पिंपळ हा पानझडी वृक्ष मोरेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव फायकस रिलिजिओजा आहे. पिंपळ मूळचा भारत, बांगला देश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि चीन या देशांतील आहे. वड व उंबर हे वृक्षदेखील मोरेसी कुलातील आहेत. मात्र पिंपळाला वडाप्रमाणे पारंब्या नसतात. भारतात हा वृक्ष अनेक गावांमध्ये मंदिराच्या आवारात तसेच पश्चिम बंगाल व मध्य प्रदेश येथील वनांमध्ये आढळून येतो.
पिंपळ वृक्ष सुमारे ३० मी. उंच वाढतो. पाने साधी, एकाआड एक व हृदयाकृती असून टोकाला निमुळती असतात. पानांचे देठ लांब असून पाने लोंबती असतात. उन्हाळ्यात पाने गळून पडतात. मात्र, त्याच वेळी नवीन पालवी येते. कोवळी पाने तांबूस तपकिरी असून ती नंतर हिरवी होतात. फुले उंबराप्रमाणे घागरीसारख्या आकाराच्या कुंभासनी फुलोऱ्यात येतात. फुलोऱ्यात नर-फुले आणि मादी-फुले असतात. परागण कीटकांमार्फत होते. फळ औदुंबरिक प्रकारचे असून जांभळे किंवा काळे असते. पक्ष्यांमार्फत बियांचा प्रसार होतो. पक्ष्यांच्या विष्ठेतून पिंपळाचे बी कोठेही नेले जाते. ते रुजून पिंपळाची झाडे अनपेक्षित ठिकाणी उगवलेली दिसतात.
पिंपळाचे लाकूड मजबूत नसल्यामुळे घरबांधणीसाठी वापरत नाहीत. मात्र त्यापासून खोकी, आगपेट्या, फळ्या इ. तयार करतात. जळणासाठीही ते वापरतात. साल स्तंभक असते. फळे सारक असून बिया शीतक असतात. दमा, मधुमेह, आमांश, पोटाचे विकार तसेच चक्कर येणे यांवर हा वृक्ष गुणकारी आहे, असा उल्लेख आयुर्वेदात आहे.
https://www.youtube.com/watch?v=TBx2hDSmS38
i like your website