आरोग्यपूर्ण जगण्याचे विज्ञान म्हणजे आरोग्यविज्ञान. आरोग्य ही प्रतिबंधात्मक व रक्षणात्मक संकल्पना आहे. त्यासाठी नेहमी आचरणात आणण्याच्या सर्व बाबी व पद्धतींचा यात समावेश होतो. ‘आरोग्य’ ही सकारात्मक संकल्पना असून त्यात शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्याचा समावेश होतो. मनुष्याला कोणताही रोग किंवा विकार नाही, याबरोबरच त्याच्या सर्व शरीरक्रिया सुरळीत व विनातक्रार चालू असणे, तो मनाने शांत, समाधानी व उत्साही असणे, त्याच्या भोवताली घडणार्‍या घटनांविषयी त्याला उत्सुकता असणे आणि भोवतालच्या बाबींशी त्याचा तणावरहीत, परस्परपूरक व परस्पर-हितकारी सहसंबंध असणे म्हणजे तो मनुष्य आरोग्यपूर्ण आहे, असे म्हणता येईल. म्हणून आरोग्य ही केवळ वैद्यकीय शास्त्राशी निगडित संकल्पना नसून व्यक्तीच्या रोजच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनातील अनेक क्षेत्रांशी संबंधित आहे. यासाठी प्रथम सर्वांना मानवी शरीराची माहिती आणि ते कसे कार्य करते, यांसंबंधी माहिती असणे गरजेचे आहे.

या संकल्पनेशी सुसंगत अनेक पध्दती व चालीरीती प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. यांपैकी काही पध्दती व चालीरीती समाज, संस्कृती व स्थळ-काळाप्रमाणे बदलल्या असून काही उपयुक्तता व वैज्ञानिक आधाराअभावी कालबाह्य झाल्या आहेत. मात्र, काही पध्दती प्रचलित असून त्या वैद्यकीय पध्दतींचा भाग झाल्या आहेत.

आरोग्यपूर्ण जीवनपध्दतीसंबधी परिपूर्ण संकल्पना आयुर्वेदात मांडलेली आढळते. हायजीन (आता, अ‍ॅलोपॅथीशी निगडित) या पाश्चिमात्य संकल्पनेमध्ये आरोग्यसंकल्पनेतील फक्त एकच स्वच्छताविषयी; विचार केलेला आहे, असा गैरसमज आहे. परंतु Hygiene हा शब्द Hygiea या ‘आरोग्य’ आणि ‘स्वच्छते’च्या ग्रीक देवतेच्या नावावरून आला असल्याने त्यात अर्थातच आरोग्य-संकल्पनेचा समावेश होतो.

श्वसनक्रियेतून शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा मिळते. श्वसनक्रियेतून अनेक क्रिया आणि प्रक्रिया (एकमेकांशी संबंधित असलेल्या) घडतात. या क्रियांतून पेशींमध्ये पोषक पदार्थातील जैवरासायनिक ऊर्जेचे रुपांतर होऊन शरीरासाठी ऊर्जा मिळते. शारीरिक आरोग्य राखण्यासाठी योग्य पध्दतीने दीर्घ श्वसन करणे (प्राणायाम) हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

योग्य व संतुलित आहार घेणे हेही महत्त्वाचे आहे. कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, क्षार-धातुके, पाणी व जीवनसत्त्वे हे अन्नघटक योग्य व पुरेशा प्रमाणात असलेल्या आहाराला संतुलित आहार असे म्हणतात. (पहा: संतुलित आहार) व्यक्तीचे वय, लिंग, कामाचे स्वरूप व विशेष गरजांप्रमाणे प्रत्येकासाठी संतुलित आहार वेगळा असू शकतो.

