वर्षायू शिंबावंत वनस्पती. चवळी ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना अंग्युईक्युलेटा आहे. अगस्ता, उडीद आणि गोकर्ण इ. वनस्पती याच कुलात समाविष्ट आहेत. या वनस्पतीच्या चार उपजाती आहेत. आशिया, आफ्रीका, दक्षिण यूरोप आणि दक्षिण तसेच मध्य अमेरिकेतील कोरडवाहू भागातील लोकांच्या अन्नात या वनस्पतीच्या बियांचा व पालेभाजीचा समावेश होतो. कोरडवाहू प्रदेशातील वातावरणानुसार ही वनस्पती अनुकुलित झाली असून रेताड जमिनीतही ती जोमाने वाढते. हिच्या मुळांद्वारे वातावरणातील नायट्रोजनाचे स्थिरीकरण घडून येत असल्यामुळे ती एक उपयुक्त वनस्पती आहे.

चवळीच्या शेंगा व बिया

चवळी ही झुडपासारखी भासणारी रोमहीन वेल आहे. पाने एकाआड एक, संयुक्त, त्रिदली व पातळ पिसांसारखी असतात. पर्णिका ७.५‒१५ सेंमी. लांब असतात. फुलोरे पानांच्या बगलेत येत असून फुले पांढरी, निळसर, जांभळी, पिवळसर किंवा लालसर असतात. शेंगा १०‒६० सेंमी.लांब, गोलसर व बियांच्या दरम्यान दबलेल्या असतात. शेंगांमध्ये बिया १०‒२० असून बियांचा आकार, आकारमान आणि रंग यांमध्ये विविधता आढळते. बियांना तपकिरी रंगाचा डोळा असतो. तिला नाभी म्हणतात.

चवळीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. तसेच उत्तम चारा म्हणूनही पाला जनावरांना खायला देतात. चवळीच्या बियांपासून प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. शाकाहारी अन्नात चवळीच्या पानात असलेल्या प्रथिनांपासून सर्वात जास्त उष्मांक मिळतात. बी आम्लीय, सारक, मूत्रल, कफ-पित्तनाशक व पचनास जड असते. तसेच खायला रुचकर लागते. वाळलेल्या बियांची उसळ करतात. तमिळनाडू राज्यात चवळीपासून अनेक गोड पदार्थ बनविले जातात.