एक इस्लामी संप्रदाय. इस्लामच्या तत्त्वज्ञानानुसार ‘मुहासिबी’ हा संप्रदाय नसून इस्लामचे शुद्ध अंतःकरणाने आचरण करण्याचा उपाय आहे. ‘हिसाब’ म्हणजे हिशोब. मोजदाद करणे. स्वतःच्या आचरणाला तटस्थवृत्तीने तपासणे. एखादे काम करताना आपला खरा उद्देश काय आहे? आपली प्रेरणा काय आहे? आपण हे काम अल्लाहची आज्ञापालन म्हणून करतो आहोत की, जगाला दाखवण्याकरिता करीत आहोत हे स्वतःस विचारून स्वतःच आपला हेतू काय आहे, हे पाहणे म्हणजे स्वतःचाच हिशोब घेणे आहे. यालाच ‘मुहासिबा’ असे म्हणतात. इस्लामचे प्रेषित मुहंमद पैगंबर यांच्या निर्वाणानंतर इस्लामचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्यामागे सूफी संप्रदायाचा हात आहे. मुहंमद पैगंबर नंतरच्या सुमारे दोनशे वर्षांच्या काळात इस्लाममध्ये निरनिराळ्या विचारांना चालना मिळाली. इस्लामच्या तत्त्वांचा कुराण आणि हदीसच्या पार्श्वभूमीवर अभ्यास सुरू झाला. या अभ्यासाची केंद्रे मक्का-मदिनेच्या बरोबरीने वेगवेगळ्या शहरांमध्ये निर्माण झाली. यात इराकमधील बसरा शहर हे महत्त्वाचे धर्माभ्यासाचे केंद्र होते. या केंद्रामध्ये सैन्याचा तळ असल्यामुळे धर्माच्या अभ्यासाबरोबरच इस्लाम प्रसाराच्या पूर्वेकडच्या मोहिमाही काढल्या जात. येथे सूफी संप्रदायाच्या एका शाखेचे अध्ययनकेंद्र होते. या केंद्राचा प्रमुख अल् हसन अल् बसरी (६४२−७२८) हे होते. अबू सईद इब्न अबि अल् हसन यासर अल् बसरी हे त्यांचे मूळ नाव.

संस्थापक आणि त्यांचे कार्य : अल् हसन यांचा जन्म मुहंमद पैगंबर यांच्या निर्वाणानंतर नऊ वर्षांनी मदीना येथे झाला. इस्लामी जगतातली ही एक अभ्यासू आणि पवित्र व्यक्ती मानली जाते. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी बसरा येथे प्रयाण केले आणि सुरुवातीला इस्लामच्या आधिपत्याखाली इराणला आणण्याच्या मोहिमांमध्ये भाग घेतला. या मोहिमांवरून परतल्यावर इस्लामी समाजातील धार्मिक, सामाजिक आणि राजकीय उलथापालथींमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सातव्या शतकाच्या शेवटच्या काळात त्यांनी इस्लामच्या तत्त्वांचा मोठा प्रचार केला. त्यांचे साहित्य सुरुवातीच्या काळातील इस्लामी गद्याचा महत्त्वाचा भाग मानले जाते. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीने केवळ पापाचरणापासूनच दूर राहणे आवश्यक नाही, तर आपला मृत्यू निश्चित आहे आणि नियती अनिश्चित आहे हे जाणून सतत परमेश्वरी कृपेच्या काळजीत राहणे आवश्यक आहे, असे ते मानत. ते जगाला भासमान व फसवे समजत. हे समजावण्यासाठी ते त्यांचे आवडते सर्पाचे उदाहरण देत. ते म्हणत, जसा सर्प हाताला गुळगुळीत लागतो पण त्याचे विष मात्र प्राणघातक आहे, तसेच जगाचे आहे. सुखदायक वाटणारे जग कधी दंश करून नाश करेल हे सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाला त्यांनी जीवनात स्वतःच्या धार्मिक चिकित्सेचा अवलंब करण्यास सांगितले.  इस्लाम धर्माच्या चौकटीतील त्यांच्या या स्वतःच्या आचरणाच्या चिकित्सेला ‘मुहासबाह्’ असे नाव आहे. यावरून या संप्रदायाला ‘मुहासिबी’ संप्रदाय असे नाव पडले.

