सर्व कीटकांमधील आकर्षक कीटक. फुलपाखरे जगात सर्वत्र आढळतात. उष्ण प्रदेशांतील वर्षावनांत त्यांचे सर्वाधिक प्रकार आढळतात. त्यांचे पंख नाजूक व विविधरंगी असल्यामुळे ती मोहक दिसतात. फुलपाखरांचा समावेश कीटक वर्गाच्या लेपिडॉप्टेरा म्हणजे खवलेपंखी गणात करण्यात येतो. या गणात फुलपाखरांबरोबर पतंगांचाही समावेश होतो. जगात फुलपाखरे आणि पतंग यांच्या सु.१,७७,५०० जाती नोंदविल्या गेल्या आहेत. यांपैकी फुलपाखरांच्या सु.१७,५०० जाती, तर पतंगाच्या सु.१,६०,००० जाती आहेत. भारतात फुलपाखरांच्या सु.१५०० जाती, तर महाराष्ट्रात सु.२२५ जाती आढळून येतात.

फुलपाखरांचे इंग्रजी नाव ‘बटरफ्लाय’ असले तरी फुलपाखरू माशी नाही. फूल आणि फुलपाखरू यांचा घट्ट संबंध असावा, असे फुलपाखरू या नावावरून वाटते. मात्र सगळी फुलपाखरे फुलांवर बसत नाहीत. काही फुलपाखरे चिखल, शेण, ओली माती, वनस्पतींनी पाझरलेला द्रव व मलमूत्र यांच्याकडेदेखील आकर्षित होतात.

फुलपाखराच्या शरीराचे डोके, वक्ष आणि उदर असे तीन भाग असतात. डोक्यावर शृंगिका, डोळे आणि मुखांग असते. मुखांग सोंडेसारखे असून त्याचा उपयोग द्रव अवस्थेतील अन्न शोषून घेण्यासाठी होतो. बहुतेक फुलपाखरे वनस्पतींच्या फुलांतील मकरंद शोषून घेतात. सोंड डोक्याच्या खालच्या बाजूस असते. तिची घड्याळ्यातील स्प्रिंगेसारखी गुंडाळी झालेली असते. वक्ष तीन खंडांचे असून त्यावर पायांच्या तीन जोड्या आणि पंखांच्या दोन जोड्या असतात. त्यांच्या पंखांवर सूक्ष्म खवले असतात आणि हे खवले कौलांच्या रांगांप्रमाणे असतात. प्रत्येक खवल्यात विशिष्ट रंगद्रव्य असून काही खवल्यांमध्ये हवेच्या पोकळ्या असतात. फुलपाखरांचे मोहक, आकर्षक रंग खवल्यांतील रंगद्रव्यांमुळे किंवा त्यांतील हवेच्या पोकळ्यांमधून होणाऱ्या प्रकाशाच्या वक्रीभवनामुळे दिसतात. त्यांच्या काही जातींमध्ये ऋतुमानांनुसार रंगांत बदल होतात. पंखांचे ऊर्ध्व बाजूचे रंग गडद तर अधर बाजूचे रंग मंद किंवा फिकट असतात. पुष्कळ जातींच्या नर फुलपाखरांमध्ये गंध-खवले असतात. हे खवले पंखात असलेल्या गंधग्रंथीशी संलग्न असून गंधग्रंथी कामगंध स्रवतात. त्यामुळे मादी नराकडे आकर्षित होते. फुलपाखरांचे उदर लांब आणि दहा खंडांनी बनलेले असते. फुलपाखरांमध्ये परिपूर्ण जीवनचक्र आणि पूर्ण रूपांतरण असून त्यांच्या वाढीच्या अंडे, अळी, कोश आणि प्रौढ अशा चार अवस्था असतात. काही फुलपाखरे साधारणत: वर्षभर जगतात. बहुसंख्य फुलपाखरे त्यांच्या अळ्यांना ज्या वनस्पतींपासून योग्य अन्न मिळेल, अशा वनस्पतींच्या पानांवर अंडी घालून मरून जातात. अंड्यांतून अळ्या बाहेर येतात आणि वाढतात. वाढ होत असताना अळ्या चार वेळा कात टाकतात आणि आकाराने मोठ्या होत जातात. चौथ्यांदा कात टाकल्यानंतर अळीचे कोशात रूपांतरण होते. शेवटी प्रौढ फुलपाखरू कोशातून बाहेर येते.

महाराष्ट्रात आढळणाऱ्या फुलपाखरांना वाघ्या, बिबळ्या कडवा, ढाण्या कडवा, काळू, पानपंखी, शुभ्रपंखी, सोनपंखी, नीलवंत, भिरभिरी, नखरेल मयुरी, भटके तांडेल, सरदार, नीलपरी, चित्ता, एरंड्या, छोटा चांदवा, काळा राजा, तपकिऱ्या, चिमी, निलपऱ्या भीमपंखी, लिंबाळी, बहुरूपी, शेंदूर टोक्या, लालटोक्या, केशर टोक्या, हळदी, कवड्या, गौरांग, भटक्या, स्वैरिणी, अक्कडबाज अशी नावे आहेत.

ब्ल्यू मॉर्मन : (नीलवंत). या फुलपाखराचे शास्त्रीय नाव पॅपिलिओ पॉलिम्नेस्टर आहे. हे फुलपाखरू संपूर्ण महाराष्ट्रात व दक्षिण भारतातील वनांत आणि श्रीलंका या ठिकाणी आढळते. पश्‍चिम घाटातील वनात त्यांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्येही ते आढळते. त्याचा पंखविस्तार १५० मिमी. असतो. शरीर आणि पंख काळे असून दोन्ही पंखांवर निळे ठिपके असतात. मागच्या पंखांच्या खालील बाजूस शरीराकडील टोकावर लाल ठिपका (बुंदका) असतो. काळ्या पंखावरची निळी तकाकी दिसून येते. हे फुलपाखरू वेगाने फुलांवर संचार करीत असते व फुलातील मकरंद आणि चिखलातील क्षार शोषून घेते. संत्री, र्इडलिंबू व मोसंबी या वनस्पतींवर मादी अंडी घालते. २०१५ मध्ये या फुलपाखराला ‘महाराष्ट्र राज्य फुलपाखरू’ असा दर्जा देण्यात आला आहे.

वाघ्या : या फुलपाखराचे शास्त्रीय नाव डनायस क्रिसीपस आहे. ते मैदानी प्रदेश ते ३०० मी.पर्यंतच्या उंच टेकड्या आणि वाळवंटी प्रदेश येथे आढळते. त्याचा पंखविस्तार ७०–८० मिमी. असतो. पंखांचा रंग भगवा असून पुढच्या पंखांच्या पुढील भागात चार पांढरे पट्टे आणि अनेक पांढरे ठिपके असतात. मागच्या पंखांच्या मधल्या भागात चार काळे ठिपके असून खालच्या भागात काळा पट्टा असतो. त्याच्या अळ्या कण्हेर व रुई यांची पाने खातात.

काळू : (कॉमन क्रो). या फुलपाखराचे शास्त्रीय नाव यूप्लोइआ कोरे आहे. त्याचा पंखविस्तार ८५–९५ मिमी. असतो. पंखांचा रंग गडद तपकिरी असून पंखांच्या कडालगत पांढरट, पिवळ्या रंगाचे पट्टे व बुंदके यांच्या दोन रांगा असतात. त्यांच्या अळ्या वड, पिंपळ, उंबर, रुई व कण्हेर यांसारख्या चिकाळ वनस्पतींची पाने खातात. स्थलांतर करण्यापूर्वी आणि स्थलांतर करताना त्यांचे घोळके एकत्र विश्रांती घेताना दिसतात.

भीमपंखी : (सदर्न बर्डविंग). या फुलपाखराचे शास्त्रीय नाव ट्रॉयडिस मिनॉस आहे. भारतातील हे सर्वांत मोठे फुलपाखरू असून त्याचा पंखविस्तार सु. १९० मिमी. असतो. ती पश्‍चिम घाट, गोवा आणि गोव्याच्या दक्षिणेला आढळतात. पावसाळा आणि त्यानंतरचे काही दिवस ती घाणेरीच्या झुडपांवर दिसून येतात.

चिमी : (ग्रास ज्युवेल). या फुलपाखराचे शास्त्रीय नाव फ्रियेरिआ ट्रोचिलस आहे. भारतातील फुलपाखरात हे सर्वांत लहान फुलपाखरू आहे. त्याचा पंखविस्तार १५–२२ मिमी. असतो. रंगाने नर निळा आणि मादी तांबूस असते. मागच्या पंखांच्या कडांवर केशरी कडांचे रत्नासारखी तकाकी असणारे ठिपके असतात. ती बहुधा खुरट्या गवतांवर दिसतात.

अक्कडबाज : (स्किपर). या फुलपाखराचे शास्त्रीय नाव बदामिआ एक्सक्लमेशनिस आहे. पंखविस्तार ५०–५५ मिमी. असतो. ती बहुतकरून वृक्षांभोवती आढळतात आणि बेहड्याची पाने व फुले यांवर वाढतात. त्याच्या शृंगिका टोकाला आकडीप्रमाणे वळलेल्या असून त्या मिशीसारख्या दिसतात. म्हणून त्याला अक्कडबाज म्हणतात.

कैसर-इ-हिंद : या फुलपाखराचे शास्त्रीय नाव टीनोपाल्पस इंपेरिआलिस आहे. ते सुंदर आणि आकर्षक दिसते. ते ईशान्येकडील सिक्कीम आणि त्याच्या पूर्वेकडील वनात आणि समुद्रसपाटीपासून २०००–३००० मी. उंचीपर्यंत टेकड्यांवर आढळते. त्याच्या मागच्या पंखांना शेपट्या असतात.

भूतान राणी : या फुलपाखराचे शास्त्रीय नाव भूतानिटिस लिडरडाली आहे. ते भारताचा ईशान्य भाग आणि भूतान येथे आढळते. त्याच्या मागच्या पंखांना शेपट्या असतात.

मोनार्क : या फुलपाखराचे शास्त्रीय नाव डनायस प्लेक्सिपस आहे.  ते उत्तर अमेरिकेतून उन्हाळ्याच्या अखेरीस सु. ५,००० किमी. अंतर पार करून मेक्सिकोपर्यंत येते. त्यांची पुढली पिढी मेक्सिकोत जन्म घेते. ही पिढी मेक्सिकोमध्ये हिवाळा सुरू झाला की पुन्हा मूळ ठिकाणी परत जाते. फुलपाखरांमध्ये हे स्थलांतर सर्वांत जास्त मानले जाते. ते मोठ्या संख्येने स्थलांतर करीत असल्यामुळे आकाशात असताना भर दिवसाही अंधारून येते.

काही फुलपाखरे स्थलांतर करतात. काळू, बिबळ्या, कडवा, ब्ल्यू मॉर्मन, मोनार्क, पेण्टेड लेडी इत्यादी फुलपाखरे अन्न शोधण्यासाठी आणि प्रतिकूल हवामान टाळण्यासाठी स्थलांतर करतात.

फुलपाखरांमध्ये मायावरण व अनुकारिता हे गुणधर्म दिसून येतात. ती माणसाला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचवीत नाहीत किंवा डास, ढेकूण व पिसू यांच्याप्रमाणे शरीरस्वास्थ बिघडवीत नाहीत. त्यांच्यामुळे कोणत्याही रोगांचा प्रसार होत नाही. फुलपाखरे वनस्पतींच्या परागणासाठी मदत करतात. विशिष्ट फुलपाखरे ठराविक वनस्पतींचे परागण घडवून आणतात. फुलपाखरांना निसर्गाचे ‘संवेदनक्षम दर्शक’ म्हणतात. एखाद्या उद्यानातील फुलांच्या मोसमानुसार तेथे येणारी फुलपाखरे वेगवेगळी असतात. कर्करोगावरील संशोधनात फुलपाखरांच्या अळ्यांचा उपयोग केला जातो.

फुलांचे रंग आणि फुलपाखरे यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. विशिष्ट फुलपाखरांना आकर्षित करून घेण्यासाठी फुलांचे रंग विकसित झाले आहेत. मात्र फुलपाखरांची रंगदृष्टी मनुष्याच्या रंगदृष्टीपेक्षा काहीशी भिन्न आहे; मनुष्याला दिसणाऱ्या प्रकाशतरंगांची लांबी ४००–७०० नॅनोमीटर असते, तर फुलपाखरांना दिसणाऱ्या प्रकाशतरंगांची लांबी ३००–६५० नॅनोमीटर असते. एखादे रंगीत फूल मनुष्याला जसे दिसते त्यापेक्षा फुलपाखराला वेगळे दिसते.

भारतात फुलपाखरांची सु. २० उद्याने आहेत. महाराष्ट्रात ठाणे (ओवळेकर वाडी), डोंबिवली (एमआयडीसी परिसर), पुणे (सहकार नगर) आणि नागपूर (राजभवन परिसर) येथे अशी उद्याने विकसित केली गेली आहेत. या उद्यानांचा उपयोग मनोरंजन, संवर्धन व संशोधन यांसाठी केला जातो.

प्रतिक्रिया व्यक्त करा