टेंबुर्णीची पाने, फुले व फळे

टेंबुर्णी हा सदाहरित वृक्ष एबेनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव डायोस्पिरॉस एंब्रियॉप्टेरिस आहे. हा वृक्ष मूळचा भारत आणि दक्षिण-पूर्व आशिया येथील आहे, असे मानतात. डा. पेरेग्रिना या शास्त्रीय नावानेही तो वृक्ष ओळखला जातो. भारतात तो सर्वत्र आढळतो. खाडीजवळ, तसेच नदी-नाल्याच्या पात्रात हा मध्यम उंचीचा वृक्ष वाढलेला दिसतो.

टेंबुर्णी टेंबुर्णीचा वृक्ष सु. १० मी. उंच वाढतो. त्याची वाढ सावकाश होते. काही ठिकाणी तो सु. ३५ मी.पर्यंत वाढलेला असून त्याचा घेर सु. २ मी.पर्यंत असल्याचे आढळले आहे. खोडाची साल करडी काळी व गुळगुळीत असते. सालीचे तुकडे होऊन ते गळून पडतात. पाने साधी, मोठी, लांब व चकचकीत असून ती लहान देठाची, एकाआड एक, चिवट व भिन्न आकारांची असतात. फुले एकलिंगी, पांढरी व सुवासिक असतात. नर-फुले तीन ते पाचच्या झुबक्यात फांद्यांच्या टोकाला तर मादी-फुले एकेकटी येतात. फळ मृदू, मांसल, गोलसर व पिकल्यावर तांबूस-पिवळे होते. त्यात चवळीच्या आकाराच्या पाच ते आठ बिया असतात.

आयुर्वेदामध्ये साल व फळ यांच्या औषधी गुणांचा उल्लेख आहे. साल व फळ स्तंभक आहे. फळे तुरट व थंड असून त्यांचा गर वात व मूत्रदाहावर गुणकारी आहे. बियांचे तेल आमांशावर उपयुक्त आहे. पानांपासून विड्या तयार करतात. तेमरू (तेंडू) व टेंबुर्णी या जातींचे अनेक उपयोग सारखेच आहेत.


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.