फाळके, दादासाहेब : ( ३० एप्रिल १८७० – १६ फेब्रुवारी १९४४). भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक. भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकार. ते चित्रपट महर्षी म्हणूनही ओळखले जातात. पूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके, पण ते दादासाहेब या नावानेच अधिक प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या नासिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांचे वडील गोविंदशास्त्री तथा दाजीशास्त्री व मातोश्री द्वारकाबाई. दाजीशास्त्री स्वत: संस्कृत भाषेचे विद्वान आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचे पुजारी होते. त्यामुळे दादासाहेबांचे बालपण धार्मिक वातावरणात व्यतीत झाले. दादासाहेब १२ वर्षांचे असताना दाजीशास्त्रींनी मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेज येथे संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली आणि फाळके कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले.

दादासाहेबांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या कला शिकण्याची आवड होती. त्यामुळे मराठा हायस्कूल, मुंबई येथे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १८८५ मध्ये त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून एक वर्षाचा चित्रकलेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कलाभवनातून त्यांनी तैलरंगचित्रण, जलरंगचित्रण, वास्तुकला आणि नमुना प्रतिरूपण (मॉडेलिंग) यामध्ये प्रावीण्य मिळवले (१८९०). याचबरोबर त्यांनी छायाचित्रण, प्रकाश शिलामुद्रण (फोटोलिथोग्राफी) या व्यावसायिक कलांचेही शिक्षण घेतले. त्यात विविध प्रयोगही केले. अहमदाबाद येथील १८९२ मधील औद्योगिक प्रदर्शनात त्यांच्या ‘आदर्शगृहा’च्या प्रतिकृतीला सुवर्णपदक मिळाले. १८९५ मध्ये त्यांनी गुजरातमधील गोध्रा येथे व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. पण तेथे त्यांचा जम बसला नाही. ते बडोद्याला परतले (१९००) पण त्यांच्यातला हरहुन्नरी माणूस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांनी एका जर्मन जादूगाराकडून जादूची कला शिकून प्रोफेसर केळफा  (केल्फा) या नावाने जादूचे प्रयोग दाखवायला सुरुवात केली. हे प्रयोग त्यांनी एका लघुपटात चित्रितही केले.

दादासाहेबांनी १९०३ साली भारतीय पुरातत्त्व खात्यात प्रारूपकार आणि छायाचित्रकार म्हणून नोकरी पतकरली. या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांना भारतातील अनेक वास्तुशिल्पे पाहता आली. पण स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या वंगभंग चळवळीचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि चळवळीला साथ देत त्यांनी ही सरकारी नोकरी सोडून दिली (१९०६). १९०८ मध्ये त्यांनी लोणावळ्याला ‘फाळके एनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग प्रेस (वर्क्स)’ ही संस्था सुरू केली. पुढे ती दादरला हलविली. तिचे रूपांतर ‘लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स’मध्ये झाले. १९०९मध्ये दादासाहेब जर्मनीहून तीनरंगी मुद्रणप्रक्रियेचे अद्ययावत तांत्रिक शिक्षण घेऊन भारतात परतले व ही संस्था त्यांनी भरभराटीस आणली. पण व्यवसायातील भागीदारांबरोबर बेबनाव झाल्यामुळे ते वेगळे झाले (१९११). यामुळे दादासाहेब उद्विग्न होते. याच दरम्यान त्यांनी मुंबईमध्ये लाईफ ऑफ जिझस ख्राईस्ट (म. शी. ‘ख्रिस्ताचे जीवन’) हा मूक चित्रपट पाहिला आणि त्यांच्या आयुष्यातले ध्यासपर्व सुरू झाले. स्वदेशी चित्रपट बनवायचा या विचाराने त्यांना झपाटून टाकले. भारतीय इतिहासातील महान व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीकृष्णाच्या जीवनावरही असाच चित्रपट बनवायचा ध्यास घेऊन अथक प्रयत्नांनी त्यांनी लंडनला जाऊन चित्रपटविषयक तांत्रिक ज्ञान मिळवले. तेथे आवश्यक यंत्रसामग्री आणि कच्चा माल मागविण्यासाठी नोंदणीही केली व ते भारतात परतले (१ एप्रिल १९१२). तेथील वास्तव्यात प्रसिद्ध चित्रपट निर्माते सेसिल हेपवर्थ यांच्याशी त्यांचा परिचय झाला. सर्व सामग्री मे महिन्यामध्ये हाताशी आल्यावर प्रयोगादाखल जून-जुलैमध्ये रोपट्याची वाढ  हा एका मिनिटाचा लघुपट तयार केला आणि काही निवडक व्यक्तींना दाखवला. त्याचा योग्य परिणाम वाटल्याने पत्नीचे दागदागिने गहाण ठेवून भांडवल उभे करून लवकरच मुंबई (दादर) येथे फाळके चित्रपटनिर्मितिगृहाची स्थापना केली  आणि सहा महिन्यात मुंबईच्या कोरोनेशन चित्रपटगृहामध्ये त्यांनी निर्मिलेला राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय बनावटीचा मराठी पूर्ण  बोलपट प्रदर्शित झाला (३ मे १९१३). राजा हरिश्चंद्रच्या यशाने खऱ्या अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टीचा एक व्यवसाय म्हणून पाया रचला गेला. या चित्रपटाकरिता लेखक, छायालेखक, रंगवेशभूषाकार, कलादिग्दर्शक, संकलनकार, रसायनकार इ. सर्व भूमिका दादासाहेबांनी पार पाडल्या. या चित्रपटांनंतर त्यांनी मोहिनी भस्मासूर (१९१३ ), सत्यवान सावित्री (१९१४) या चित्रपटांची निर्मिती केली. यांनाही चांगले व्यावसायिक यश लाभले. त्यांनी १९१४ मध्ये पुन्हा इंग्लंडला प्रयाण केले. या वास्तव्यात त्यांनी निर्मिती केलेले चित्रपटही तेथील निर्मात्यांना दाखवले. या चित्रपटांतील तांत्रिक अंगांचे परदेशातही खूप कौतुक झाले.

