एक काटेरी पानझडी वृक्ष. पांगारा या वृक्षाचा फॅबेसी कुलात समावेश केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव एरिथ्रिना इंडिका असे आहे. एरिथ्रिना व्हॅरिगेटा  या शास्त्रीय नावानेही तो ओळखला जातो. मूळचा भारतीय असलेल्या या वृक्षाचा प्रसार म्यानमार, पाकिस्तान आणि अन्य आशियाई देशांतही झालेला आहे. भारतात फुलांच्या रंगांनुसार पांगाऱ्याचे तीन प्रकार आढळतात : लाल, शेंदरी आणि पांढरा. त्यांपैकी पांढरी फुले येणारा पांगारा हा दुर्मिळ असून लाल फुले येणारा पांगारा सर्वत्र आढळून येतो .

पांगारा (एरिथ्रिना इंडिका) : (१) संयुक्त पाने, (२) फुलोऱ्यातील फुले, (३) शेंगा, (४) बिया.

पांगारा हा वृक्ष सु. २७ मी. उंच वाढतो. याच्या खोडाची साल पातळ, करड्या रंगाची, क्वचित पिवळी व खडबडीत असते. याला लहान आकाराच्या अनेक फांद्या असतात आणि त्यांना शंकूच्या आकाराचे काटे असतात. पाने संयुक्त, त्रिदली व मोठी असून पर्णिका एकाआड एक व १०–१५ सेंमी. लांब असतात. लांब फुलोऱ्यावर फुले मोठी व आकर्षक असून ती लाल, शेंदरी किंवा पांढऱ्या रंगाची असतात. ती बिनवासाची असून त्यांत मकरंदाचे प्रमाण जास्त असते. म्हणून अनेक पक्षी व भुंगे फुलांमधील मकरंद मिळविण्यासाठी फुलांभोवती घिरट्या घालताना दिसतात. फळ (शेंग) १३–३० सेंमी. लांब, काळ्या रंगाचे आणि लंबगोलाकार असते. त्यांत ६­-७ जांभळ्या व हलक्या बिया असतात. पांगाऱ्याची लागवड बिया किंवा कलम लावून करतात.

पांगाऱ्याच्या सालीचा लेप व्रण, सूज व सांधेदुखी यांवर लावतात. साल पित्तरोधक आणि कृमिनाशक आहे. ताज्या पानांचा रस कानदुखी तसेच दातदुखी यांवर वापरतात. कोकणात ताज्या पानांचा रस कृमिनाशक म्हणून वापरतात. लाल पांगाऱ्याच्या पाकळ्यांपासून लाल रंग, तर शेंदरी पांगाऱ्याच्या पाकळ्यांपासून शेंदरी रंग मिळवितात. या वृक्षाचे लाकूड हलके व टिकाऊ असल्यामुळे त्याचा उपयोग खेळणी, हलक्या वस्तू (उदा., फळ्या, खोकी, तक्ते, आगकाड्या, पळ्या, चाळणीच्या चौकटी इ.) बनविण्याकरिता करतात. चहाच्या किंवा कॉफीच्या मळ्यांत आणि बागांमध्ये सावलीसाठी तसेच मिरवेल, नागवेल, द्राक्षवेल इ. वेलींना आधार देण्यासाठी मुद्दाम पांगारा वृक्षाची लागवड करतात.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा