डेरोझिओ, हेन्री लुई व्हिव्हिअन : (१८ एप्रिल १८०९–२६ डिसेंबर १८३१).
बंगालच्या पुनरुज्जीवनवादी चळवळीचे एक प्रमुख नेते आणि प्रसिद्ध इंडो-अँग्लिअन कवी. त्यांचा जन्म कोलकात्याजवळील (पूर्वीचे कलकत्ता) पद्मापकुर येथे एका यूरोपियन कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव फ्रान्सिस. वडील पोर्तुगीज, तर आई भारतीय होती. वडिलांनी त्यांना वयाच्या आठव्या वर्षी स्कॉटिश शिक्षक डेव्हिड ड्रुमाँड यांच्या शाळेत शिक्षणासाठी दाखल केले. वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत त्यांनी तेथे शिक्षण घेतले. त्यांचे वडील ज्या कंपनीत काम करीत होते तेथेच त्यांनी १८२३ पासून कारकुनाची नोकरी केली. डेरोझिओ पुढे भागलपूर येथे स्थलांतरित झाले. तेथे त्यांनी चुलत्याच्या निळीच्या मळ्यामध्ये (indigo plantation) काम केले. गंगा नदीच्या तटावरील निसर्गसौंदर्य पाहून त्यांनी कविता रचल्या. त्यांना इंग्रजीतील पहिले भारतीय कवी म्हणून ओळखले जाते.
वयाच्या १७ व्या वर्षी डेरोझिओ यांची हिंदू कॉलेजमध्ये इंग्रजी साहित्य आणि इतिहास या विषयांचे शिक्षक म्हणून नियुक्ती झाली (१८२६). १८२८ मध्ये त्यांना बढती मिळाली. त्यांच्या प्रभावी विचारांमुळे अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यातूनच ‘यंग बंगाल चळवळʼ सुरू झाली. त्यांनी सुधारणाविषयक अनेक विषयांवर वादविवाद घडवून आणले. त्या माध्यमातून ते हिंदू धर्म, समाज आणि संस्कृती यांकडे चिकित्सकपणे पाहत असत. त्यांनी सतीप्रथेविरोधात टीका केली. डेरोझिओ विद्यार्थ्यांना नास्तिक बनवितात; तसेच त्यांच्या समर्थकांनी सरस्वती नावाच्या विधवेला सती जाण्यापासून रोखले या कारणांमुळे त्यांना कॉलेजमधून बाहेर काढले.
हिंदू कॉलेजमध्ये असताना डेरोझिओ यांनी विद्यार्थ्यांसोबत ‘ॲकेडेमिक असोसिएशनʼ स्थापन केली. त्यामध्ये हिंदू कॉलेजमधील विद्यार्थी एखाद्या समकालीन सामाजिक विषयावर चर्चा, वादविवाद करत. या असोसिएशनने पर्थेनोन नावाचे नियतकालिक चालविले होते; परंतु त्याचा फक्त एक अंकच प्रकाशित झाला. ‘यंग बंगाल चळवळʼ ही बंगालमधील जहालवादी विचार करणाऱ्या तरुणांचा गट होता आणि तो कोलकाता येथील हिंदू कॉलेजमधून तयार झाला होता. त्यांना ‘डेरोझियन्सʼ (Derozians) असेदेखील म्हटले गेले. डेरोझिओ यांनी धर्माची चिकित्सा अत्यंत परखडपणे केली. ते उदारमतवादी विचारांचे होते.
डेरोझिओंनी एक नामांकित पत्रकार म्हणूनही योगदान दिले. ते इंडियन गॅझेटचे उपसंपादक होते. तसेच केलोडोस्कोपचे संपादक म्हणूनही वर्षभर काम केले. दि इन्क्वायरर, दि कलकत्ता लिटररी या नियतकालिकांसाठी त्यांनी योगदान दिले. दि कलकत्ता मॅगझीन, दि इंडियन मॅगझीन, दि बंगाल ॲन्युअल यांमधून ते नियमितपणे लेखन करीत. कॉलेजमधून काढल्यानंतर त्यांनी ईस्ट इंडिया नावाचे दैनिक सुरू केले.
इंडियन गॅझेटचे संपादक जॉन ग्रांट यांच्या प्रोत्साहनामुळे डेरोझिओ यांनी त्यांच्या कविता एकत्र केल्या आणि ‘जुवेनिसʼ या टोपणनावाने त्या प्रकाशित केल्या (१८२७). तेव्हा त्यांचे वय अवघे १७ वर्षे होते. १८२८ मध्ये त्यांनी कवितांचा दुसरा खंड प्रकाशित केला. ती पहिल्या खंडाची पुनरावृत्तीच होती; फक्त त्यात काही नवीन कविता समाविष्ट होत्या. ‘टू इंडिया – माय नेटिव्ह लँडʼ, ‘फ्रीडम टू दि स्लेव्हʼ, ‘दि ऑर्फन गर्लʼ (१८२७) ह्या त्यांच्या महत्वाच्या कविता. ‘द फकीर ऑफ जुन्घीरा, अ मेट्रिकल टेलʼ (१८२८) ही त्यांची विशेष उल्लेखनीय कविता. या कवितेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. तीत त्यांनी सतीच्या प्रथेविषयीचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ही काव्यरचना दोन सर्गांमध्ये आहे. अत्यंत हृदयस्पर्शी अशी ही कविता असून तीमधून कवीची उत्कृष्ट काव्यशैली प्रत्ययास येते. उदारमतवाद, पारतंत्र्याविषयी चीड, प्रागतिक दृष्टीकोन इत्यादी विषयांवर त्यांनी काव्यरचना केल्या. डेरोझिओ यांना पहिले इंडो-अँग्लिअन कवी मानले जाते.
१८३१ मध्ये डेरोझिओ यांचे विद्यार्थी कृष्णमोहन बंदोपाध्याय (रेव्हरंड के.एम.बॅनर्जी या नावानेही परिचित) यांनी इंग्रजी पत्रक दि इनक्वायरर, तसेच त्यांचे इतर विद्यार्थी दक्षिनरंजन मुखर्जी आणि रसिक कृष्ण मल्लिक यांनी दि जननेस्वन (Jnananneswan) हे बंगाली वृत्तपत्र सुरु केले. याच काळात राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. त्यांनी हिंदू धर्मातील सनातनवादाला आव्हान दिले. त्यामध्ये डेरोझिओ यांचे अनेक विद्यार्थी सामील झाले होते.
डेरोझिओ यांचे कलकत्ता येथे वयाच्या २२ व्या वर्षी कॉलऱ्यामुळे निधन झाले.
संदर्भ :
- Choudhari, Rosinka, Ed., Derozio, Poet of India, Oxford, 2008.
- McDermott, Rachel Fell; Gordon, Leonard A. & others Eds., Sources of Indian Traditions : Modern India, Pakistan and Bangladesh, Third Edition, New York, 2015.
- Sarkar, Sumit, Writing Social History, New Delhi, 1997.
- Spear, Percival, A History Of India : From The Sixteenth Century to The Twentieth Century, Vol. 2, New Delhi. 1998
समीक्षक – अरुण भोसले