ट्रॉट्‌स्की, लीअन (७ नोव्हेंबर १८७९–२१ ऑगस्ट १९४०).

रशियन क्रांतिकारक नेता. लेनिनने क्रांती केली, स्टालिनने नवा रशिया निर्माण केला आणि ट्रॉट्‌स्कीने क्रांतीबरोबर संघटनाकार्य केले. रशियाचा पहिला विदेशमंत्री, लालसेनेचा रचनाकार व युद्धमंत्री (१९१८–२५) आणि कम्युनिस्ट इंटरनॅशनलचा एक प्रस्थापक म्हणून नव्या रशियाच्या उभारणीसही त्याने हातभार लावला. प्रतिभाशाली लेखक, प्रभावी वक्ता, बुद्धिमान पक्षनेता आणि क्रांतीवर विश्वास असलेला ध्येयवादी कम्युनिस्ट अशा विविध नात्यांनी ट्रॉट्‌स्कीचे व्यक्तिमत्त्व संपन्न होते. त्याचा जन्म युक्रेनमधील खेरसॉन प्रांतातील ईव्हानफ्क या गावी झाला. ट्रॉट्‌स्की हे टोपणनाव; मूळ नाव ल्येव्ह डव्हिडव्ह्यिच ब्रनश्टाइन. त्याचे वडील अशिक्षित पण सधन शेतकरी होते. वंशाने ते ज्यू होते. लहानपणापासून ट्रॉट्‌स्कीला शिक्षण देण्याची वडिलांची इच्छा होती. ट्रॉट्‌स्कीनेही त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. वयाच्या नवव्या वर्षी तो ओडेसा शहरी शिक्षणासाठी गेला. शाळेत त्याने आपल्या बुद्धीची चमक दाखविली. साहित्य आणि भाषा यांचा त्याने अभ्यास केला. वयाच्या अठराव्या वर्षापासून क्रांतिकारक चळचळीशी त्याचा संबंध आला. त्यापायी त्याला शाळा सोडावी लागली.

१८९६ मध्ये काळ्या समुद्राच्या युक्रेनियन या बंदरावर स्थलांतरित झाल्यानंतर ट्रॉट्‌स्की क्रांतिकारी घडामोडींमध्ये सक्रिय झाला. १८९७ च्या सुरुवातीला त्याने निकोलायिव्ह या ठिकाणी दक्षिण रशियन कामगारांची संघटना उभी करण्यासाठी मदत केली. औद्योगिक कामगार आणि विद्यार्थ्यांमध्ये समाजवादी विचारधारेचा प्रसार  करण्यासाठी ट्रॉट्‌स्कीने लेखन केले व विविध पत्रके वाटली. जानेवारी १८९८ मध्ये या संघटनेच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. त्यामध्ये ट्रॉट्‌स्कीचादेखील समावेश होता. या घटनेच्या न्यायालयीन सुनावणीच्या दोन वर्षांच्या काळात त्याला विविध तुरुंगांत जावे लागले. मॉस्कोच्या तुरुंगात त्याचा इतर क्रांतिकारकांशी संबंध आला व तिथे त्याला पहिल्यांदा न्यिकलाय लेनिनबद्दल माहिती मिळाली व त्याच्या पुस्तकांची ओळख झाली. विस्तृत वाचन आणि अमोघ वक्तृत्व यांच्या जोरावर तो त्याच्या परिसरातील मार्क्सवादी तरुणांचा पुढारी बनला.

१८९९ मध्ये ट्रॉट्‌स्कीचा विवाह अलेक्सांद्र सोकोलोवस्काया या मार्क्सवादी मैत्रिणीशी झाला. सुरुवातीच्या काळात तो मार्क्सवादी विचारसरणीच्या विरोधी होता; परंतु त्याच्या पत्नीच्या माध्यमातून तो मार्क्सवादाकडे वळला. १९०० मध्ये त्याला सायबेरिया येथे चार वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले. १९०२ मध्ये सायबेरियामधून पलायन केले व तो लंडनला गेला. तेथे असताना तो जॉर्ज प्लेखानोव्ह, न्यिकलाय लेनिन, जुलीयस मार्तोव्ह या इस्क्रा वृत्तपत्राच्या संपादकांसोबत सामील झाला आणि त्यात ‘पेरोʼ या टोपणनावाने त्याने लेखन केले. इस्क्राचा तो महत्वपूर्ण लेखक होता. पुढे इस्क्राच्या संपादकीय मंडळामध्ये फूट पडली. यामधील एक गट प्लेखानोव्ह आणि दुसरा लेनिन व मार्तोव्ह यांच्या नेतृत्वाने प्रभावित होता. यावेळी लेनिनने ट्रॉट्‌स्कीला संपादकीय मंडळावर आपल्या बाजूने घेण्याची विनंती इतर सदस्यांना केली; परंतु प्लेखानोव्हच्या विरोधामुळे तो मंडळाचा पूर्णवेळ सदस्य झाला नाही. १९०३ मध्ये ट्रॉट्‌स्कीने नतालिआ इवनोव्हा सेडोव्हा (१८८२–१९६२) हिच्याशी दुसरा विवाह केला.

१९०५ मध्ये रशियात सेंट पीटर्झबर्ग येथे रशियन सरकारच्या विरोधात संघर्ष सुरू झाला. या क्रांतीच्या वेळी ९ जानेवारी १९०५ ला राजवाड्यातील सुरक्षारक्षकांनी आंदोलनकारी जनतेवर गोळ्या झाडल्या. यामध्ये सु. १००० लोक मृत्युमुखी पडले. या हिंसेमुळे पुढे हा दिवस ‘काळा रविवार’ म्हणून ओळखला जाऊ लागला. या हिंसक घडामोडीनंतर ट्रॉट्‌स्की गुप्तपणे फेब्रुवारी १९०५ मध्ये रशियात परत आला. नंतर तो राजधानी सेंट पीटर्झबर्ग येथे गेला. तेथे त्याने बोल्शेव्हिक आणि मेन्शेव्हिक या दोन्ही क्रांतिकारी समित्यांसोबत काम केले. सेंट पीटर्झबर्ग येथे झालेल्या झारशाहीविरुद्ध उठावाचे त्याने नेतृत्व केल्यामुळे तो पुन्हा तुरुंगात डांबला गेला. तेव्हाच त्याने कायमची क्रांती या आपल्या पुस्तकाची सैद्धांतीक मांडणी केली (१९०६). नंतर तो तुरुंगातून यूरोपात पळाला व १९०९ मध्ये तो पुन्हा रशियात आला. काही दिवस भूमिगत राहिल्यावर त्याला अटक करण्यात आली. तुरुंगात काही दिवस काढल्यावर पुन्हा पश्चिम यूरोपात तो पळून गेला. त्याने व्हिएन्ना येथून प्रावदा नावाचे वर्तमानपत्र सुरू केले.

१९१७ च्या रशियन क्रांतीनंतर बोल्शेव्हिक सत्तेवर आले. त्या सरकारमध्ये ट्रॉट्‌स्कीची परराष्ट्र व्यवहारखात्याचा लोकायुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. त्याने २० डिसेंबर १९१७ ते १० फेब्रुवारी १९१८ या पहिल्या महायुद्धाच्या काळात शांतता वाटाघाटींसाठी रशियाच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. फेब्रुवारी १९१८ मध्ये जर्मनीच्या आक्रमणाला प्रतिकार करण्यात जे अपयश आले, त्यात लाल सैन्याची कमकुवतता समोर आली. ट्रॉट्स्कीने सैन्यांच्या संदर्भातील समस्या ओळखली आणि सैन्यसमिती स्थापन करण्याचा प्रयत्न केला. लेनिन आणि बोल्शेव्हिक केंद्रीय समितीने हे मान्य करून ४ मार्च १९१८ ला सर्वोच्च सैन्य परिषद स्थापन केली. पुढे ट्रॉट्स्कीने परराष्ट्र व्यवहारखात्याचा लोकायुक्त पदाचा राजीनामा दिला (१३ मार्च १९१८) व नंतर त्याची नेमणूक सैनिकी व नाविक व्यवहारखात्याचा लोकायुक्त म्हणून करण्यात आली. टेररिझम अँड कम्युनिझम  (१९२०), लेनिन  (१९२५), लिटेरचर अँड रेव्होल्यूशन (१९२५), हिस्टरी ऑफ द रशियन रेव्होल्यूशन, (तीन खंड, १९३१–३३), स्टालिन स्कूल ऑफ फॉल्सिफिकेशन  (१९३७) हे त्याचे काही उल्लेखनीय ग्रंथ. माय लाइफ  (१९३०) हे त्याचे प्रसिद्ध आत्मचरित्र. आपल्या लेखनातून त्याने मुख्यतः रशियन जनतेला झारशाहीविरुद्ध लढा देण्यास उत्तेजित केले. तथापि पक्षाच्या संघटनेवर नियंत्रण ठेवण्यात मात्र त्याला यश आले नाही. त्याच्या अपयशाचे हेच मुख्य कारण होते.

रशियातील डाव्या चळवळीला विविध धोरणांच्या बाबतीत आलेले अपयश आणि १९२० मधील जोझेफ स्टालिनचा उदय आणि नोकरशाही तंत्राचा सोव्हिएट संघात वाढता हस्तक्षेप यांमुळे ट्रॉट्स्कीला सैनिकी व नाविक लोकायुक्त पदावरून बरखास्त करण्यात आले (१९२५). त्याचप्रमाणे त्याला विविध समित्यांतून काढून टाकण्यात आले. तरीदेखील स्टालिनच्या नोकरशाहीला तो विरोध करत राहिला. रशियातील १९१७ मधील क्रांती घडवून आणण्याचे श्रेय लेनिनच्या खालोखाल ट्रॉट्‌स्कीला द्यावे लागेल. सातत्यशील आंतरराष्ट्रीय क्रांती हीच खरी समाजवादी क्रांती बनू शकते, असे ट्रॉट्स्कीचे मत होते, स्टालिनला ते मान्य नव्हते. लेनिनच्या निधनानंतर त्याचा व स्टालिनचा मतभेद वाढत जाऊन सत्तासंघर्ष सुरू झाला. त्यात स्टालिन यशस्वी झाला. ट्रॉट्‌स्कीला रशियातून हद्दपार करण्यात आले. स्टालिनच्या हुकूमशाहीने त्याचा पिच्छा सोडला नाही. या देशातून त्या देशात हकालपट्टी होत होत ट्रॉट्‌स्की अखेरीस मेक्सिकोमध्ये स्थायिक झाला. तेथे स्टालिनने १९४० साली आपल्या रोमन मर्काडेर या स्पॅनिश हस्तकाकरवी त्याचा खून केला. रशियात त्याची मुलेही स्टालिनच्या द्वेषाला बळी पडली.

संदर्भ :

  • Deutscher, Isaac, The Prophet Armed Trotsky : 1879–1921, London, 1954.
  • Deustscher, Isaac, The Prophet, Outcast Trotsky : 1929–1940, New York, 1963.
  • Deutscher, Isaac, The Prophet Unarmed Trotsky : 1921–1929, London, 1959.
  • Wolfe, B. D. Three Who Made a Revolution, Toronto, 1948.

समीक्षक – अरुण भोसले

प्रतिक्रिया व्यक्त करा