अल् हसन आपल्या विचारांवर ठाम असत. त्यांच्या मते इस्लामचा खरा शत्रू कुठून बाहेरून येणार नाही, तर तो आपल्यातच आहे. त्यांच्या मते माणसातली दांभिकता (मुनाफिक्) हाच त्याचा सर्वांत मोठा शत्रू आहे. तत्कालीन उमय्या खिलाफतीचा पाचवा खलीफा अब्दुल मलिक (अब्द अल् मलिक) यांना पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात की, सध्या मानवाच्या सर्व कृतींना ईश्वरी प्रेरणा कारणीभूत असल्याच्या मताचा प्रसार होत आहे. हे इस्लामच्या तत्त्वांनुसार नसून मानव स्वतःच आपल्या कर्मांना जबाबदार आहे. या पत्रात त्यांनी ईश्वराकडून मानवाला मिळालेल्या इच्छा-स्वातंत्र्याच्या मुद्द्याचीही चर्चा केली आहे. मानवाच्या कर्मांचा प्रणेता तो स्वतःच असल्याने आणि ईश्वराची कृपा त्यावरच अवलंबून असल्याने माणसाने आपली प्रत्येक कृती परमेश्वराने घातलेल्या नियमांनुसारच होत आहे ना याची चिकित्सा सातत्याने करणे आवश्यक आहे, असे ते मानत असत. त्यांनी दया आणि वैराग्य या दोन तत्त्वांना परमेश्वरी नियमांइतकेच महत्त्व दिले आहे. त्यांनी आपल्या या तत्त्वांनुसार राजकीय भूमिका घेतल्या आणि परिणामी इराकचा तत्कालीन राज्यपाल अल् हज्जाजशी शत्रुत्व ओढवून घेतले. यामुळे इ.स. ७०५ ते इ.स. ७१४ या दहा वर्षांच्या काळात त्यांना विजनवास पत्करावा लागला. अल् हज्जाजच्या मृत्यूनंतर अल् हसन पुन्हा बसऱ्यात आले आणि पुढे मृत्यूपर्यंत ते तेथेच राहिले.

अल् हसन यांनी आपल्या कार्यकाळात दया आणि वैराग्ययुक्त तथा परमेश्वरी नियमांना मानणाऱ्या इस्लामचा प्रचार केला. सूफींना आदरणीय असलेले अली इब्न अबी तलिब हसन त्यांना पूजनीय होते. त्यामुळे इस्लामी गूढपंथी सूफींनी त्यांच्या परंपरेमध्ये अल् हसन यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले. त्यांचे अनेक शिष्य इस्लामचे अभ्यासक आणि पाईक म्हणून प्रसिद्ध झाले. इस्लाम धर्माच्या पुढील काळातील मुतझिला आणि अश’अरिया या सुन्नी परंपरांनीही अल् हसन यांना आपल्या संस्थापकांपैकी एक मानले. ते मृत्यू पावल्यानंतर संपूर्ण बसरा शहर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असल्याने त्या दिवशी बसऱ्याच्या जामी मशीदीत नमाजासाठी कोणीही उपस्थित नव्हते.

संप्रदायाची पुढील वाटचाल : मुहासिबी संप्रदायामध्ये पुढचे महत्त्वाचे नाव अल् हसन अल् बसरी यांचे शिष्य अल् मुहासिबी (७८१−८५७) हे मानले जाते. यांचे संपूर्ण नाव अबू अब्दल्ला अल् हरिथ इब्न असाद अल् अनाझी अल् मुहासिबी असे होते. यांनी अल् हसनची सुफियाना शिकवणूक काहीशी रूढीकडे वळवल्यामुळे इस्लामी रूढीवादी अल् मुहासिबी यांना फार मानतात. त्यांनी लिहिलेल्या अर्-री अयाह् ली-हुकूक् अल्लाह् या ग्रंथामध्ये त्यांनी दयेवर आधारित भक्तिमार्गी इस्लाममध्ये मानसिक शुद्धतेवर भर देणारे लेखन केले असून मानसिक शुद्धीसाठी इस्लामचे नियम मार्गदर्शक मानल्यामुळे त्यांच्या लेखनाला नंतरच्या रूढिवाद्यांनी प्रमाण मानले.

