सूफी गुरू आपल्या शिष्यांना जी दीक्षा देतात तिला ‘बैत’ (बयत) असे म्हणतात. बैत एक मान्यता आहे. खलीफा निवडीच्या काळी मतपत्रिका नसायची, तर सूज्ञ आणि समजदार पाच-सहा समाजमान्यताप्राप्त लोक एखाद्या योग्य व्यक्तीचे नाव खलीफा म्हणून प्रस्तावित करीत आणि जामा मस्जिदीमध्ये लोकांना आवाहन केले जात असे की, त्यांनी ती व्यक्ती खलीफा या पदाकरिता योग्य आहे असे ज्यांचे मत असेल, त्यांनी एकेकाने येऊन त्या नियोजित खलीफाच्या हातावर हात ठेवून त्याला खलीफा म्हणून मान्य करावे. ह्या मान्यतेला बैत म्हटले जात असे. यजीद ह्या व्यक्तीला खलीफा म्हणून मान्य न केल्याने (बैत न केल्याने) प्रेषितांचे नातू इमाम हुसैन आणि यजीद यांच्यात युद्ध झाले. या युद्धात इ. हुसैन शहीद झाले. त्यांच्या शहादतचे (बलिदानाचे) स्मरण म्हणून दहा मोहरमला (मुहर्रमला) मुसलमान उपवास धरतात. त्याला ‘यौमे आशूरा’ असे म्हणतात. सूफी संप्रदाय या बैतचा अर्थ शिष्याने गुरूला आज्ञा करण्याची मान्यता देणे समजतो.
सूफी परंपरेत गुरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरू केल्याशिवाय कोणत्याही शिष्याला सूफी म्हटले जात नाही. साधक साधना सुरू करण्यापूर्वी गुरूकडून दीक्षा घेतो. गुरू शिष्याचा हात आपल्या हातात धरून त्याला ‘खरका किंवा खिर्का’ (कफनी म्हणजेच पायघोळ झगा) प्रदान करतो. दीक्षा घेताना साधक मुंडण करतो. आपल्या गुरूचे आपण शिष्य होत आहोत याचा संकल्प त्याला करावा लागतो. गुरूला मार्गदर्शक मानावे लागते. गुरू हा शिष्याच्या ठिकाणी अध्यात्माची आवड निर्माण करतो. सूफी संप्रदायाच्या अनेक पंथांमध्ये गुरूने शिष्याला दीक्षा देण्याचे वेगवेगळे प्रकार आढळतात. काही पंथांमध्ये गुरूकडून दीक्षा देताना शिष्याचे केवळ तीनच केस कापून घेण्याची प्रथा आहे. डोक्याच्या उजव्या भागातून दोन आणि डाव्या भागातून एक केस कापून दीक्षा घेतली जाते. अनुक्रमे भौतिक जगताशी नाते तोडणे व स्वत्व विलयाची प्रक्रिया सुरू झाल्याची ही प्रतीके होत. काही सूफी पंथांमध्ये साधकाच्या डोक्याचे चार केस कापण्याची प्रथा आहे. चौथा केस काढणे म्हणजे साधकाला शारीरिक वासनांपासून मुक्त होण्याची आज्ञा देणे होय.
सूफी संप्रदायामध्ये महिलांनाही शिष्या करून घेता येते; परंतु त्यांना दीक्षा देण्याची पद्धत भिन्न आहे. मुहंमद पैगंबर दीक्षा देण्याच्या ज्या पद्धतीचे अनुसरण करत होते, ती पद्धत काही ठिकाणी आजही अनुसरली जाते. हजरत आयेशा (मुहमंद पैगंबर यांची पत्नी आणि पहिले इस्लाम खलीफा अबु बकर यांची पुत्री) यांच्या मते महिलांना मौखिक पद्धतीने दीक्षा दिली जाते. त्यांच्या हाताला स्पर्श केला जात नाही किंवा रुमालाचे एक टोक तिच्या हातात व दुसरे टोक गुरूच्या हातात असते. तिने वचन दिल्यावर ‘मी तुला दीक्षा दिली’ असे गुरू म्हणतात.
बैतमध्ये शिष्याला जाड्या-भरड्या कापडाचा झगा दिला जातो. असे वस्त्र परिधान करून जो आपले जीवन व्यतीत करतो त्याचे जीवन सार्थकी लागल्याचे म्हटले जाते. साधकाच्या झग्याचा रंग गुरू निवडतात. तो साधारणपणे निळ्या रंगाचा असतो. विशिष्ट फेटा बांधण्याच्या पद्धतीवरून एखादी व्यक्ती सूफी असल्याचे स्पष्ट होते. सूफींना प्रवासाची (सियाहत) सोय केली जाते. दोन्ही कान झाकणार्या फेटा बांधण्याच्या पद्धतीवरून सूफी ‘वास्तव’ आणि ‘अवास्तव’ दोन्ही ऐकण्याचे टाळतात असे सूचित होते.