आहार बेताचा व ठराविक वेळी वारंवार घ्यावा; अन्न सावकाश व चावून खावे, पाणी भरपूर प्यावे; अन्न शिजविताना व प्रक्रिया करताना योग्य पध्दतींचा अवलंब करावा; अन्न हाताळताना, शिजविताना व खाताना स्वच्छता राखावी; कृत्रिम खाद्यपदार्थ, रंग व वासाचे पदार्थ वापरू नयेत. आहार घेताना मन प्रसन्न असावे. ही आहारासंदर्भात सर्वमान्य तत्त्वे आहेत.

धुम्रपान, मद्यपान, मादक द्रव्ये शरीराला अपायकारक असतात. या पदार्थांचे नियमित सेवन केल्यास सेवन करणार्‍या व्यक्ती या पदार्थांच्या आहारी जातात. त्यामुळे अशा व्यक्तींचे आरोग्य आणि पोषण या दोन्हींवर वाईट परिणाम होतो आणि सामाजिक स्वास्थ्यदेखील बिघडते.

शारीरिक कष्टाची कामे, क्रियाशील दिनचर्या व मैदानी खेळांमुळे आरोग्य चांगले राहते; परंतु बैठ्या कार्यपध्दतीमुळे शारीरिक क्रियांचा समतोल बिघडतो. म्हणून रोज नियमित व्यायाम करणे आवश्यक झाले आहे.

आरोग्यासाठी पुरेशी विश्रांती व शांत झोप महत्त्वाची आहे. या काळात शरीरातील अन्नसाठा भरून निघणे; दिवसभरातील शरीरक्रियांमुळे निर्माण झालेल्या दूषित व विषारी पदार्थांची विल्हेवाट लावणे, शरीराची झीज भरून काढणे तसेच दुरुस्तीची कामे करणे व शरीराची वाढ करणे (वाढीच्या वयात) आणि शरीर पुन्हा ताजेतवाने करणे, ही कामे सुरू असतात. आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रौढ व्यक्तीला कमीतकमी ७ ते ८ .५ तास झोप आवश्यक असते. लहान मुलांना अधिक झोपेची गरज असते.

वैयक्तिक शारीरिक स्वच्छता आरोग्याच्या रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शरीराची स्वच्छता आपोआप होत राहावी, अशी यंत्रणा शरीरात सतत कार्यक्षम व कार्यमग्न असते. उदा., मलमूत्र विसर्जन, अश्रूंनी डोळे सतत धुतले जाणे, तोंडातील लाळ व जिभेच्या हालचालींमुळे तोंड स्वच्छ राखणे, त्वचेच्या बाह्यथरातील मृत पेशी घर्षणाबरोबर बाहेर टाकल्या जाणे इत्यादी. शारीरिक स्वच्छतेसाठी य़ा क्रियांना अडथळा येणार नाही हे पाहणे व त्यांना पूरक क्रिया करणे आवश्यक असते.

चांगल्या आरोग्यासाठी चांगली दिनचर्यादेखील महत्त्वपूर्ण ठरते. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर डोळे, तोंड व चेहरा स्वच्छ धुणे, दात घासणे, जीभ, घसा व नाक साफ करणे इत्यादी आवश्यक आहे (झोपेत शरीराच्या स्वयं-स्वच्छता-यंत्रणांचे काम मंदावते). तसेच हवामान व कामाच्या स्वरूपाप्रमाणे अंग धुणे (भारतातील परिस्थितीनुसार रोज एक ते दोन वेळा) आवश्यक आहे. मल व मूत्र विसर्जनाच्या जागा व बाह्य जननेंद्रियांची स्वच्छताही तेवढीच महत्त्वाची आहे. स्त्रियांच्या बाबतीत, मासिकपाळीच्या दिवसांत बाह्य जननेंद्रिये, तसेच आतील कपड्यांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

खाण्यापूर्वी व खाण्यानंतर हात धुणे, भरपूर पाण्याने चुळा भरून तोंड धुणे व जरूरीप्रमाणे पुन्हा दात घासणे, बाहेरून आल्यावर व कामानंतर चेहरा, हात-पाय धुणे, स्वच्छ कपडे वापरणे, वापरातील वस्तू व घर स्वच्छ ठेवणे, घरातील कचर्‍याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावणे, घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे या स्वच्छतेच्या चांगल्या सवयी समजल्या जातात.

