आडत हा वित्तपुरवठा करण्याचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये व्यवसाय आपले प्राप्य लेखे किंवा बीजके (Invoice) एका तिसऱ्या पक्षास विकून आपली अल्पकालीन रोखीची गरज भागवितो. या व्यवहारात आडत्या बीजकाची देय रक्कम आपली कसर कापून देतो. वेस्ट लेक यांच्या मते, ‘आडत ही अनुत्पादक संपत्तीचे उत्पादक संपत्तीत रूपांतर करण्याची एक पद्धत आहे. ज्यामध्ये एका कंपनीची प्राप्ये विकली जातात व ती कंपनी नंतर वसूलीचे व्यवस्थापन करतेʼ. प्राप्य संपत्तीची वसुली व व्यवस्था पाहणाऱ्या कंपनीला आपले प्राप्य विकून अनुत्पादक संपत्तीचे उत्पादक संपत्तीत म्हणजे रोखीत रूपांतर करण्याची पद्धती म्हणजे आडत.

इतिहास : आडतीचा इतिहास विदेशी व्यापाराच्या वित्त पुरवठ्याशी निगडित आहे. प्राचीन मेसोपोटेमिया संस्कृतीत आडतीचा उगम सापडतो. इंग्लंडमध्ये इसवी सन १४०० पूर्वी व्यवसायिक जीवनाचे वास्तव म्हणून आडतीचा वावर आढळला. त्यानंतर इसवी सन १६२० पासून तो अमेरिकेत अस्तित्वात आला. १६९६ मध्ये आडत्याच्या मक्तेदारीवर नियंत्रण ठेवण्याकरिता सर्वप्रथम इंग्लंडमध्ये कायदा करण्यात आला. विसाव्या शतकापर्यंत अमेरिकेमध्ये ‘वस्त्रोद्योगाला वित्त पुरवठा करणारी संस्थाʼ ऐवढेच आडतीचे मर्यादित स्वरूप होते. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात मात्र, नवीन तंत्रज्ञानांच्या वापरातून विकास साधणाऱ्या उद्योगांची गरज म्हणून आडतीकडे बघितले जावू लागले.

आडत व्यवहारात साधारणत: तीन पक्ष गुंतलेले असतात.

 • कंपनी अथवा व्यवसाय : यामधून ऋणको तयार होतात.
 • ऋणको.
 • आडत्या : जो प्राप्यांची खरेदी करून व्यवसायाला रोख रक्कम पुरवितो व वसुलीची जबाबदारी स्विकारतो. या कामगिरीबद्दल आडत्याला प्राप्याच्या मूल्याचा काही भाग कसर (Commission) म्हणून प्राप्त होतो.

आडत व विपत्रांची वटावणी करून निधी प्राप्त करणे आणि त्यांच्यातील फरक समजावून घेणे गरजेचे आहे. विपत्र वटविणे हा कर्ज देण्याचा प्रकार आहे, तर आडत व्यवहार हा प्राप्ये खरेदी करण्याचा व्यवहार आहे. आडत व्यवहारात पैसा पुरविण्याबरोबरच प्रामुख्याने कर्जाची वसुली व व्यवस्थापन आणि इतर सेवा यांची जबाबदारी घेतली जाते. आडत व्यवहार हा अधिसूचित करून अथवा अधिसूचित न करताही करता येतो. पहिल्या प्रकारात ऋणकोंना अडत्याचे नाव जाहीर करून वसुलीचे अधिकार दिले जातात, तर दुसऱ्या प्रकारात आडत्याचे नाव गुप्त ठेवले जाते व वसुली कंपनीच्या नावानेच आडत्या वसुली करीत असतो. त्याचप्रमाणे आधाररहीत आडत आणि साधार आडत हे आडतीचे आणखी दोन प्रकार आहेत. आधाररहीत आडत पद्धतीमध्ये आडत्या खरेदी केलेल्या कर्जाची पूर्ण जोखीम स्वीकारतो. या पद्धतीत ग्राहकांना आपल्या कर्जाचा भरणा आडत्याकडे करावा लागतो. आडत्या विक्रीखाते आणि लेखे सांभाळतो. प्रतिग्राहक कर्जाची मोठी रक्कम, ग्राहकांची मोठी संख्या व अशीलाला १०० टक्के सुरक्षितता इत्यादी या पद्धतीत असल्यामुळे ही पद्धत फायद्याची ठरते. साधार आडत या पद्धतीत अशीलाला बुडीत कर्जाच्या बाबतीत १०० टक्के संरक्षण नसते. आडत्या अशीलाला अग्रीम रक्कम देतो; परंतु ग्राहकाचे पूर्ण कर्ज फेड केली नसेल, तर अशीलाला घेतलेली रक्कम परत करावी लागते.

संगणकाच्या वापरामुळे लेखांकनाचा भार खूपच कमी झाला. कर्जदाराची माहिती गोळा करणे व साठविणे सोपे झाले. त्यामुळे पत लायकी तपासण्याचे काम सोपे झाले. आंतरजाल (Internet) व मृदू सामग्रीमुळे (Software) माहितीवर प्रक्रिया करणे सुलभ झाले. परिणामी परिव्यय कमी झाला. या सर्वांचा परिणाम आडत्यांना मोठ्या आकाराचे फायदे मिळविणे शक्य झाले. आज आडत हा एक विशेषीकृत व्यवसाय बनला आहे. पूर्वीचा व्यक्तिगत संबंधावर आधारित व्यवसाय आता जागतिकीकरणाच्या युगात उद्योगांना साह्यभूत असा मोठा व्यवसाय बनला आहे.

प्रकार :

 • अगाऊ दलाली : आडत्या बिलाच्या मुदतपूर्तीपूर्वी एकूण वसुल रकमेपैकी ७० ते ८० टक्के रक्कम विक्रेत्याला देतो. मुदतपूर्तीनंतर ग्राहकाकडून उधारी रक्कम वसुल करून आपली दलाली वजा करतो आणि बाकीची रक्कम उद्योजकाला देतो.
 • मुदतपूर्ती दलाली : सुरुवातीला अडत्याकडून विक्रेत्याला एकही पैसा दिला जात नाही. मुदतपूर्तीनंतर ग्राहकाकडून उधारी रक्कम वसुल केली जाते आणि आपली दलाली वजा करून बाकी रक्कम विक्रेत्याला दिली जाते.
 • विना आश्रय आडत : ग्राहकाने मुदतपूर्तीनंतर जर उधारी रक्कम दिली नाही, तर आडत्याला जी जोखीम स्वीकारावी लागते, त्याला विना आश्रय आडत म्हणतात. यामध्ये विक्रेता वसुलीच्या जोखमीतून होतो, तर वसुली अभावी आडत्या नुकसान सहन करतो.

कार्ये : प्राप्याची खरेदी या मूलभूत कार्याबरोबरच आडत्या आपल्या अशीलाला पुढील महत्त्वाच्या सेवा पुरवितो.

 • प्राप्यांच्या तारणावर वित्तीय मदत देणे.
 • विक्री खातेवही सांभाळणे.
 • प्राप्यांची वसूली करणे.
 • बुडित कर्जापासून संरक्षण करणे. अमेरिकेसारख्या प्रगत देशात या सेवांव्यतिरिक्त इतर अनेक सेवा आडत्याकडून पुरविल्या जातात. उदा., वित्तीय सल्ला, पतविषयक माहिती देणे इत्यादी.