इंग्लंडहून परतल्यावर पुढील दोन वर्षांत दादासाहेबांनी आगकाड्यांची मौज, नाशिक-त्र्यंबक येथील देखावे, तळेगाव काचकारखाना, केल्फाच्या जादू, लक्ष्मीचा गालिचा, धूम्रपान लीला, सिंहस्थ पर्वणी, चित्रपट कसा तयार करतात, कार्तिक-पूर्णिमा उत्सव, धांदल भटजीचे गंगास्‍नान, संलग्न रस, स्वप्नविहार  हे माहितीपर आणि शैक्षणिक लघुपट तयार केले. त्यामुळे अनुबोधपटांच्या जनकत्वाचा मानही त्यांच्याकडेच जातो. १९१७ मध्ये त्यांनी लंकादहन हा चित्रपट प्रदर्शित केला. ह्या चित्रपटाने उत्पन्नाचे पूर्वीचे सर्व विक्रम मोडले. दादासाहेबांची चित्रपट निर्मितीकरिताची आर्थिक विवंचना कायमची मिटावी या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेतला व शेठ मोहनदास रामजी आणि शेठ रतन टाटा इत्यादींच्या आर्थिक साहाय्याने ५ लाख रुपये भांडवल उभे करून ‘फाळकेज फिल्‍म लिमिटेड’  ही संस्था उभारण्याची योजना निश्चित केली परंतु ती कार्यान्वित झाली नाही. तथापि कोहिनूर मिल्सचे वामन आपटे, माया भट्ट, माधवजी जयसिंग व गोकुळदास दामोदरदास या भांडवलदारांच्या भागीदारीत १ जानेवारी १९१८ रोजी ‘फाळकेज फिल्मस’चे रूपांतर त्यांनी ‘हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी’ मध्ये केले व त्याच वेळी त्यांच्या कल्पनेत १९१४ पासून असलेले कायमचे चित्रपटनिर्मितिगृहही नासिक येथे त्यांनी उभारले. या संस्थेद्वारे दादासाहेबांनी दिग्दर्शन केलेले श्रीकृष्णजन्म (१९१८) व कालिया मर्दन (१९१९) हे दोन्ही चित्रपट अत्यंत यशस्वी ठरले; परंतु या चित्रपटानंतर त्यांचे इतर भागीदारांशी मतभेद सुरू झाले. म्हणून मन:शांतीसाठी ते १९१९ अखेर सहकुटुंब काशीला निघून गेले. तेथील वास्तव्यात त्यांनी रंगभूमी हे नाटक लिहून त्याची निर्मिती केली. पण यास व्यावसायिक यश मिळाले नाही. १९२२ मध्ये ते कंपनीत परतले. १९३४ पर्यंत हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनीने एकूण ९७ चित्रपट काढले. त्यांत फाळके यांनी दिग्दर्शन केलेले ४० चित्रपट होते. त्यांनी या कंपनीकडून दिग्दर्शित केलेला सेतुबंधन हा शेवटचा चित्रपट होय (१९३१). व्यवहार विन्मुखतेमुळे त्यांना निष्कांचन अवस्थेत दिवस कंठण्याची वेळ आली तरीही त्याही अवस्थेत वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी कोल्हापूर सिनेटोनसाठी गंगावतरण (१९३७) हा त्यांचा पहिला आणि शेवटचा बोलपट निर्माण केला आणि निवृत्ती स्वीकारली. भारतीय चित्रपट व्यवसायास २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईतील महोत्सवात कृतज्ञतेचे प्रतिक म्हणून फाळके यांना पाच हजार रुपयांची थैली अर्पण करण्यात आली (१९३९).