वैयक्तिक स्वच्छतेप्रमाणेच घराची स्वच्छता हा एक स्वतंत्र विषय आहे. त्यामध्ये घरातील पिण्याचे, वापराचे, साठवलेले, साचलेले व सांडपाणी यांची स्वच्छता व काळजी, अन्नपदार्थ, अन्नपदार्थ हाताळणार्‍या व्यक्ती, अन्नपदार्थ बनविण्यासाठी व साठविण्यासाठी वापरली जाणारी भांडी, पुसण्यासाठी वापरली जाणारी फडकी यांची स्वच्छता, सर्व प्रकारच्या (आतील, घरातील, घराबाहेर जाताना वापरण्याच्या, कामाच्या वेळी वापरण्याच्या, पुसण्याच्या) कपड्यांची स्वच्छता; मोरी, बेसीन, संडासाचे भांडे यांची स्वच्छता; इत्यादींचा समावेश होतो. घरातील आजारी माणसे व पाळीव प्राण्यांची स्वच्छता व काळजी घेणेही आवश्यक आहे. घरामध्ये भरपूर सूर्यप्रकाश येणे, घरातील हवा खेळती राहणे, धुळीचा बंदोबस्त करणे, घर आवरलेले व स्वच्छ राहील हे बघणे घरातील सर्वांच्याच आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. घरगुती स्वच्छतेप्रमाणे कामाच्या जागेची स्वच्छता महत्त्वाची आहे. त्याची तत्त्वे सर्वसाधारणपणे घराच्या-स्वच्छतेच्या तत्त्वाप्रमाणे आहेत.

आजूबाजूचा परिसर व संपूर्ण गावाची स्वच्छता ही संपूर्ण समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी महत्त्वाची आहे. रस्ते, गावातील मोकळ्या जागा, क्रिडांगणे, बस-रेल्वे-विमान स्थानके, बागा, बाजार, सिनेमा-नाट्यगृहे, सार्वजनिक इमारती व त्यांचा परिसर आणि मुख्यत: सार्वजनिक स्वच्छतागृहे अत्यंत स्वच्छ राहतील; कचरा कमीतकमी निर्माण होईल, योग्य जागी गोळा करून विल्हेवाट लावली जाईल, प्रदूषण वाढणार नाही, सार्वजनिक पाणीसाठे (तलाव, ओढे, नद्या व समुद्र) स्वच्छ राहतील, थुंकणे, शिंकरणे व मलमूत्रविसर्जन सार्वजनिक जागी केले जाणार नाही, इत्यादी सर्व बाबींची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची आहे.

औद्योगिक परिसर, रासायनिक व इतर कारखाने, रुग्णालये इत्यादींची विशेष स्वच्छता व विशेष प्रकारांनी (त्या-त्या ठिकाणी निर्माण होणार्‍या वैशिष्टपूर्ण व हानिकारक कचर्‍याच्या प्रकाराप्रमाणे) कचरा निमूर्लन यांची काळजी वेगळ्या दृष्टिकोनातून घ्यावी लागते आणि गरजेनुसार त्यावर उपाय योजावे लागतात.

वैद्यकीय स्वच्छता व प्रतिबंधक आरोग्यविज्ञान ही वेगळी शास्त्रे आहेत. वैद्यकीय स्वच्छतेमध्ये रुग्णाला इतरांपासून वेगळा ठेवणे, रुग्णामुळे व रुग्णालयांमध्ये निर्माण होणार्‍या विशिष्ट कचर्‍या चे (जैव-वैद्यकीय कचरा) वर्गीकरण करून त्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावणे, निरनिराळ्या ठिकाणांच्या (रुग्णकक्ष, मलमपट्टी-कक्ष, क्ष-किरण-कक्ष, शस्त्रक्रिया-कक्ष, स्वच्छतागृहे इत्यादी रुग्णालयातील जागा, शस्त्रक्रिया करण्याची जागा, उत्सर्जन इंद्रिये, जखमा, हात इत्यादी रुग्णाच्या शरीरावरील जागा व शस्त्रक्रियेची हत्यारे-उपकरणे- कपडे, कापडे इ.) निर्जंतुकीकरणाच्या व रोगजंतूच्या प्रसाराला अडथळा करणार्‍या पध्दती इत्यादी अनेक पध्दतींचा समावेश होतो. स्वच्छता, लशीकरण कार्यक्रम आणि संसर्गरोधी दवाखाने यांद्वारे रोगांवर नियंत्रण राखता येते.

या सर्व पध्दतींमध्ये हातांच्या स्वच्छतेचा विशेष उल्लेख करावा लागेल. आपण सर्व कामे हातांनी करत असल्याने हातांच्या स्वच्छतेकडे सर्वांनाच वेगवेगळ्या पध्दतींनी लक्ष द्यावे लागते. कामामुळे हातांना लागलेली घाण धुण्यासाठी कामानंतर हात धुणे आवश्यक आहेच. मुख्यत: मानवी (लहान मुले, वृध्द व आजारी माणसे) व प्राण्यांच्या मलमूत्राची, जखमांची, रक्ताची हाताळणी केल्यावर, न शिजवलेले मांस-मासे व इतर अन्न- पदार्थ स्वच्छ केल्यावर, रसायने धूळ व केरकचरा हाताळणीनंतर त्याची गरज असते. शस्त्रक्रिया, शुश्रुषा, मलमपट्टी, अन्नपदार्थ हाताळणी, पिण्याच्या व स्वच्छतेच्या पाण्याची हाताळणी या कामांआधीही हात स्वच्छ धुणे व जरुरीप्रमाणे त्याचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे हातात विशिष्ट प्रकारचे हातमोजे घालणेही आवश्यक असते. म्हणून साबणाचा वापर करून, हात घासूनचोळून भरपूर व वाहत्या पाण्यात धुतले पाहिजेत व कोरडे केले पाहिजेत.

सार्वजनिक आरोग्यात, समाजातील लोकांचे आरोग्य टिकून राहण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी केल्या जाणार्‍या प्रयत्‍नांचा समावेश होतो. शासकीय आरोग्य कार्यक्रम बहुतेक लोकांना आरोग्याच्या सेवा पुरवितात. त्यांखेरीज, अनेक स्वयंसेवी संस्था समाजातील मान्यवर, देणगीदार व्यक्तींकडून निधी जमवून कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यांसारख्या रोगांवर इलाज करण्यासाठी रुग्णालये उभारतात. यांद्वारे आरोग्यसुविधा, पुरवठा, आरोग्यासंबंधी नियमांचा प्रचार करतात आणि आरोग्यशिक्षणात मोलाची भर टाकतात. सार्वजनिक आरोग्य-कार्यक्रमाद्वारे समाजातील सर्व घटकांचे आरोग्यशिक्षण केल्यास त्याने वैयक्तिक तसेच सामाजिक स्वास्थ्य सुधारते.

वरील सर्व पध्दतींमध्ये रोगजंतूंचा प्रतिबंध करणे, त्यांच्या प्रसाराची साखळी तोडणे आणि घातक पदार्थांपासून (विषारी, रासायनिक व इजा करणारे पदार्थ) संरक्षण करणे ही समान तत्त्वे आढळतात. आरोग्यरक्षण व आरोग्य सुधारण्याच्या वरील सर्व पध्दतींना मिळून ‘आरोग्यविज्ञान’ असे म्हटले जाते. या पध्दतींत काळाप्रमाणे बदल व सुधारणा होत आलेल्या आहेत. वैज्ञानिक प्रगती, ज्ञान व तंत्रज्ञान यांच्या बरोबर आरोग्यविज्ञानातील प्रगती व सुधारणा ही सतत चालणारी प्रक्रिया आहे.