उंबर

वड, पिंपळ, अंजीर इ. वनस्पतींच्या मोरेसी कुलातील हा सदापर्णी वृक्ष आहे. याला संस्कृतमध्ये ‘औदुंबर’ हे नाव आहे. प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, म्यानमार, भारत इ. देशांत हा आढळतो. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव फायकस रेसीमोझा किंवा फायकस ग्लोमेरॅटा आहे.

उंबर वृक्षाची उंची १५-१८ मी. असते. पाने गडद हिरवी, मोठी, एकाआड एक आणि अंडाकृती किंवा आयताकृती असतात. साल पिंगट करडी, गुळगुळीत आणि जाड असते. झाडाच्या वयाप्रमाणे बुंध्याच्या व फांदीच्या सालीची जाडी ०.५ ते २ सेंमी. असू शकते. तसेच खोडाच्या पृष्ठभागावर पांढर्‍या ऊतींचे पापुद्रे वेगळे होताना दिसतात. फळे २ ते ५ सेंमी. व्यासाची असून जांभळट व मोठ्या फांद्यांवर घोसांनी लटकलेली असतात. त्यांना सामान्यपणे उंबर म्हणतात. पक्षी ही फळे खातात, त्यांच्या विष्ठेतून उंबराच्या बीजांचा प्रसार होतो.

उंबराला फूल नसते, असा एक गैरसमज आहे. उंबराचे फळ म्हणजे त्या वनस्पतीचा पुष्पसमूहच असतो. हे फळ कापल्यास ही फुले दिसतात. त्यात नरफुले, मादीफुले आणि नपुंसक (वांझोटी) फुले अशी तीन प्रकारची फुले असतात. ब्लास्टोफॅगा सेनेस या चिलटाएवढ्या कीटकांची मादी अंडी घालण्यासाठी उंबराच्या खालच्या बाजूने आत प्रवेश करते आणि नपुंसक फुलामध्ये आपली अंडी घालते. तिच्या अंगावर दुसर्‍या फुलाकडून येताना माखले गेलेले असंख्य परागकण असतात. ज्या छिद्रातून ती आत शिरते, त्याच्या तोंडाशी आतील बाजूला वळलेली अनेक ताठ कुसळे असल्याने तेथून ती बाहेर पडू शकत नाही. बाहेरचा मार्ग शोधताना तिच्या अंगावरील परागकनांचे उंबरातील मादीफुलांवर सिंचन होते आणि ती आतच मरून जाते. कालांतराने उंबरातील नरफुले बहरतात. याच सुमाराला कीटकाच्या अंड्यांतून पिले बाहेर पडतात व वाढतात. त्यांच्या नर-माद्यांचा समागम होऊन नर मरतात. फलित माद्या बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतात. याच वेळी त्यांच्या अंगावर नरफुलातील परागकण माखले जातात. उंबराच्या वरच्या छिद्राजवळील कुसळे मऊ झाली असल्याने माद्या तेथून सहज बाहेर पडतात आणि अंडी घालण्यासाठी दुसर्‍या कच्च्या उंबराकडे जातात. अशा प्रकारे हे चक्र चालूच राहते. ब्लास्टोफॅगा सेनेस हा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. त्यांच्या सहजीवनातून कीटकांचे प्रजनन आणि वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात. निसर्गामधील भिन्न प्रकारच्या सजीवांच्या परस्परांवरील अवलंबनाचे हे एक ठळक उदाहरण आहे.

उंबर वृक्षाचे सर्व भाग औषधी असतात. साल आकुंचन करणारी असून जनावरांच्या बुळकांड्या रोगावर देतात. मूळ आमांशावर व त्याचा रस मधुमेहावर उपयुक्त असतो. फळ भूक वाढविणारे असून ते मासिक अतिस्त्रावावर देतात. चीक मूळव्याध व अतिसार यांवर गुणकारी आहे.

उंबराचे लाकूड पांढरट किंवा लालसर, मऊ व हलके असते. अनेक सामान्य वस्तू, घरबांधणी, शेतीच्या उपयोगाच्या वस्तू इ. बनविण्यासाठी या लाकडाचा वापर करतात. सालीचा उपयोग उत्तम काळा रंग बनविण्यास होतो. या झाडाच्या सर्व भागांपासून चीक निघतो व त्यापासून पक्षी पकडण्यासाठी गोंद बनवितात.