रामानुजन, ए. के. : (१६ मार्च १९२९ – १३ जुलै १९९३). भारतीय इंग्रजी काव्यपरंपरेमध्ये भरीव योगदान असलेले साहित्यिक. भाषातज्ज्ञ व संशोधक म्हणूनही ख्यातकीर्त. पूर्ण नाव अट्टीपटे कृष्णस्वामी रामानुजन. इंग्रजीव्यतिरिक्त रामानुजन यांचा तेलुगु, तामिळ, कन्नड व संस्कृत या भाषांमधील साहित्याचाही मोठा अभ्यास होता. या भाषांमधील निवडक गद्य व पद्य रचनांचा त्यांनी इंग्रजीतून अनुवाद केलेला आहे.जन्म म्हैसूर येथे.वडील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणितज्ज्ञ व खगोलशास्त्रज्ज्ञ होते. रामानुजन यांनी म्हैसूर विद्यापीठातून इंग्रजी विषयातून पदवी प्राप्त केली. त्यांच्या संशोधन कार्यासाठी त्यांना डेक्कन कॉलेज, पुणे यांची फेलोशिप (१९५८-५९) आणि इंडियाना विद्यापीठाची फुलब्राईट स्कॉलरशिप (१९५९ – ६२) प्रदान करण्यात आली. त्यांनी इंडियाना विद्यापीठातून ‘भाषाविज्ञान’ विषयातील डॉक्टरेट पदवी मिळवली.

त्यांनी अनेक ख्यातनाम महाविद्यालये व विद्यापीठातून अध्यापन व संशोधनाचे कार्य केले. यामध्ये महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा, शिकागो विद्यापीठ, मिशिगन विद्यापीठ, कॅलिफोर्निया–बर्कले विद्यापीठ, इ. विद्यापीठांचा समावेश आहे. याशिवाय ‘साऊथ एशियन लँग्विजीस अँड सिव्हिलायझेशन’, ‘द्रविडीयन स्टडीज अँड लिंग्विस्टीक्स’ या शिकागो विद्यापीठाच्या विद्याशाखांच्या उभारणीत त्यांचे बहुमोल योगदान आहे.

रामानुजन यांचा पहिला कवितासंग्रह  दि स्ट्राइडर्स (१९६६) साली प्रकाशित झाला. त्यानंतर रिलेशन्स (१९७१), सिलेक्टेड पोएम्स (१९७६), सेकंड साईट (१९८६) हे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. या इंग्रजी काव्यसंग्रहाबरोबरच त्यांचे कन्नड काव्यसंग्रह व त्याचे इंगजी अनुवादही या दरम्यान प्रसिद्ध झाले. यामध्ये होक्कुलल्ली हुव इल्ला (नो लोटस इन दि नेव्हल,१९६९),मत्तू इतर पद्यगळू (अँड आदर पोएम्स-१९७७) या कन्नड कवितासंग्रहाचा समावेश आहे. तर दि इंटेरियर लँडस्केप: लव्ह पोएम्स फ्रॉम अ क्लासिकल तामिळ अँथोलॉजी (१९६७), स्पिकिंग ऑफ शिवा (१९७३),हिम्स फॉर दि ड्राउनिंग (१९८१), पोएम्स ऑफ लव्ह अँड वॉर या ग्रंथांतून त्यांनी तमिळ आणि कन्नड साहित्यातील गद्य-पद्य रचना इंग्रजीतून अनुवादित केल्या आहेत.

ए. के. रामानुजन हे आर. पार्थसारथी, निसिम एझिकेल, अरुण कोलटकर, आदिल जस्स्सावाला या भारतीय इंग्रजी कवींचे समकालीन आहेत. या सर्व कवींची कविता ही प्रामुख्याने आधुनिक भारतीय कविता म्हणून ओळखली जाते. आधुनिक भारतीय इंग्रजी कवींच्या लेखनात काही समान काव्यमुल्ये व आशय आहे. या उत्तर-वसाहतवादी कवींच्या कवितेवर अमेरिकन कवींचा प्रभाव आहे. त्यांच्या कवितेमधून उपरोधाचा एक तीव्र स्वर विशेषत्वाने ऐकू येतो. प्राचीन भारतीय काव्याचे अनुवादाच्या माध्यमातून पुनर्मूल्यांकन, भारतीय अस्मितेच्या अवाजवी उदात्तीकरणाबद्दलची कठोर चिकित्सा, पारंपरिक काव्यप्रकारास विरोध हे काही गुणविशेष या कालखंडातील भारतीय इंग्रजी काव्यात दिसून येतात. ही वैशिष्ट्ये रामानुजन यांच्या काव्यामध्येही आढळून येतात.याखेरीज भारतीय आणि अमेरिकन भवतालातून दिसणाऱ्या वस्तूजगतातील घटकांचे सर्जनशील प्रतिमासंघटन, कवितेच्या रूपबंधाची कौशल्यपूर्ण हाताळणी, शब्दांच्या अंतर्लयीची बंदिस्त तरीही संवादी मांडणी आणि भाषिक अवकाशाचा विविध पातळ्यांवरती घेतलेला शोध हे रामानुजन यांच्या काव्यशैलीचे ठळक विशेष आहेत. काव्याच्या दृश्यात्मक व ध्वन्यात्मक परिणामांचा सखोल विचार त्यांच्या कवितेतून दिसून येतो. त्यांनी लिहिलेल्या दीर्घ कवितांमधूनही याचे प्रत्यंतर येते.

भारतासारख्या खूप खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक, बहुभाषिक अवकाशातून दुसऱ्या सांस्कृतिक अवकाशात स्थिरावतानाचे अनुभवविश्व रामानुजन आपल्या कवितेतून मांडतात.वंशभेदाचे वास्तव, परकेपणाची भावना आणि तडजोडीचे वर्तमान यांचा उल्लेख त्यांच्या कवितेत अटळपणे येतो. परंतु याची परिणती सांस्कृतिक स्थलांतराबद्दलचा कडवटपणा किंवा भारतीयत्वाबद्दलचा अवास्तव गौरव यामध्ये रुपांतरीत होणार नाही याची ते पुरपूर काळजी घेतात. याउलट कविता किंवा अनुवाद अशा दोन्ही माध्यमातून हे अनुभवविश्व रामानुजन वेगळ्या पातळीवरून स्वीकारताना दिसतात. बहुपेडी अनुभवविश्व त्यांची कविता संपन्न बनविण्यास पोषकच ठरलेले आहे. या अनुभवविश्वाच्या अनेक स्तरांची एकत्रित मांडणी करणारी रामानुजन यांची कविता एखाद्या चायनीज बॉक्सप्रमाणे उकलण्यास जटील वाटू शकते. त्यातल्या बंदिस्तपणामुळे ती बऱ्याचदा दुर्बोधतेकडेही झुकताना दिसते.

या आशयसुत्राव्यतिरिक्त रामानुजन यांच्या कवितेत कौटुंबिक परीघ, जाती – धर्माची चौकट, देश – राज्य यांच्या सीमारेषा आणि भोवतालचे वस्तुनिष्ठ जग यातून व्यक्तिगत ‘स्व’चा शोध घेण्याची धडपड सातत्याने दिसून येते. आधुनिकतेने बहाल केलेली शास्त्रीय चिकित्सक दृष्टी आणि वैयक्तिक, सांस्कृतिक व वांशिक स्मृती या दोन्ही पातळ्यांवरून एक भारतीय म्हणून चालू असलेला शोध, त्यातून आलेले ताणतणाव आणि त्यातले पेच रामानुजन आपल्या कवितेतून मांडतात. रामानुजन यांचा शोध हा केवळ भारतीयत्वापुरता मर्यादित राहत नाही. धर्म, देश, भाषा, विचारधारा यांसारख्या संस्थात्मक घटकांशी असलेल्या बांधिलकीतून एक मनुष्य म्हणून तटस्थ राहणे, मुखवट्यांचे जग आणि त्यातली अटळता व त्यातून दूरस्थ होऊन स्वतःचा शोध घेण्याची संवेदनशील व्यक्तीची धडपड आणि त्यातून शून्यतेचा येऊ घातलेला अनुभव याचेही दर्शन रामानुजन यांच्या कवितेतून अधोरेखीत झाले आहे.

रामानुजन यांच्या एकूण कार्याची नोंद घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री (१९७६)पुरस्काराने सन्मानित केले. दि सिलेक्टेड पोएम्स या काव्यसंग्रहासाठी त्यांना मरणोपरांत साहित्य अकादमी पुरस्कार बहाल करण्यात आला. याशिवाय प्रतिष्ठेची मॅकऑथर फेलोशिपही (१९८३) त्यांना प्रदान करण्यात आली आहे.

अल्पशा आजाराने शिकागो येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

प्रतिक्रिया व्यक्त करा