आडत हा वित्तपुरवठ्याचा स्वस्त मार्ग नाही, तरीसुद्धा इतर ठिकाणांहून कर्जाऊ रक्कम घेण्यापेक्षा कंपनीचा ओढा आडत्याकडेच असतो; कारण आडत्यामार्फत कंपनीला इतर सेवा व संरक्षण दिले जाते. आडत्याकडून केवळ सुरुवातीला वित्तपुरवठा मिळत नाही, तर अशीलाली गरजेप्रमाणे वेळोवेळी मदत करण्याची आडत्याची आणखी तयारी असते. तसेच अशीलाला नवीन संयत्रांची खरेदी करण्यासाठीसुद्धा आडत्या वित्तपुरवठा करू शकतो. साधारणत: अशीलाला द्यावयाची अग्रीम रक्कम पुढील सूत्राने ठरविली जाते.

आडत केलेल्या प्राप्याची रक्कम – आडत्याचे कमिशन + अग्रीमावरील व्याज + बुडित कर्जावरील संचितीची रक्कम

आडत व्यवसाय प्रामुख्याने वस्त्रोद्योग क्षेत्रात केंद्रित असला, तरी अलिकडच्या काळात पादत्राणे, फर्निचर, कठीण लोखंडी वस्तू, इतर औद्योगिक उत्पादने, व्यापार क्षेत्रे व आडत व्यवसायातील नवनवीन क्षेत्रे विस्तारित होत आहे.

फायदे :

 • आडतमुळे व्यवसायाची रोख रक्कम बाळगण्याची गरज कमी होते.
 • रोख कमी ठेवल्यामुळे व्यवसायाच्या वृद्धीसाठी अधिक गुंतवणूक करून अधिक नफा मिळविणे शक्य होते.
 • ग्राहकांच्या उधारीचे हिशेब ठेवणे, वसुलीकरिता तगादा लावणे, त्याकरिता खर्च करणे, वसुली वेळी सुट देणे, वसुली न झाल्यास नुकसान सहन करणे इत्यादी बाबी आडत्याकडे जात असल्याने कर्जवसुली व कर्ज व्यवस्थापनाचा भार कमी होतो आणि व्यवसायधारक शांतपणे व्यवसाय करू शकतो.
 • नवीन लघुद्योगांना भांडवल उभारणीकरिता शेअर्स/कर्ज इत्यादी मार्ग चोखाळणे अवघड व खर्चिक असतात. खेळत्या भांडवलाच्या उभारणीकरिता आडत हा तुलनेने सोपा मार्ग आहे.
 • आडतमुळे मोठ्या उद्योगांनासुद्धा आपल्या ताळेबंदात येणी दाखविण्याऐवजी रोख शिल्लक दाखविणे शक्य होते.
 • उधारीचा कालावधी वेगवेगळा असला, तरी आडतमुळे उधारी त्वरीत वसुल होते.

मर्यादा : आडतीमुळे व्यवसायाला वित्तीय मदत व इतर सेवा मिळत असल्या, तरी त्यावर काही मर्यादा आहेत.

 • इतर वित्त पुरवठ्याच्या तुलनेत आडत्याचे कमिशन जास्त असल्यामुळे आडत हा वित्त पुरवठ्याचा मार्ग थोडा खर्चीक आहे.
 • आडत फक्त संस्थानाच मदत करतो.
 • व्यावसायिक हा ग्राहकाला आपला माल उधारीने दिल्यानंतर वसुली वेळी तो जर बीलाची रक्कम देण्यास टाळत असेल, तर होणारे नुकसान आडत्याला सहन करावे लागते.
 • कर आकारणी व कायदापूर्ती जोखीम इत्यादी.

उद्योजकांना वसुली जोखीम कमी करून कर्जाची वाट न स्वीकारता उत्तम रोखता व्यवस्थापनाकरिता आडत हा उत्तम पर्याय आहे.

संदर्भ :

 • गोविलकर, वि. म., अर्थजिज्ञासा, पुणे, २०१५.
 • Encyclopedia Britannica, 1975.

समीक्षक – अनिल पडोशी

This Post Has 2 Comments

 1. आनंद मुधोळकर

  मराठी भाषेत अगदी सर्व सामान्य वाचकाला समजेल अशी माहिती.

Hrutvik budrupe साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.