अल् मुहासिबी यांच्या जीवनाबद्दल फार थोडी माहिती मिळते. त्यांच्या जन्मानंतर थोड्याच काळात त्यांचे कुटुंब बसऱ्याहून नव्या राजधानीत, बगदादमध्ये, स्थलांतरित झाले असावे. अल् मुहासिबी यांच्या वडिलांकडे चांगल्यापैकी पैसा होता; मात्र असे म्हणतात की, तात्त्विक मतभेदांमुळे अल् मुहासिबींनी तो वापरला नाही. अल् मुहासिबी यांनी बगदादमध्ये आपले आयुष्य सुखात व्यतीत केले. बगदादमधील वास्तव्यात त्यांनी मुर्शिद अल् हसन अल् बसरी यांच्या तत्त्वांचे केलेले पालन आणि दिलेली शिकवण यांमुळे त्यांना इस्लामी सूफी परंपरेत महत्त्वाचे स्थान मिळाले.

इस्लाममधील मुहासिबी संप्रदायाची वैराग्याची संकल्पना कुराणातील काही निर्देशांवरून आणि नियमांवरून विकसित झाली. यात काय खावे, कसे खावे, कुणाकडून काय घ्यावे, काय घेऊ नये अशा नियमांचा आधार घेण्यात आला आहे. इस्लाममधील काही जणांवर ख्रिश्चन धर्मगुरूंच्या वैराग्यपूर्ण राहणीचा प्रभाव पडला. त्यामुळे त्यांनी त्यांच्याप्रमाणे पायघोळ कफनींचा वेश घेतला; पण ते समाजामध्येच राहिले. अल् मुहासिबी यांना यातली अडचण लक्षात आली. सततच्या लोकसंपर्काने वैराग्यावरची निष्ठा पातळ होण्याचा धोका त्यांना कळला. अल् हसनन यांनी जो दांभिकतेचा धोका दाखवला होता, तो अल् मुहासिबी यांना स्पष्ट दिसला. त्याबरोबरच वैराग्य पालनाचा गर्व उत्पन्न होण्याची भीतीही स्पष्टपणे कळली. अल् मुहासिबींनी हेही ताडले की, माणसाच्या पापाचरणाची भूमिका तो त्याच्या उद्देशांपेक्षा कल्पनेनुसार निर्माण करतो आणि परिणामी त्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न करतो. हे सारे कुराणाच्या आधारे होत नाही, जसे होणे आवश्यक आहे. कोणत्याही कर्माची योग्यायोग्यताही कुराणातील नियमांवर आधारित असावी, असे त्यांनी मानले. परंतु हे नियम काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्नही संदेहपूर्ण असण्याची शक्यता असल्याने आणि त्यामुळे आध्यात्मिक स्तब्धता निर्माण होत असल्याने परमेश्वराप्रती असलेल्या आपल्या अंतर्बाह्य कर्तव्याचे पालन व्हावे, म्हणून सूफींच्या कारणातीत आध्यात्मिक आनंदाने युक्त अशा गूढ कर्मकांडांच्या पलीकडे जाऊन नियमाधारित जीवनपद्धतीवर अल् मुहासिबींनी भर दिला. हे तत्त्वज्ञान समजावून सांगण्यासाठी अल् मुहासिबींनी अर्-री अयाह् ली-हुकूक् अल्लाह् हा ग्रंथ लिहिला. त्यानुसार इस्लामी नियमाधिष्ठित आचरणाला त्यांनी ‘मुहासबाह्’ म्हटले आहे. यात सातत्याने स्वतःच्या कर्मांची चिकित्सा करण्याच्या नियमनिष्ठ कसोट्या दिल्या असल्याने यांच्या पालनाने मूळ सूफी ईश्वर-प्रेम, भक्ती कम-अस्सल समजली जाऊ लागली आणि असे वागणे कनिष्ठ समजले जाऊ लागले.

