फुलझाडांच्या व प्रकटबीज वनस्पतींच्या अनुक्रमे फुलातील व शंकूतील असलेले परागकोश पक्व झाल्यावर त्यांतून बाहेर पडणार्या पांढरट किंवा पिवळट रंगाच्या भुकटीसारख्या सूक्ष्म कणांना पराग म्हणतात.या परागकणामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या, विशेषतः विविध प्रकारची अधिहर्षता मानवास जाणवत असते. वनस्पतींचे अनेक उपयोग सर्वज्ञात आहेत, परंतु काही व्यक्तींना वनस्पतींमुळे आरोग्याला त्रास होऊ शकतो.
सन १८७३ साली मँचेस्टरमधील हवेत परागकण असल्याचा शोध चार्ल्स ब्लाकले ( Charles Blackley) यांना लागला. साधारण त्याच सुमारास कोलकात्याच्या हवेत कनिंगहॅम यांना परागकण दिसले. निरनिराळ्या ऋतूत, वेगवेगळ्या प्रकारचे परागकण हवेत तरंगत असल्याचे त्यांच्या पाहाण्यात आले, आणि त्यांचा जवळच्या वनस्पतींना येणाऱ्या फुलांच्या बहराशी संबंध असल्याचे लक्षात आले. या जाणीवेमुळे पुढे वनस्पतिशास्त्रात वायुजीवशास्त्र या विषयाची सुरुवात झाली.
![](https://marathivishwakosh.org/wp-content/uploads/2019/08/89.jpg?x51018)
वनस्पतींच्या जाती-प्रजातींबरोबर फुले आणि परागकणनिर्मितीत मोठ्या प्रमाणावर फरक आहेत. कीटकांच्या साहाय्याने परागीकरण होणाऱ्या वनस्पतींमध्ये परागकण काहीसे मोठे आणि संख्येने कमी असतात; त्या मानाने वाऱ्याच्या मदतीने परागीकरण होणाऱ्या फुलांमध्ये परागकण सूक्ष्म, पण मोठ्या संख्येने निर्माण होतात. हिमालय पर्वतराजीत वाढणाऱ्या पाईन-जातीच्या सीड्रस वृक्षावर इतक्या मोठ्या प्रमाणावर परागकण निर्माण होतात की, झाडांवरून पिवळ्या रंगाचे ढग निघाल्यासारखे दिसते;तसेच जमिनीवर पिवळ्या रंगाचा थर जाणवतो.
हवेत परागकण दिसणे आणि त्याच परिसरातील लोकांमध्ये अस्थमा, ऱ्हायनायटीस यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होणे, यात संबंध असल्याचे जाणवले.त्याचबरोबर नाक चोंदणे, सर्दी, डोळे लाल होणे, खाज येणे, त्वचेवर पुरळ येणे यांसारख्या परागकणामुळे होणाऱ्या रोगांवर उपाय शोधण्यास सुरुवात झाली. पटेल चेस्ट इन्स्टिट्यूट, दिल्ली येथे या विषयावर बरेच संशोधन झाले आहे.
परागकणाच्या आतील भागात असलेली प्रथिने काढून अशा रुग्णांच्या कातडीखाली टोचल्यास, त्याच्या कातडीवर गांधी उठल्यास, ज्या फुलांच्या परागकणातून ते प्रथिन घेतले त्या फुलांचे परागकण आणि तो रुग्ण यांचा संबंध प्रस्थापित होतो. त्याच प्रथिनाचे डोस त्या रुग्णाला वाढत्या प्रमाणात दिल्यास त्याची प्रतिकारशक्ती वाढते. परंतु, तसे न झाल्यास फुलांचा बहर येण्याच्या ऋतूमध्ये ते क्षेत्र टाळण्याचा वैद्यकीय सल्ला त्या रुग्णास दिला जातो.
![](https://marathivishwakosh.org/wp-content/uploads/2019/08/Untitled.jpg?x51018)
आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर लावल्या जाणाऱ्या कडुलिंब (Melia azadirach), सुरु (Casuarina equisetifolia), अकॅसिया (Acacia auriculiformis), अनेक प्रकारच्या गवताच्या जाती, गाजर गवत (सूर्यफुलाच्या जातीचे तण – Parthenium hysterophorus) इत्यादी वनस्पतींच्या परागकणांमुळे कित्येक लोकांना अधिहर्षतेचा त्रास होतो असे आढळून आले आहे. म्हणून घराजवळ आणि रस्त्याच्या बाजूला झाडे लावताना त्यासंदर्भात काळजी घेणे जरुरीचे आहे.
ठरावीक ऋतूत झाडांना फुलांचा बहर येणे आणि त्याच वेळी हवेत परागकण पसरणे, या घटनाक्रमाच्या दिनदर्शिका (Pollen Calender) तयार केल्या आहेत त्याचा उपयोग पराग अधिहर्षताग्रस्त रुग्णांना काही क्षेत्रे टाळण्यासाठी होऊ शकतो.
संदर्भ :
- F.C.Meier, Aerobiology, 1930.
समीक्षक – शरद चाफेकर