सामाजिक मानवशास्त्रात बहुतांशी आदिवासी समाजांचा तौलनिक अभ्यास करून मानव समाजाचे स्वरूप विशद करण्याचा प्रयत्न केला जातो. शक्य तेवढ्या जास्तीतजास्त समाजातील सामाजिक संबंधांचा व प्रक्रियांचा तौलनिक अभ्यास करून मानवाच्या भिन्नभिन्न आचारविचारांवर आधारित सिद्धांत मांडणे, हे सामाजिक मानवशास्त्राचे ध्येय असते. केवळ आदिवासी समाजांबाबतच संशोधन करावे, अशा मर्यादा सामाजिक मानवशास्त्रात आखून दिलेल्या नाहीत; परंतु ऐतिहासिक दृष्ट्या मानवशास्त्रात आदिवासी समाजांचाच विचार अधिक केला गेला आहे. आदिवासी हा जंगल, दऱ्याखोऱ्यांत वास्तव्यास राहिल्यामुळे तो जैविक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या आजही एकसंध असल्याचे दिसते. सुरुवातीस जैवशास्त्रज्ञ जसे मानवाच्या शरीरविकासविषयक संशोधन करावयास लागले, तसेच सामाजिक वैज्ञानिक मानवी संस्थांच्या उगमाबाबत व विकासाबाबतही संशोधन करावयास लागले. त्या दृष्टीने आदिवासींविषयक संशोधन उपयोगी पडेल, असा अंदाज करण्यात आला. आदिवासी समाज संख्येने लहान असल्यामुळे त्यांचा सहजीवी निरीक्षणपद्धतीने अभ्यास करणे शास्त्रज्ञांस शक्य झाले. मानव संस्कृतिविषयक सिद्धांत मांडण्याकरिता अगोदर सरल संस्कृतिविषयक संशोधन करणे सोपे जाते. सरल संस्कृतिविषयक संशोधनातून मानवी वर्तनाबद्दलचे घटक लक्षात घेऊन त्या अनुषंगाने जटिल, प्रगत संस्कृतीचा अभ्यास करणे आवाक्यातील असते. त्यानंतर सर्व सरल व जटिल संस्कृतींचा तौलनिक अभ्यास करून मानवी आचारविचारांबद्दल काही ठोक सिद्धांत मांडणे शास्त्रीय ठरते. यावरून आदिवासी संस्कृतीच्या संशोधनाचे शास्त्रीय महत्त्व लक्षात येते. मानवशास्त्रात ग्रामीण, नागरी, विभागीय व राष्ट्रीय संस्कृतिविषयक संशोधन व लिखाण झाले व आजही होत आहे. आदिवासी संस्कृतिविषयक संशोधन ही एक अभ्यासपद्धती झाली आहे. आदिवासी समाज फार झपाट्याने बदलत आहे. हा समाज संपूर्णपणे बदलण्यापूर्वी त्यांच्या संस्कृतीची अभ्यासपूर्वक नोंद करण्याची जबाबदारी साहजिकच मानवशास्त्रज्ञांवर पडली आहे. हे अध्ययन ऐतिहासिक दृष्ट्याही फार महत्त्वपूर्ण आहे. मानवशास्त्रात केवळ आदिवासी संस्कृतीचेच संशोधन करण्यात येते, ही समजूत अगदी चुकीची असून जगातील सर्व समाजांचा व पर्यायाने त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास ज्यामध्ये केला जातो, त्या मानवशास्त्राच्या शाखेस सामाजिक मानवशास्त्र असे म्हणतात.

समाजाच्या विविध थरांमध्ये अथवा स्तरांवर माणसाचे दर्शन कसे घडते, विविध व्यक्ती आणि गट यांच्यामधील विविध स्वरूपांचे संबंध, त्यांचे वर्तन यांच्यावर वेगवेगळ्या सामाजिक संस्था कशा प्रकारे नियंत्रण ठेवतात या सर्वांचा अभ्यास प्रामुख्याने सामाजिक मानवशास्त्रात अंतर्भूत होतो. छोटे एकजिनसी आदिम आदिवासी समाजातील, त्याचप्रमाणे गुंतागुंतीच्या नागरी आणि सर्वदेशीय (कॉस्मोपॉलिटन) समाजातील व्यक्तींचे वर्तन आणि विविध संस्था यांच्यातील संबंधाचाही उहापोह या शाखेत केला जातो.

