कोरांटी : (कळसुंदा; हिं. कटोरिया; गु. कांटा शेलिया; क. मुदरंगी, गोरांटे; सं.बोना, झिंटी, कुरंटक, कुरबक; लॅ. बार्लेरिया प्रिओनिटिस; कुल-ॲकँथेसी). सु. ०·६–१·५ मी. उंचीचे हे क्षुप (झुडूप) सिंध, श्रीलंका, आफ्रिकेचा उष्ण भाग, आशिया आणि भारत (कोकण, द. पठार इ.) येथे आढळते. खोड सामान्यतः काटेरी व फांद्या चौकोनी; पाने लांबट गोल व कक्षास्थ (पानांच्या बगलेत) काटे; फुले खालच्या भागात कक्षास्थ, एकटी व वरच्या भागात कणिशरूप फुलोरा; छदके काट्याप्रमाणे [→फूल]; नाजूक पिवळी फुले ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत येतात. जांभळट, निळी आणि पांढरी फुले असलेले प्रकारही आढळतात. कुंपणासाठी व शोभेसाठी झाडे बागेत लावतात. फुले वेण्या, तुरे, हार इत्यादींकरिता वापरतात. मुळांचा लेप त्वचेवरील फोड व पुळ्या यांवर आणि वाळलेली साल डांग्या खोकल्यावर गुणकारी असते. पाने व फांद्या गोड्या तेलाबरोबर उकळून, ते तेल जखमेवर लावतात. पाने व मीठ यांचे दंतमंजन हिरड्यांस बळकटी आणते. शिवाय बाळंतरोग, सर्दी, पित्त आणि वीर्यस्खलन इत्यादींवर पानांचा रस उपयुक्त असतो.

पावसाळ्यात फाटे, रोपे अथवा धुमारे लावून कोरांटीची अभिवृद्धी (लागवड) करतात. झाडे सावलीतसुद्धा येतात, पण भरपूर ऊन आणि उजेडात चांगली वाढतात. हिला चांगल्या निचऱ्याची, मध्यम प्रतीची, भरपूर खतविलेली जमीन लागते. जरुरीप्रमाणे पाणी द्यावे लागते. झाडे पुष्कळ दिवस टिकतात व फार वाढतात म्हणून दरसाल उन्हाळ्यात छाटणी करून योग्य आकार देतात.


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा