रशियन धोरण आणि जागतिक क्रांती यासंबंधी क्रांतिकारक लीअन ट्रॉट्‌स्की याने मांडलेले विचार म्हणजे ट्रॉट्‌स्कीवाद. लेनिनच्या मृत्यूनंतर साम्यवादी क्रांतीच्या ध्येयधोरणासंबंधी ट्रॉट्‌स्की आणि स्टालिन यांच्यातील मतभेद वाढू लागले. आर्थिक कार्यक्रम, पक्षाची संघटना आणि परराष्ट्र धोरण या तीनही क्षेत्रांत त्यांचे संघर्ष विकोपाला गेले आणि शेवटी ट्रॉट्‌स्कीला रशियाबाहेर हद्दपार करण्यात आले. या संघर्षाच्या काळात ट्रॉट्‌स्कीने हे मूलभूत विचार मांडले.

लेनिनचा मृत्यू १९२४ मध्ये झाला. त्या वेळेपर्यंत पश्चिम यूरोपातील कम्युनिस्ट पक्षांचे अपयश रशियन नेत्यांच्या लक्षात आले होते. जागतिक क्रांती करणे त्या वेळी तरी अशक्य आहे, याची वास्तव जाणीव स्टालिनलाही होऊ लागली. त्यामुळे त्याने ‘एकाच देशात समाजवाद’ असे धोरण घोषित केले. रशियाने आपल्या देशातील क्रांती अधिक दृढ करावी, जगातील कामगारांना आदर्श वाटेल अशी समाजरचना निर्माण करावी आणि मग त्या देशातील कामगारांना क्रांतीला उद्युक्त करावे, अशी स्टालिनच्या घोषणेमागची भूमिका होती; पण ट्रॉट्‌स्कीला ही भूमिका मान्य नव्हती. त्याच्या मते क्रांतीचे वातावरण सर्व देशांमध्ये पसरवून तापवीत ठेवण्याचे कार्य रशियाने करावे. त्यासाठी इतर देशांतील कम्युनिस्ट पक्षांना सर्व मार्गांनी साहाय्य करावे, त्यांच्या संघटना कार्यप्रवण कराव्यात, कामगारांना क्रांतीसाठी प्रोत्साहन द्यावे आणि अशा प्रकारे मार्क्सवादाचे जागतिक कामगारक्रांतीचे स्वप्न साकार करावे, या दोन परस्परविरोधी विचारांवर रशियाच्या कम्युनिस्ट पक्षात कडाक्याची चर्चा होऊ लागली. प्राथमिक पक्ष केंद्रापासून पॉलिटब्यूरो (मुख्य कार्यकारी समिती) पर्यंत सर्व पातळ्यांवर या वादाने धुमश्चक्री माजवली. पत्रके, पुस्तके आणि इतर साहित्य यांच्या द्वारे दोन्ही गटांकडून जोराने प्रचार होऊ लागला. सतत तीन वर्षे हा संघर्ष चालू होता. एप्रिल १९२५ मध्ये भरलेल्या रशियन कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीने प्रथम स्टालिनला अनुकूल असा निर्णय घेतला. त्यानंतर ऑक्टोबर १९२६ आणि डिसेंबर १९२७ या दोन वेळा भरलेल्या अनुक्रमे चौदाव्या व पंधराव्या पक्षपरिषदांनी मध्यवर्ती समितीच्या निर्णयाला मान्यता दिली. त्यामुळे ट्रॉट्स्कीवादाचा रशियन कम्युनिस्ट पक्षापुरता तरी पराभव झाला.

ट्रॉट्स्कीवादातील एक महत्त्वाचा मुद्दा असा, की जगात मोठ्या प्रमाणावर कारखानदारीची वाढ झाल्यानंतर जग ही एक बाजारपेठ बनून सर्व देशांचे निकटचे संबंध निर्माण होतात. त्यामुळे त्यांचे आर्थिक धोरणही एकमेकांवर अवलंबून राहते. अशा परिस्थितीत कामगारवर्गाच्या हितसंबंधांना अधिक प्रोत्साहन देण्यात आले, तर वर्गीय संघर्ष तीव्र होत जाईल आणि मग कोणत्याही एका देशात समाजवादी क्रांतीची ज्योत पेटली, तरी तिचे लोण जगभर पसरून जागतिक क्रांती घडून येईल. कार्ल मार्क्सनेच क्रांतीसंबंधी अशी मीमांसा केली आहे आणि रशियन क्रांतीच्या यशानंतर ती अधिक वास्तव ठरली आहे.

ट्रॉट्स्कीवादाचा दुसरा एक मुद्दा असा, की केवळ एकाच देशात समाजवादी क्रांती करून स्वस्थ बसावयाचे ठरविले, तरी आजूबाजूची भांडवलशाही राष्ट्रे तसे बसू देणार नाहीत. भांडवलशाही राष्ट्रांच्या एकजुटीपुढे समाजवादी राष्ट्रांचा टिकाव लागणार नाही. त्यामुळे त्या देशातील क्रांती तर अयशस्वी होईलच; पण इतर देशांत क्रांती घडवून आणणे अशक्य होऊन बसेल.

ट्रॉट्स्कीवादाचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा, की एकाच देशात समाजवाद ही घोषणा क्रांतिकारक समाजवादाच्या संदर्भात फसवी ठरते. रशियाने असे धोरण पतकरणे म्हणजे, संकुचित राष्ट्रवाद आणि त्याला पूरक ठरणारे स्वार्थी हितसंबंध यांचा स्वीकार करण्यासारखे आहे. क्रांती यशस्वी करून दाखविलेल्या रशियाने असे आपल्यापुरतेच पायाभूत धोरण स्वीकारले, तर त्याचा जगातील क्रांतिकारक विचारांवर व चळवळीवर दुष्परिणाम घडून येईल. त्यात कामगारांचा विश्वासघात आहे आणि मार्क्सवादाने दिलेल्या क्रांतिकारक विचारांची वंचनाही करण्यासारखे आहे. म्हणून रशियाने केवळ आपल्या राष्ट्रीय हितापुरते क्रांतीचे शस्त्र मर्यादित न ठेवता जगभर वापरले पाहिजे. क्रांती देशांच्या व राष्ट्रांच्या सीमांना सतत ओलांडत राहिली पाहिजे व तिची जग व्यापण्याची प्रक्रिया सातत्यानेच चालली पाहिजे; तसेच क्रांती एका खालच्या अवस्थेकडून वरच्या अवस्थेकडे सतत परिणत होत गेली पाहिजे. हा द्विविध क्रम एकाच विवक्षित राष्ट्रात समाजवाद या धोरणाने कुंठित होऊन प्रतिक्रांती होण्याची शक्यता व भय निर्माण करतो. या सिद्धांताला ‘सतत क्रांतीचा सिद्धांतʼ म्हणून ओळखले जाते.

संदर्भ :

  • Deutscher, Isaac, The Prophet Armed Trotsky : 1879–1921, London, 1954.
  • Deustscher, Isaac, The Prophet, Outcast Trotsky : 1929–1940, New York, 1963.
  • Deutscher, Isaac, The Prophet Unarmed Trotsky : 1921–1929, London, 1959.
  • Wolfe, B. D. Three Who Made a Revolution, Toronto, 1948.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा