मिळणाऱ्या विद्युत् दाबामध्ये क्षय (loss) होतो.
ग्राहकास समाधानकारक विद्युत् दाब मिळावा यासाठी या क्षयावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते व यासाठी खालील पद्धती वापरल्या जातात.
- ग्राहकास मिळणारा विद्युत् दाब जर कमी असेल तर जनित्राच्या उद्दीपन मंडलातील (excitation circuit) विद्युत् प्रवाह वाढविला जातो. त्यामुळे जनित्राने निर्माण केलेल्या विद्युत् दाबामध्ये वाढ होते व ग्राहकास समाधानकारक विद्युत् दाब मिळतो.
- रोहित्रामध्ये प्राथमिक व द्वितीयक अशा दोन गुंडाळ्या असतात (Primary and Secondary windings). द्वितीयक गुंडाळीमध्ये वेढ्यांची संख्या (number of turns of secondary winding) कमी-जास्त करता येईल अशी योजना केलेली असते. ग्राहकास मिळणारा विद्युत् दाब कमी असल्यास द्वितीयक गुंडाळीच्या वेढ्यांची संख्या वाढविली जाते. यामुळे रोहित्रापासून मिळणारा विद्युत् दाब वाढतो व ग्राहकास समाधानकारक विद्युत् दाब मिळतो.
संदर्भ :
- Chand, S.; Mehta, V.K. & Co. Principles of Power Systems, New Delhi.
- Wadhwa, C.L. Electrical Power Systemis, New Age International Publishers, New Delhi.
समीक्षक – उज्ज्वला माटे