शतावरी (ॲस्परॅगस रॅसिमोसस) : (१) वनस्पती, (२) मुळे, (३) फुले, (४) फळे.

(ॲस्परॅगस). एक बहुगुणी औषधी वनस्पती. शतावरी ही वनस्पती ॲस्परॅगसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ॲस्परॅगस रॅसिमोसस आहे. पूर्वी तिचा समावेश लिलिएसी कुलात केला जात असे. यूरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका या खंडांत शतावरी दिसून येते. नेपाळ, भारत, श्रीलंका या देशांमध्ये तसेच इटलीच्या पिदमाँट क्षेत्रात समुद्रसपाटीपासून १,४००–१,५०० मी. उंचीपर्यंत ही वनस्पती आढळते. भारतात हिमालयात काश्मीरपासून पूर्वेकडे, तसेच सह्याद्री-सातपुडा रांगा आणि कोकण येथे खडकाळ जमिनीवर, डोंगर उतारावर व वनातून शतावरी आढळून येते.

शतावरी बहुवर्षायू काटेरी क्षुप असून १००–१५० सेंमी. उंच वाढते. शतावरीला जमिनीवर तसेच जमिनीखाली खोड असते. जमिनीखाली वाढणाऱ्या खोडाला मूलक्षोड म्हणतात. त्यापासून मांसल मुळे निघालेली असतात. जमिनीवरील खोडावर अनेक कोनयुक्त फांद्या असतात. या फांद्या प्रकाशसंश्लेषणाचे म्हणजे पानांचे कार्य करतात. त्यांना पर्णकांडे म्हणतात. या वनस्पतीला वेगळी पाने नसतात. पर्णकांडे एकाच आकारमानाची, सुईच्या आकाराची, चमकदार हिरवी असून त्यांच्या तळाशी सरळ किंवा वाकडे लहान काटे असतात. फुले लहान, पांढरी असून त्यांवर गुलाबी छटा असतात; फुले सामान्यत: एकलिंगाश्रयी (डायएसियस) असतात म्हणजेच नर आणि मादी इंद्रिये वेगवेगळ्या वनस्पतींवर वाढतात, तर काही वेळा ती द्विलिंगी किंवा उभयलिंगी (हर्मोफ्रोडाइट) असतात. फळे मृदू, लहान, गोलाकार असून सुरुवातीला हिरवी असतात आणि पिकल्यावर नारिंगी होतात. बिया लहान, काळ्या व बुळबुळीत असतात. फुले जुलै महिन्यात, तर फळे सप्टेंबर महिन्यात येतात.

आयुर्वेद, युनानी अशा उपचारपद्धतींमध्ये तसेच ब्रिटिश औषधिकोशामध्ये शतावरीचा उल्लेख आढळतो. मुख्यत: ति‍च्या मुळांचा वापर औषधासाठी केला जातो. ती गोड, शीतल, भूकवर्धक, कामोत्तेजक असून अपचन, जठर व्रण, दुग्धस्रवण, त्वचेचे विकार इत्यादींवर वापरली जातात. शतावरी बहुपयोगी असल्याने तिला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. परंतु निर्वनीकरण तसेच विनाशी तोडणी इ. बाबींमुळे शतावरीसारख्या अनेक औषधी वनस्पती संकटात आल्या आहेत. अशा औषधी वनस्पतींचे जतन करण्यासाठी, त्यांवर संशोधन करण्यासाठी आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी भारतात हरियाणा राज्यात हिस्सार येथे सु. १२५ एकर परिसरावर औषधी उद्यान उभारले असून त्याला ‘शतावरी वाटिका औषधी उद्यान’ असे नाव दिले आहे.

ॲस्परॅगस प्रजातीत सु. ३०० जाती आहेत. ॲ. रॅसिमोसस शिवाय एक महत्त्वाची जाती म्हणजे ॲस्परॅगस ऑफिसिनॅलिस होय. ही जाती भाजी म्हणून जगात सर्वत्र खाल्ली जाते. खाण्यासाठी या वनस्पतीच्या कोवळ्या फांद्या वापरतात. फांद्या जून होऊन लाकडासारख्या कठीण झाल्या की खाण्यालायक राहत नाहीत. या भाजीमध्ये सु. ९३% पाणी असते. १०० ग्रॅ. भाजीमध्ये ४ ग्रॅ. कर्बोदके, ०.१२ ग्रॅ. मेद आणि २.२ ग्रॅ. प्रथिने असतात. तिच्यापासून ब-समूह जीवनसत्त्वे, अ, क, ई आणि के इ. जीवनसत्त्वे मिळतात. त्याचप्रमाणे कॅल्शियम, झिंक, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, तांबे यांचा ती उत्तम स्रोत आहे. आपल्या शरीराला अल्प प्रमाणात लागणारे सिलिनियम आणि क्रोमियम इ. खनिजे तिच्यात असतात. सोडियम मात्र जवळजवळ नसते. म्हणून आहारात ॲस्परॅगस ऑफिसिनॅलिस एक महत्त्वाची भाजी मानली जाते.