आशिया खंडातील येमेन आणि आफ्रिका खंडाच्या ईशान्य भागातील जिबूती व एरिट्रिया या देशांदरम्यान स्थित असणारी सामुद्रधुनी. या सामुद्रधुनीमुळे तांबडा समुद्र एडनच्या आखाताशी जोडला गेला आहे. एडनचे आखात हा अरबी समुद्राचा पश्चिमेकडील फाटा असून तांबडा समुद्र हा सुएझ कालव्याने भूमध्य समुद्राशी जोडलेला आहे. १८६९ मध्ये सुएझ

कालवा खुला केल्यामुळे तो तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांच्यातला दुवा झाला आहे. येमेनमधील रास मेनहेलीपासून जिबूतीमधील रास शीयान यांदरम्यान सामुद्रधुनीची रुंदी ३२ किमी. आहे. या सामुद्रधुनीत स्थित असलेल्या पेरिम बेटामुळे तिचे दोन भाग होतात. त्यांपैकी पश्चिमेकडील डॅक्ट – एल् – मायून या नावाने ओळखला जाणारा भाग २६ किमी रुंद आणि ३१० मी. खोल, तर बाब इस्केंदर (अलेक्झांडरची सामुद्रधुनी) या नावाने ओळखला जाणारा पूर्वेकडील हा भाग ३ किमी रुंद आहे. जिबूतीच्या किनाऱ्याजवळ छोट्या छोट्या बेटांचा समूह असून तो ‘सेव्हन ब्रदर्सʼ या नावाने ओळखला जातो. या सामुद्रधुनीमुळे एडनचे आखात आणि तांबडा समुद्र यांच्यात समुद्रजलाचे अभिसरण होते.

बाब – एल् – मांदेब या सामुद्रधुनीच्या नावाचा अरेबिकमधील अर्थ ‘अश्रुंचे द्वार’ असा होतो. पूर्वी या सामुद्रधुनीमधून प्रवास करीत असताना अनेक संकटांना सामना करावा लागत असे. ज्यामधे मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानीही होत असे. त्यामुळे या सामुद्रधुनीस बाब – एल् – मांदेब (अश्रुंचे द्वार) असे नाव पडले आहे. या सामुद्रधुनीचा वापर जलवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जात असून त्यास सागरी वाहतुकीचा सर्वांत महत्त्वाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते.  सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर या सामुद्रधुनीला भौगोलिक आणि आर्थिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भूमध्य समुद्र, हिंदी महासागर आणि आशियातील देशांशी व्यापारी जलमार्गाने जोडणारी बाब – एल् – मांदेब ही सर्वांत छोटी व अत्यंत महत्त्वाची सामुद्रधुनी आहे. यूरोप व आशिया खंडांतील मालवाहतूक तसेच मध्यपूर्वेतील देशांकडून यूरोप आणि उत्तर अमेरिकेकडे सुएझ कालव्यामार्गे होणारी खनिज तेलाची वाहतूक याच सामुद्रधुनीतून करावी लागते. ऊर्जा माहिती प्रशासनाच्या अंदाजानुसार २०१६ या वर्षी दर दिवशी ४.८ दशलक्ष पिपे कच्च्या तेलाची आणि पेट्रोलियमच्या उत्पादनांची आवक-जावक या सामुद्रधुनीमधून झाली आहे. एकट्या सौदी अरेबियाने दर दिवशी सहा लक्ष पिपे खनिज तेल यूरोप आणि उत्तर अमेरिकेला निर्यात केले आहे. यांशिवाय प्रतिदिन ३,३०,००० पिपे खनिज तेल हे सौदीच्या रास तानूरा या मुख्य निर्यात सुविधाकेंद्राकडून तांबड्या समुद्रातील येन्बो या बंदराकडे आशियाई देशांना पुरवठा करण्यासाठी पाठवले गेले होते.

बाब – एल् – मांदेब ही सामुद्रधुनी भूराजनीतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची राहिली आहे. येमेनमधील हूतू या फुटीरतावाद्यांचा उठाव आणि त्यांचा येमेन सरकारबरोबरील संघर्ष हा गंभीर मुद्दा सामुद्रिक व्यापाराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उमटवीत आहे. या सामुद्रधुनीवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी हूतू फुटीरतावाद्यांनी सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमीर राज्ये, अमेरिका आणि यूरोप यांच्या तेल जहाजांवर हल्ले केल्यामुळे या सामुद्रधुनीतील व्यापार बऱ्याच वेळा स्थगित करण्यात आला आहे. अल्-कायदा, इसिस आणि शाहबाब अशा दहशतवादी संघटनांच्या कारवायाही या सामुद्रधुनीतील व्यापारासाठी त्रासदायक ठरतात. या सामुद्रधुनीवर येमेन आणि जिबूती यांना जोडणारा ‘ब्रिज ऑफ द हॉर्न्सʼ नावाचा पूल बांधण्याची योजना आहे.

समीक्षक – वसंत चौधरी

प्रतिक्रिया व्यक्त करा