कोद्रा : (हरीक गु. कोद्रा क. हरका सं. कोद्रव इं. कोडो मिलेट लॅ.पॅस्पॅलम स्क्रोबिक्युलेटम कुल-ग्रॅमिनी). उष्णकटिबंधातील अनेक देशांत आढळणारे व भारतात (तमिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात व महाराष्ट्र) आणि आफ्रिकेत मुद्दाम पिकवले जाणारे हे एक वर्षायू (एक वर्ष जगणारे) खरीप गवत आहे. कमी पावसाच्या काळात ते चांगले तग धरून राहते. हलक्या जमिनीतही ते चांगले येते पण गुजरातेत ते सुपीक जमिनीत लावतात. पेरणी मुठीने बी फोकून किंवा पाभरीने पेरून करतात. जून-जुलैमध्ये हेक्टरी २०–२५ किग्रॅ. बी पेरतात. याचे ताट अर्धा ते एक मी. उंच वाढते. त्यावर १५–४५ × ०·३ ते ०·८ सेंमी. लांबी रुंदीची पाने येतात. खोडावर (ताटावर) प्रत्येकी ३–१५ सेंमी. लांबीची २–६ कणिशे व त्यांवर कणिशकांच्या दोन दोन रांगा ऑक्टोबरात येतात. पीक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तयार होते तेव्हा कापतात. मळणी बैलांच्या पायांखाली तुडवून करतात. दाणे साधारण त्रिकोनी, करडे आणि बारीक असतात. हेक्टरी ८०० ते १,००० किग्रॅ. दाणे व १,२०० ते १,५०० किग्रॅ .पेंढा ही मिळतात. दाणे ताजेपणी मादक असल्याने गरीब लोक ते चांगले धुवून सवरून खातात. दाणे ५–६ महिने साठवून ठेवल्यानंतर कांडून खातात.

कोद्राच्या बिया

महाराष्ट्रात लागवडीसाठी याची सुधारलेली जात कोद्रा २८–४ ही आहे.

रोग : (१) काजळी : हा रोगसोरोस्पोरियम पास्पलाय या कवकामुळे होतो. त्यामुळे सर्व फुलोऱ्याचे काजळीत रूपातंर होते. रोगप्रसार बीजद्वारा होत असल्याने बियांना एक टक्का पारायुक्त कवकनाशक चोळतात, (२) तांबेरा : हा रोग पक्सिनिया सबस्ट्राएटा  या कवकामुळे होतो. तो इतर तांबेऱ्याप्रमाणेच आहे. रोगामुळे फारसे नुकसान होत नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा