शरीरामधील रक्तातील त्याज्य घटक बाहेर टाकण्याचे काम मुख्यतः मूत्रपिंडाद्वारे (वृक्काद्वारे) होते. काही कारणाने मूत्रपिंडे निकामी झाल्यास ती रक्तातील त्याज्य घटक ती बाहेर टाकू शकत नाहीत. अशा वेळी कृत्रिम यंत्रणा वापरून घातक घटक रक्तातून काढावे लागतात. ही यंत्रणा अपोहन तत्त्वावर कार्य करत असल्याने या पद्धतीलाही ‘अपोहन’ असे म्हणतात. अपोहन यंत्रणेत पुढीलप्रमाणे दोन प्रकार आहेत.
रुधिरापोहन
यात कृत्रिम मूत्रपिंड यंत्र वापरले जाते. यातील नळ्या हातातील रोहिणी व नीला यांना जोडाव्या लागतात. रोहिणीची नळी एका अर्धपार्यपटलाच्या नळीला जोडलेली असते. या अर्धपार्यपटलाभोवती अपोहन द्राव असतो. या नळीतून रक्त वाहते, त्यावेळी रक्तातील त्याज्य घटक अपोहन द्रावात जातात व या द्रावातील पोषक द्रव्ये रक्तात येतात. अपोहन द्राव सतत बदलत ठेवला जातो. त्यामुळे हा द्राव व रक्त यांचे क्षार प्रमाण सारखे राहते. अशा तर्हेने विषमुक्त केलेले रक्त पुन्हा नळीवाटे नीलेत जाते. रुधिरापोहन ६ ते ८ तास चालते. आठवड्यातून निदान तीन वेळा तरी हे करावे लागते. रुधिरापोहनाला वेळ खूप लागतो व ते रुग्णालयामध्येच करावे लागते.
आंत्रावरण अपोहन
या पद्धतीत आंत्रावरण (पेरिटोनियम) याचा अर्धपार्यपटल म्हणून वापर केला जातो. अपोहन द्राव शरीराबाहेर असलेल्या प्लॅस्टिकच्या बाटलीतून गुरुत्वाकर्षणाने नलिकेवाटे उदरात येतो. आंत्रावरण पटल दोन्ही बाजूंच्या घटकांची अदलाबदल पटकन करते. वापरल्या गेलेल्या द्रावात रक्तातील त्याज्य घटक उतरतात. हा द्राव प्लॅस्टिकच्या बाटलीत जमा होतो. तो फेकून दिला जातो. या तर्हेचे अपोहन सुटसुटीत असल्यामुळे ते घरामध्ये करता येते. त्यासाठी रुग्णाला रुग्णालयामध्ये दाखल व्हावे लागत नाही. सोयीस्कर असले तरी या अपोहनात नलिकेमुळे जंतुसंसर्गाची भीती असते.
अपोहन यंत्रणेने रक्तातील नायट्रोजनयुक्त पदार्थांचा त्याग केला जातो, रक्तातील आम्लता व कोलेस्टेरॉल नियंत्रित केले जातात आणि रक्तातील आयनांचा समतोल ठेवला जातो.