अश्रुग्रंथी

मनुष्याच्या डोळ्याच्या वरच्या पापणीत वसलेली अश्रू तयार करणारी ग्रंथी. बदामाच्या आकाराची ही ग्रंथी सतत अश्रू तयार करून ६ ते १२ नलिकांवाटे वरच्या पापणीच्या श्लेष्म त्वचेवर पसरवते. हे अश्रू डोळ्याच्या पुढच्या भागावर पसरतात व डोळ्यांच्या नाकाजवळच्या भागातील दोन छिद्रांकडे जातात. ही छिद्रे वरच्या व खालच्या पापणीत असलेल्या नलिकांवाटे (नासाश्रुवाहिनीवाटे) अश्रूंना अश्रुकोशात नेतात. या अश्रुकोशातून अश्रू नाकात जातात. अश्रूंमुळे डोळे सतत ओले राहतात. तसेच डोळ्यांत गेलेले धूलिकण अश्रूंवाटे बाहेर वाहून नेले जातात.

अश्रुग्रंथीद्वारे अश्रूंचे स्त्रवणे सतत होत असते. साधारणपणे दर खेपेला प्रत्येक ग्रंथी १ मिलि. अश्रू स्त्रवते. अश्रू प्रामुख्याने क्षारांचे द्रावण असून ते चवीला खारट असतात. अश्रूंमध्ये लायसोझाइम नावाचा विकर असतो. तो जीवाणुमारक असतो. त्याचबरोबर मेबोमियन ग्रंथीद्वारे तेलकट द्रव स्त्रवला जातो. हा तेलकट द्रव पापण्यांची उघडझाप होताना वंगणाचे काम करतो. एखादा झोंबणारा पदार्थ किंवा वायू डोळ्यात गेला की, या ग्रंथीद्वारे अश्रू जास्त प्रमाणात तयार होऊन डोळ्यातून तो पदार्थ बाहेर वाहून नेला जातो व धुतला जातो. भावनांचा आणि अश्रूंचाही जवळचा संबंध आहे. अतिआनंदाच्या किंवा अतिदु:खाच्या क्षणी अश्रु-ग्रंथींद्वारे जास्त प्रमाणात अश्रू स्त्रवले जातात. वय वाढले की अश्रुग्रंथीचे स्त्रवणे कमी होते व डोळे कोरडे होऊ लागतात. त्यामुळे डोळ्यांची आग होते.