अडुळसा ही अॅकँथेसी कुलातील सदाहरित झुडूप स्वरूपाची औषधी वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव अॅधॅटोडा व्हॅसिका आहे. भारत, श्रीलंका, म्यानमार व मलेशिया या देशांत ती आढळते. ही वनस्पती महाराष्ट्रात कोकण आणि दख्खनच्या पठारावर शेताच्या कडेने लावतात.अडुळसा सु. १.२-२.४ मी. उंच वाढते. पाने साधी, मध्यम आकाराची व लांबट असतात. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान फांदीच्या टोकास फुलोरा येतो. फुले पांढरट रंगाची असतात. फळ लांबट व टोकदार असते.
अडुळसाची मुळे, खोडाची साल, पाने, फुले व फळे औषधांत वापरली जातात. कफ, दमा, खोकला आणि विविध श्वसन आजारांवर अडुळसा औषध मोठ्या प्रमाणावर वापरतात. साधारणपणे २००० वर्षांपूर्वीपासून या औषधी वनस्पतीचा उपयोग केला जात असावा, असे आयुर्वेदातील उल्लेखांवरून दिसते. अडुळशापासून आयुर्वेदीय पद्धतीने अनेक औषधे तयार केली गेली आहेत. पानांचा रस अतिसारात गुणकारी असतो. त्याचा रस, मध, सुंठ, मिरी व पिंपळी यांचे मिश्रण कफ व कास यांवर देतात. पानांत वासिसाईन हे अल्कलॉइड आणि अॅडॅथोडिक आम्ल असते. हृदयाच्या आजारांवरही या वनस्पतीचा उपयोग केला जातो.