पर्यावरण व त्यातील घटक, त्यांच्या समस्या इत्यादीविषयी समाजजागृतीसाठीचे शिक्षण म्हणजे पर्यावरण शिक्षण होय. पर्यावरण शिक्षण या संकल्पनेचा उगम सामाजिक आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय गरजांमधून झाला. पर्यावरण अभ्यास या ज्ञानशाखेचा हा नवा उपक्रम आहे. पर्यावरण संधारण हे आजच्या काळातील सर्वांत मोठे आव्हान आहे. पर्यावरणाची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे. वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण, बदललेली उपभोक्तावादाकडे झुकणारी जीवनशैली, नैसर्गिक साधनांचा मर्यादेबाहेर उपयोग व मनुष्याची बेफिकीर वृत्ती यांमुळे होणारे जल, वायू, ध्वनी, अंतराळ व भूमी इत्यादींचे प्रदूषण आणि इतर अनेक पर्यावरणीय समस्या यांनी जगभर गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे सजीवांचे व पर्यायाने मानवाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यावरणाच्या संरचनेचे, स्वरूपाचे आणि त्याच्या विविध घटकांचे ज्ञान देऊन प्रत्येक व्यक्तीस एक जागरूक व जबाबदार नागरिक बनविणे गरजेचे झाले आहे. आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक आहे, म्हणूनच शिक्षणाच्या सर्व स्तरांवर आज पर्यावरण शिक्षण दिले जात आहे.
पर्यावरण अभ्यासात मनुष्यास आणि त्याच्या परिसरास उपयुक्त ठरेल अशा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा समावेश केला जातो. मानवी जीवनाची गुणवत्ता आणि त्याचे अस्तित्व कायम राखण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना जाणीवपूर्वक राबविण्याची क्षमता नागरिकांमध्ये विद्यार्थी अवस्थेपासून निर्माण करणे, हे पर्यावरण शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
पर्यावरण शिक्षणामुळे अध्ययनकर्ता पर्यावरणाच्या क्षेत्रातील समस्या व आव्हानांचे स्वरूप समजून घेऊन त्यांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करू शकतो. तसेच पर्यावरण शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक सकारात्मक अभिवृत्तींचा, मूल्यांचा व पर्यावरण नैतिकतेचा विकास होईल व त्यांना शाश्वत विकासासाठी आवश्यक पर्यावरणसंगत कृती करण्याची अभिप्रेरणा मिळेल अशी अपेक्षा केली जाते. पर्यावरण शिक्षणात खालील घटकांवर अधिक भर दिला आहे.
(१) पर्यावरण व पर्यावरणीय आव्हाने यांविषयी संवेदनशीलता व जाणीव.
(२) पर्यावरण व पर्यावरणाची आव्हाने यांविषयीचे आकलन व ज्ञान.
(३) पर्यावरणीय गुणवत्ता टिकविण्यासाठीची मदत व त्यासंबंधीच्या वृत्तीत वाढ.
(४) पर्यावरणीय समस्या कमी करण्यासाठीचे कौशल्य.
(५) पर्यावरणीय कार्यक्रमांत उपलब्ध ज्ञानाचा वापर व सहभाग.
पर्यावरण शिक्षणाच्या व्यापक संज्ञेत पर्यावरणाविषयी लोकजागृती, लोकशिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे, छापील माहिती इत्यादींचा समावेश होतो. पर्यावरण शिक्षण हे पारंपरिक तसेच अपारंपरिक शिक्षण आहे. यात बाह्यशिक्षण व प्रायोगिक शिक्षण या पद्धतींचा उपयोग केला जातो. पर्यावरणीय घटक व समस्या याबाबतीतील आधुनिक विचारप्रणाली व कार्यक्षम दृष्टिकोन विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व घटकांत रुजविणे हे पर्यावरण शिक्षणाचे ध्येय आहे. निसर्गाविषयी कृतज्ञता, संसाधनांचे संधारण, शाश्वत विकास आणि परिस्थितिकीय संतुलन यांसाठी पर्यावरण शिक्षणाची नितांत गरज आहे.