राजकीय परिणाम : अल् मुहासिबी यांच्या काळात इस्लामचा तर्कसंगत अर्थ करण्याचा प्रयत्न करणारी मुतझिली परंपरा वाढीस लागली होती. अल् मुहासिबींनी त्यांच्या विरोधी भूमिका घेऊन अब्द अल्लाह् इब्न कुल्लाब यांच्या मताला पाठिंबा दिला. या दोन शिकवणींमध्ये इस्लाममधील परमेश्वराच्या शब्दाबद्दल प्रामुख्याने भेद होता. मुतझिलींच्या मते परमेश्वर एक असून परमेश्वरी कृपा ठरावीक स्थळीच होत असल्याचे मानले गेले आहे; तर मुहासिबी ती स्वतंत्र आणि सार्वस्थळीक मानतात. मुतझिली परमेश्वराचा शब्द मानवनिर्मित संकल्पना मानतात. परिणामी कुराणालाही ते मानवनिर्मित समजून त्यातील तत्त्वांचा तर्कसंगत अर्थ करू इच्छितात. मात्र अल् मुहासिबी कुराणास सहसा अपौरुषेय मानत नाहीत; पण परमेश्वराच्या शब्दाला कालातीत मानतात.

या वादाचा परिणाम असा झाला की, तत्कालीन उमय्या घराण्याचा खलीफा अल् मामुन् याने मुतझिलींवर धार्मिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. यास अल् मुहासिबींनी विरोध केला नाही. परंतु लवकरच उमय्या घराण्याची सत्ता उलथवून मुतझिलींच्या सहकार्याने अब्बासी घराणे खलीफापदी आले आणि त्यांनी मुतझिलींच्या विरोधकांवर धार्मिक अत्याचार केले. त्यात विरोधक म्हणून संशयाच्या घेऱ्यात अल् मुहासिबीही सापडले. त्यांना आपल्या मताचा प्रसार थांबवावा लागला आणि बगदादमधून हद्दपार व्हावे लागले. पुढची अनेक वर्षे ते कूफामध्ये राहिले. तेथेही त्यांना बहिष्काराचा सामना करावा लागला. त्या काळात मुतझिलींच्या मताचा वरचष्मा इतका होता की, अल् मुहासिबींच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंतयात्रेत चार लोकही येऊ शकली नाहीत, असे म्हणतात.

प्रभाव : अल् मुहासिबी यांच्या कार्याचा तत्कालीन इस्लामी अभ्यासकांवर मोठा परिणाम झाला. त्यांनी वैराग्ययुक्त आचरणाला दिलेले महत्त्व आणि त्याच्या धार्मिक कसोट्या यांमुळे अभ्यासकांसाठी नवे दालन उघडले. वैराग्याची संकल्पना रूढीनिष्ठ बनवताना आपल्याकडून मूळच्या सूफी तत्त्वज्ञानाची पायमल्ली होत आहे, याकडे अल् मुहासिबींनी काहीसे दुर्लक्षच केल्यासारखे दिसते; पण या अनुषंगानेच कुराण आणि हदीस यांमधील नियमांचा अधिक अभ्यास झाला, असे म्हणता येते. अल् मुहासिबींच्या विचारांचा पगडा नंतरच्या बगदादच्या सिरी अल् सिक्ती आणि जुनेद यांच्यासारख्या शिष्यांवर पडला. यांच्यापैकी बगदादच्या जुनेदने ग्रंथरचना करून नव्या संप्रदायाची पायभरणी केली, असे म्हटले जाते.

संदर्भ :

  • Arberry, A. J. Trans. Muslim Saints and Mystics, London, 1983.
  • Picken, Gavin, Spiritual Purification in Islam : The Life and Works of Al Muhasibi, london, 2011.
  • Suleiman Ali Mourad, Early Islam Between Myth and History, Netherlands, 2006.

समीक्षक – गुलाम समदानी