ऑलिव्ह : फांदी व फळे.

ऑलिव्ह हा ओलिएसी कुलातील मध्यम आकाराचा सदापर्णी वृक्ष आहे. इंडियन ऑलिव्ह (ओलिया फेरूजिनिया) आणि यूरोपीय ऑलिव्ह (ओलिया यूरोपिया) या ऑलिव्हच्या दोन जाती प्रसिद्ध आहेत. इंडियन ऑलिव्ह भारतात काश्मीर ते कुमाऊँ या हिमालयीन प्रदेशात समुद्रसपाटीपासून २,४०० मी. उंचीपर्यंत आढळतो. उत्तर भारतात त्याची लागवडही केली जाते आणि त्याला ‘कहू’ किंवा ‘बैरबंज’ या नावाने ओळखतात. यूरोपीय ऑलिव्ह हा मूळचा पश्चिम आशियातील असून मोठ्या प्रमाणात स्पेन, इटली, ग्रीस, पोर्तुगाल इ. भूमध्यसामुद्रिक प्रदेशांत तसेच उत्तर अमेरिकेतील काही भागांत याची लागवड केली जाते. इ.स.पू. ३००० सालापासून पूर्व भूमध्यसामुद्रिक प्रदेशात हा लागवडीत आहे. इतर फळझाडांच्या तुलनेत ऑलिव्ह वृक्ष दीर्घकाळ जगतात. पॅलेस्टाइनमध्ये २००० वर्षांहून अधिक वर्षे जगलेले वृक्ष आढळले आहेत.

ऑलिव्ह वृक्षाची उंची ८-१५ मी. पर्यंत असते. हा फांद्यांचा वृक्ष असून त्याची पाने साधी, भाल्यासारखी, चिवट, समोरासमोर, कंटकाग्र, वरच्या बाजूला करड्या हिरव्या रंगाची व खालच्या बाजूला पांढरट असतात. पाने ३-७ सेंमी. लांब तर ०.४-२.५ सेंमी. रुंद असतात. फुले एप्रिल-मे महिन्यांच्या दरम्यान येतात. फुलांच्या पांढर्‍या रंगाच्या मंजिर्‍या असतात. फळे हिरवी, छोटी, गोलाकार व ५०-६० मिमी. व्यासाची असतात. फळ पिकल्यावर काळे होते व खाद्य असते. फळात कठिण कवच असलेली बी असते. फळात गर विशेष नसतो. ही फळे हिवाळ्यात काढली जातात. या फळांमध्ये ऑलियूरोपीन नावाचे एक नैसर्गिक ग्लुकोसाइड असते; त्यामुळे फळ चवीला तुरट लागते. फळ खाण्यायोग्य होण्यासाठी मिठाच्या पाण्याची प्रक्रिया करून धुतले जाते. फुले आणि फळे येण्यासाठी ऑलिव्ह वृक्षाला २-३ महिने ७ से. पेक्षा कमी तापमान लागते. उपोष्ण प्रदेशात सरासरी तापमान सु. १० से. असलेल्या भागात ऑलिव्ह फळांचे उत्पादन चांगले होते. उष्णकटिबंधीय प्रदेशात हा वृक्ष जरी बहरलेला दिसला तरी याला पुरेसे थंड वातावरण नसल्यामुळे फळे येत नाहीत.

तेल मिळविण्यासाठी फळे पिकून काळी पडल्यावर झाडावरून काढतात.  फळाचा गर व बीया दोन्हींपासून तेल काढतात. फळामध्ये २५-२८% तेल असते. या तेलाचा उपयोग स्वयंपाकामध्ये व मालीशसाठी करतात. तसेच साबण, वंगण व औषध म्हणूनही ते उपयुक्त आहे. ऑलिव्ह तेल ० से. तापमानापर्यंत द्रव स्थितीत राहते. तसेच इतर खाद्यतेलांप्रमाणे लवकर खवट होत नाही.

ऑलिव्ह वृक्षाचे मध्यकाष्ठ फिकट ते गर्द तपकिरी किंवा गर्द जांभळे, मजबूत, लवचिक, कठीण, जड आणि टिकाऊ असते. त्यापासून हत्यारांचे दांडे, छड्या, फण्या, खेळणी आणि अनेक कातीव व कोरीव वस्तू तयार करतात.