सामाजिक मानवशास्त्रात आदिवासी जमात, सामाजिक प्रक्रिया व सामाजिक संघटन यांच्या संदर्भातला अभ्यास केला जातो. काही मानवशास्त्रज्ञ मानवी समाजाच्या सांस्कृतिक अंगांकडे विशेष भर देत असतात. त्यांच्या मते, संस्कृतीच्या अभ्यासामध्ये सामाजिक गोष्टींकडे लक्ष दिले जात असून सामाजिक मानवशास्त्रापेक्षा सांस्कृतिक मानवशास्त्राची व्याप्ती अधिक आहे. प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ एडवर्ड बेर्नेट टायलर (Edward Burnett Tylor) यांनी आदिवासी या धर्माचा अभ्यास केला, तर प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ लेविस हेन्री मॉर्गन (Lewis Henry Morgan) यांनी आदिवासी समाजाचा अभ्यास केला. सामाजिक मानवशास्त्र व समाजशास्त्र या दोन्ही विषयांच्या अभ्यासात पुनरावृत्ती होत असल्याचे काही जणांचे मत आहे. काही प्रमाणात ते खरे असले, तरी या दोन्हींत काही फरकही आहेत. या दोन्ही शास्त्रांत सैद्धांतिक आणि पद्धतीविषयक (मेथडॉलॉजीकल) फरक आहेत. सामाजिक मानवशास्त्रज्ञ कोणतीही गोष्ट गृहित न धरता साकल्यपद्धती (होलिस्टिक) विकसित करून निष्कर्ष मांडतात. तसेच तर्क-वितर्कांना वाव न देता प्रत्यक्ष क्षेत्रीय अभ्यास करतात. निरनिराळ्या जमाती, समूह, टोळ्या यांच्याशी संपर्क साधतात, त्यांच्यात मिसळतात, त्यांच्या मुलाखती घेतात आणि  माहितीचे संकलन करून निष्कर्षाप्रत पोहोचण्याचा ते प्रयत्न करतात.

स्वातंत्र्यपूर्व काळात शहरी भाग, ग्रामीण भाग आणि अगदी आदिवासी भागांतसुद्धा वेगवेगळ्या सामाजिक संस्था, सामाजिक रचना अस्तित्वात होत्या. त्या संस्थांवर बऱ्याच मर्यादा होत्या; मात्र स्वातंत्र्योत्तर काळात या संस्थांत झपाट्याने बदल झाला आहे. आदिवासी समाज अजूनही एकजिनसी आहे; परंतु आज काही प्रमाणात ग्रामीण भागांतील समाजात आणि बहुतेक शहरांतील समाजात एकजिनसीपणा दिसून येत नाही. त्यामुळे व्यक्तींमधील किंवा गटांतील व्यक्तींचे वर्तन, समाजरचना आणि सामाजिक संघटना बदललेल्या आहेत. औद्योगिकीकरणामुळे झालेले स्थलांतर, धरणग्रस्तांचे पुनर्वसन, शेतकऱ्यांचे स्थलांतर, स्त्रियांचा सामाजिक दर्जा, स्त्रीवादी विचार, स्त्रियांवरील अत्याचार, लैंगिक वर्तन, समलैंगिकता अशा विवध घटनांमुळे समाज रचना, सामाजिक संस्था यांच्या अभ्यासाची व्याप्ती वाढलेली आहे. पारंपारिक स्वरूपाच्या समाजाचे धार्मिक जीवन अथवा आर्थिक जीवन यांच्या अभ्यासाबरोबरच आता नवनवीन सामाजिक घटकांचा अभ्यास सामाजिक मानवशास्त्रात होऊ लागला आहे.

पृथ्वीवरील वेगवेगळ्या भूप्रदेशात अनेक जाती-जमाती, विविध संस्कृती आढळतात. प्रत्येक समूहांचे आणि त्यांच्या संस्कृतीचे एकमेकांशी संबंध येतच असतात. एकाच समाजातील व्यक्तींचे एकमेकांशी होणारे व्यवहार आणि एका समाजातील व्यक्तींचे दुसऱ्या समाजातील व्यक्तींशी होणाऱ्या व्यवहाराला सामाजिक जीवन असे म्हटले जाते. सामाजिक जीवनात केवळ वस्तूंचीच नव्हे, तर दोन समाजातील आचार-विचारांचे देवाणघेवाणही होत असते. ही संकल्पना ग्राह्य धरून नववैचारिक मानवशास्त्रज्ञांनी समाजरचनेचे स्वरूप स्पष्ट केले आहे. जटिल समाज (कॉम्प्लेक्स सोसायटी), नागरी मानवशास्त्र (अर्बन ॲन्थ्रोपॉलॉजी) किंवा विकास आणि मानवशास्त्र (डेव्हलपमेंट अँड ॲन्थ्रोपॉलॉजी) या नवनवीन अभ्यासप्रणाली यातूनच उदयाला येत असून त्या सामाजिक मानवशास्त्रास पूरक आहेत.

