हॉवर्ड, हेन्री : (? १५१७ – १३  जानेवारी १५४७). सोळाव्या शतकातील महत्वाचा इंग्रजी कवी. तत्कालीन इंग्रजी कवितेला इटालियन कवितेतील शैली, छंद, वृत्त यांची ओळख करून देण्यात हेन्री यांचे मोठे योगदान आहे. सर टॉमस वायट आणि हेन्री हॉवर्ड यांना ‘फादर ऑफ इंग्लिश सॉनेट (सुनीत)’ म्हणून ओळखले जाते. लॅटिन कवी पीत्रार्क यांच्या सुनीतच्या उत्कृष्ट भाषांतरामुळे हा बहुमान या दोघांना मिळाला. हेन्री यांचा जन्म वडील थॉमस हॉवर्ड, ड्युक ऑफ नॉरफोक आणि आई एलिझाबेथ स्टॅफोर्ड हॉवर्ड या दांपत्यापोटी इंग्लंडमध्ये हार्टफोर्डसर या विभागात झाला. जेष्ठ पुत्र या नात्याने हेन्री हॉवर्ड यांना नवव्या वर्षी अर्ल ऑफ सरे हा किताब प्राप्त झाला. थॉमस हॉवर्ड यांनी हेन्री यांच्या शिक्षणाची उत्तम सोय केली होती. हेन्री यांचे इंग्रजीबरोबरच फ्रेंच, लॅटिन आणि स्पॅनिश भाषांवर प्रभुत्व होते. शिक्षण इंग्लंड आणि फ्रान्समध्ये दरबारी वातावरणामध्ये झाले.

किंग हेन्री आठवा यांच्या दुसऱ्या आणि पाचव्या पत्नी अनुक्रमे ॲनी बोलीन आणि कॅथरीन हॉवर्ड यांच्याशी त्यांचे जवळचे नाते होते. त्यामुळे किंग हेन्रीचा पुत्र, ड्युक ऑफ रिचमंड यांचेसोबत हेन्री हॉवर्ड यांचे बालपण गेले. वडिलांच्या प्रभावामुळे हेन्री हॉवर्ड यांनी देखील तत्कालीन दरबारी कामकाजामध्ये प्रभावी भूमिका निभावली. फ्रेंच दरबारामध्ये त्यांनी काम केले. स्कॉटलंड आणि फ्रान्स मधील युद्धामध्ये भाग घेतला. अर्ल ऑफ ऑक्सफर्ड यांची कन्या लेडी फ्रान्सिस डी वियर हिच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुले आणि तीन मुली अशी अपत्ये होती. हेन्री हावर्ड यांचे बरेचसे साहित्य विंडसर येथे बंदिवासामध्ये लिहिले गेले. त्यांनी प्रयत्नपूर्वक लॅटिन आणि इटालियन कवितेतील वैशिष्ट्ये इंग्रजी भाषेमध्ये आणली आणि इंग्रजी काव्याच्या पायाभरणीमध्ये मोलाचा वाटा उचलला. सुनीत या काव्यप्रकाराची चार ओळींची तीन कडवी आणि शेवटच्या दोन ओळी असा आकृतीबंध त्यांनी सहजतेने इंग्रजीमध्ये आणला. त्याचा विकास पुढे विल्यम शेक्सपियर यांनी केला. हेन्री यांच्या कवितेतील निसर्गवर्णन आणि प्रतिमा ठळक, उठावदार आणि इंग्रजी मातीशी प्रामाणिक आहेत.

टॉटल्’स मिसलेनी या संग्रहामध्ये हेन्री यांच्या कविता प्रथम प्रकाशित झाल्या. त्या सुनीत या प्रकारातील असून त्यातील शब्दलालित्य, लयबद्धता  यासाठी त्यांचे कौतुक झाले. हेन्री यांच्यावर गेवीन डग्लस या स्कॉटिश कवीचा प्रभाव होता. हेन्री यांनी व्हर्जिलच्या ईनिड या लॅटिन काव्यातील काही कवितांचा इंग्रजी अनुवाद केला (१५५७). यामध्ये त्यांनी ब्लांक – ब्लांक ब्लॅक व्हर्स या इटालियन वृत्ताचा वापर केला. हेन्री यांचे हे मूलभूत योगदान आहे. ट्युडर वंशाच्या पारंपरिक विषयांबरोबरच त्यांच्या लेखनातील विषय प्रीती, मृत्यू, लंडनमधील जीवन, मैत्री आणि तारुण्य असे आहेत. रचनेतील खानदानी दिमाख त्यांच्या कवितेत दिसतो. टॉटल’स मिसलेनी (१५५७), सर्टन बुक ऑफ व्हर्जिल’स ईनिड (१५५७) आणि अलीकडील द पोएम्स ऑफ हॉवर्ड, सिलेक्टेड बाय स्कॉलर ॲज कल्चरली बीइंग् इम्पॉर्टंट (२००३) हे त्यांचे प्रकाशित साहित्य उपलब्ध आहे. हेन्री यांनी इंग्रजी कवितेला दिलेले लालित्य आणि वृत्त, छंद, रचना प्रकार यांचे योगदान निर्विवाद आहे. इंग्रजी सुनीताला चार ओळींची तीन कडवी आणि शेवटी दोन ओळी अशी रचना प्रथम हेन्री हॉवर्ड यांनी वापरली. तीच नंतर इंग्रजी सुनीताची ओळख झाली.

राजकारणी, कवी आणि अनुवादक अशी हेन्री हॉवर्ड यांची ओळख इंग्रजी साहित्यात आहे. अती बेदरकार स्वभाव असल्याने त्यांचे अनेकदा इतरांशी भांडण होत असे. नव्याने उदयास आलेल्या क्रॉमवेल आणि सीमोर यांच्यासारख्या नेत्यांविषयी त्यांचे मत चांगले नव्हते. त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे आणि किंग हेन्री आठवा यांच्यामध्ये वितुष्ट आले. वार्धक्याने आणि कडवट स्वभाव बनलेल्या किंग हेन्री आठवा यांनी हेन्री हावर्ड यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. त्यांना विंडसर कॅसल येथे बंदिवासात ठेवण्यात आले आणि शेवटी फाशीची शिक्षा देण्यात आली. टॉवर हिल लंडन येथे त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.

संदर्भ :

  • Daiches, David, A critical history of English literature, Vol. I, Great Britain 1996, Revised Edition, 2019.
  • Sampson, George, The Concise Cambridge History of English Literature, London, 1965.