दादासाहेबांचा पहिला विवाह १८८६ मध्ये झाला. पण त्यांच्या पत्नीचे आणि मुलाचे गुजरातमध्ये प्लेगच्या साथीने देहावसान झाले (१९००). त्यानंतर त्यांचा विवाह सरस्वतीबाई (पूर्वाश्रमीच्या गिरिजा करंदीकर) यांच्याशी झाला (१९०२). सात मुले व दोन मुली असा त्यांचा परिवार. सरस्वतीबाईंनी चित्रपट निर्मितीच्या सर्वच क्षेत्रांत दादासाहेबांना मोलाची मदत केली आणि आयुष्यभर साथ दिली.

दादासाहेबांनी चित्रपट निर्मितीच्या तंत्राचा अथक परिश्रम करून अभ्यास केला. परिणामस्वरूप १९११-१२ च्या काळात अंधत्वही आले होते. पण चिकाटीने त्यांनी त्यावर मात केली. तत्कालीन भारतीय समाजव्यवस्थेत चित्रपट निर्मिती करताना सामाजिक अडचणींबरोबरच आर्थिक अडचणींनाही त्यांना सामोरे जावे लागले. चित्रपटात काम करण्यासाठी स्त्री कलावंतासोबतच पुरुष कलावंतही तयार होत नसत. अशावेळी गरज पडल्यास ते स्वत: किंवा कुटुंबियांपैकी कोणीतरी ते उभे करीत. सुरुवातीच्या त्यांच्या चित्रपटातील स्त्री पात्रांच्या भूमिकाही त्यांनी पुरुषांकडूनच करून घेतल्या. त्यांना अनेक कला अवगत असल्यामुळे, त्याचा उपयोग त्यांनी चित्रपटनिर्मिती करताना केला. त्यामुळे ते चित्रपट तांत्रिकदृष्ट्या उत्तम असत. त्याकाळी परदेशातही चित्रपट निर्मिती करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवण्यात आला. पण त्या मोहाला बळी न पडता त्यांनी भारतातच चित्रपट निर्मिती केली. आपल्या देदीप्यमान कारकीर्दीत त्यांनी एकूण ९५ चित्रपट आणि २६ लघुपटांची निर्मिती केली. आर्थिक विवंचनेतच वयाच्या ७४व्या वर्षी त्यांचे नासिक येथे निधन झाले.

दादासाहेबांच्या जन्मशताब्दीपासून भारत सरकारने ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देण्यास सुरुवात केली (१९६९). हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार आहे. याचे स्वरूप दहा लाख रुपये आणि सुवर्णकमळ असे आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत-तंत्रज्ञाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. भारतीय टपाल खात्यानेही दादासाहेबांच्या सन्मानार्थ १९७१ साली त्यांचे छायाचित्र असलेल्या टपाल तिकिटाचे अनावरण केले. मुंबई येथील चित्रनगरी (फिल्मसिटी) आता दादासाहेब फाळके चित्रनगरी या नावाने ओळखली जाते. दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी २००९ साली हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटातून दादासाहेबांचे कार्यकर्तृत्व प्रेक्षकांसमोर आणले.

संदर्भ :

  • Rangoonwalla, Firoze, Ed.Phalke Commemoration Souvenir, Bombay, 1970.
  •  मुजावर, इसाक, दादासाहेब फाळके, पुणे, १९७०.

समीक्षक – संतोष पाठारे