शिष्याला ‘मुरीद’ म्हटले जाते. मुरीद म्हणजे इरादा (संकल्प) करणारा. गुरूच्या सूचना, त्याच्या मार्गाचे अनुसरण करण्याचा विचार/इरादा/संकल्प करणारा. गुरूच्या खानकाहमध्ये (गुरुकुल) त्याला चाळीस दिवस वास्तव्य करावे लागते. त्याला ‘चिल्लाकशी’ म्हणतात. गुरूची कर्तव्ये गुरूला आणि शिष्याची कर्तव्ये शिष्याला पाळावी लागतात. गुरूच्या मर्जीप्रमाणे शिष्याचे वर्तन असावे लागते.
सूफी साधूंच्या कुतुब, गौस, अवताद, अबदाल, अम्ह नजीब, नकीय आणि अवलिया अशा श्रेणी असतात.
सूफींच्या साधनमार्ग संघटनेचा नेता हा त्यांचा गुरू असतो. त्यांची साधना गूढवादी आहे. त्यात गुरूच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. गुरूलाच ‘पीर’, ‘शेख’, ‘मुर्शद’ किंवा ‘मुर्शिद’ असेही म्हटले जाते. तो साक्षात्कारी, सर्वस्वाचा त्याग करून राहणारा फकीर असावा लागतो. तो परमेश्वराचा पृथ्वीवरील प्रतिनिधीच मानला जातो. मोक्षाच्या मार्गावर गुरूची महत्त्वाची भूमिका असते.
शेख मुहिउद्दीन अरबी (सूफी संत—गूढवादी—५६० हिजरी) यांनी या विषयावर विस्तृत लेखन केले आहे.
गुरूची कर्तव्ये : १. गुरूने शिष्याला कोठेही फिरू देऊ नये. २. शिष्याच्या ढिलाईवर गुरूने तंबी द्यावी. ३. गुरूने शिष्याकडून वचन घ्यावे की, तो कोणतीही गोष्ट गुपित ठेवणार नाही. ४. गुरूने शिष्याच्या वागणुकीचा आढावा घ्यावा. त्याला अधिकाधिक आज्ञाधारक बनवावे. सूफींचा मार्ग कठीण आहे म्हणून त्याच्यावर नियंत्रणे लादावीत. ५. गुरूने शिष्यांसमोर आदर्श ठेवावेत. त्याची श्रद्धा दृढ करावी. ६. गुरूला जोपर्यंत गुरुस्थानी बसवित नाहीत, तोपर्यंत त्याने गुरुस्थान घेऊ नये. ७. गुरूने आपल्या शिष्याला दुसऱ्या गुरूकडे किंवा शिष्याकडे बसू देऊ नये. ८. गुरू धर्मपंडित (आलीम) असला पाहिजे. ९. प्रत्येक शिष्यासाठी एक जागा निश्चित करून त्यावर गुरूने नमाज पढून आपल्या शिष्याची आध्यात्मिक कुवत किती आहे, हे पाहावे. १०. गुरूने प्रवचनाची तीन सत्रे घेऊन शिष्याशी स्वतंत्रपणे संवाद साधावा.
शिष्याची कर्तव्ये : १.शिष्याने गुरूची आज्ञा विनाविलंब पाळावी. २. शिष्याने आपल्या मनाची कैफियत गुरूला सांगावी. ३. गुरूला एखादी आराधना करताना पाहिले असेल, तर गुरूच्या आज्ञेशिवाय ती आराधना करण्याचा प्रयत्न करू नये. ४. गुरूची मनोभावे सेवा करावी. ६.गुरूला सर्वश्रेष्ठ समजावे. ७. शिष्याने आपल्या भौतिक इच्छा नष्ट कराव्यात.
संदर्भ :
- Abdullah, Mohammad, Islamic TasawwufShariah and Tariqah : Mysticism (Sufism) from Qur’an and Hadith, New Delhi, 2003.
- कौसर, याजदानी, सूफी दर्शन एवं साधना, दिल्ली, १९९७.
- वकील, अलीम, सूफी संप्रदायाचे अंतरंग, पुणे, २०००.
- http://alhassanain.org/hindi/?com=book&id=80
समीक्षक – गुलाम समदानी