सांस्कृतिक मानवशास्त्रात संस्कृतीचा विचार केला जातो, त्याप्रमाणे सामाजिक मानवशास्त्रात समाजाचा (सामाजिक प्रक्रियांचा व संघटनेचा) अभ्यास करण्यात येतो. मानवशास्त्रज्ञ जेव्हा क्षेत्रकार्यासाठी जातो, तेव्हा त्यांस संस्कृतीची जाणीव होत नाही. त्यांस दिसतात ते सामाजिक संबंध व त्यांचे समाजावरील परिणाम. जे सामाजिक संबंध पुनःपुन्हा प्रत्ययास येतात आणि ज्यांच्यात काही कायमपणा, टिकाऊपणा असतो त्यांचेच अध्ययन महत्त्वाचे असते. सामाजिक रचनेचा अभ्यास करून समाज जीवनातल्या सातत्याची कल्पना येते. जसे पिता–पुत्र, पति–पत्नी इत्यादी. सामाजिक संबंध वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. प्रत्येक नातेसंबंधांत काही कर्तव्ये असतात व ती समाजपरत्वे बदलतात. आपल्या सामाजिक संबंधांत अभ्यास केल्यास समाजाबद्दल सर्व माहिती मिळते. सामाजिक रचना व सामाजिक संघटना या दोन संकल्पना सामाजिक मानवशास्त्रात महत्त्वाच्या मानल्या जातात. या संकल्पनांचे संशोधक प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ ॲल्फ्रेड रेजिनल्ड रॅडक्लिफ–ब्राउन (Alfred Reginald Radcliffe – Brown) व प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ रेमंड विल्यम फर्थ (Raymond William Firth) हे होत. प्रसिद्ध फ्रेंच मानवशास्त्रज्ञ क्लोद लेव्ही–स्त्राऊस (Cloud Levy – Strauss) यांनी सामाजिक मानवशास्त्राचा व्यक्तीच्या देवाणघेवाणीच्या संदर्भात विशेष अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, पति-पत्नींमधील देवाणघेवाण इत्यादींमुळे नातेसंबंध समजू शकतात. अशा प्रकारे सामाजिक मानवशास्त्रात संस्कृती या संकल्पनेचे अध्ययन केले जाते.

सामाजिक मानवशास्त्रात आदिवासींबाबत संशोधन केले जाते. भारतात ग्रामीण समाजांचाही अभ्यास आदिवासी–संशोधन–पद्धतीनुसार बऱ्याच प्रमाणात झाला आहे. (१) नातेसंबंधी समूह (बांधव–समूह). (२) धर्मतत्त्वे व धार्मिक विधी. (३) कायदा व समाजनियंत्रण–राजकीय व प्रशासकीय व्यवस्था. (४) आर्थिक मानवशास्त्र इत्यादींवर अधिक अभ्यास होणे आवश्यक आहे. सामाजिक मानवशास्त्रातील संशोधनामुळे बऱ्याच सामाजिक संबंधांवर प्रकाश पडला आहे. कुटुंबगटाची रचना व त्यातील व्यक्तींच्या सामाजिक भूमिका, नातेसंबंधीचे औद्योगिक व सामाजिक महत्त्व इत्यादी आपणांस समजू लागले आहे. विशेषतः लहान समाजातील सामाजिक संबंधांचा अभ्यास साकल्यपद्धतीने करण्याची जास्त निकड आहे. त्यावरून जे सिद्धांत निघतील, त्यांचा उपयोग विशाल व जटिल समाजांच्या अध्ययनासाठी करावयाचा आहे. त्या दृष्टीने आज सामाजिक मानवशास्त्रात सांख्यिकीय पद्धतीचा उपयोग दृढ झाला आहे.

पूर्वी मानवजातिविज्ञान व सामाजिक मानवशास्त्र या दोहोंत फरक केला जात नसे. रॅडक्लिफ–ब्राउन यांनी यांमधील भेद स्पष्ट केला आहे. मानवजातिविज्ञानात मानवसमूहांचे ऐतिहासिक दृष्ट्या अध्ययन करण्यात येते. मानवी संस्थांच्या उगमावर जास्त भर देण्यात येतो. सामाजिक मानवशास्त्रात आगम पद्धतीवर जास्त भर देण्यात येतो व सिद्धांत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. समाजविकासविषयक नियम शोधण्याचा प्रयत्न केला जातो. असे नियम प्रस्थापित झाल्यास सामाजिक मानवशास्त्राचा लोककल्याणाकरिता फार उपयोग होऊ शकेल. आदिवासींच्या चालीरीतींचा अभ्यास केवळ त्यांचा इतिहास समजावा म्हणून न करता, त्या चालीरीतींचा सामाजिक अर्थ, त्यांचे सामाजिक, मानसिक, नैतिक जीवनातील कार्य समजावून घेतले, तर त्याचा उपयोग प्रशासकास होऊ शकतो.

समीक्षक – शौनक कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा