राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विजेता प्रसिद्ध मराठी चित्रपट. या चित्रपटाची कथा प्रसिद्ध साहित्यिक व स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने) यांनी लिहिलेल्या श्यामची आई  या आत्मकथेवर आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती ख्यातकीर्त साहित्यिक व चित्रपटदिग्दर्शक प्रल्हाद केशव अत्रे यांनी केली. याशिवाय याच्या पटकथा लेखनाची व दिग्दर्शनाची बाजूही त्यांनीच सांभाळली. हा चित्रपट १९५३ साली अत्रे पिक्चर्स या निर्मिती संस्थेने प्रदर्शित केला.

श्यामची आई चित्रपटातील एक दृश्य

श्यामची आई  या चित्रपटात आई आणि मुलगा यांच्यामधील वात्सल्यपूर्ण नात्याचे सुंदर चित्रण आहे. सानेगुरुजींच्या आईने त्यांच्यावर केलेल्या संस्कारांची आणि जीवनमूल्यांची शिकवण यात दिसून येते. गरिबीतही आपली नीतीमूल्ये जपून स्वाभिमानाने व सुखाने कसे जगावे हे पाठ त्यातील आई आपल्या मुलाला कशाप्रकारे शिकविते आणि त्यामुळे एक लहान मुलगा भावी आयुष्यात एक संवेदनशील आणि आदर्श माणूस म्हणून कसा घडला याचे हृद्य चित्रण आहे. श्याम आणि त्याच्या आईमध्ये चित्रित झालेल्या अनेक दृश्यांमधून त्यांच्या नात्यातील विश्वास आणि एकमेकांवर असलेले निस्सीम प्रेम दिसून येते. जेव्हा श्याम पूजेसाठी झाडावरून कळ्या तोडून आणतो, तेव्हा घरी आल्यावर सौम्य शब्दांत प्रेमाने आई त्याला समजावते की “झाडावरून पूर्ण उमललेलेच फूल तोडावे, कळ्या कधीच तोडू नयेत, कारण जसे लहान बाळांना आईची गरज असते, तसेच कळ्यांना झाडाची गरज असते.” श्यामला पुस्तके हवी असतात तेव्हा तो त्याच्या काकांचे पैसे चोरतो, त्याबाबत त्याला जाब विचारला असता तो घाबरून “मी पैसे चोरले नाही” असे खोटेच सांगतो. आईला जेव्हा खरे कळते, तेव्हा कठोर होत खोटे बोलल्याबद्दल ती श्यामला मारते. नंतर जवळ घेत समजावते की “नेहमी खरे बोलावे, जर काही चूक आपल्या हातून झाली असेल तर ती निर्भयपणे व प्रामाणिकतेने कबूल करावी.” दारावरून लाकडाची मोळी घेऊन जाणारी अस्पृश्य जातीची अशक्त वृद्धा जेव्हा तोल जाऊन खाली पडते, तेव्हा तिला कुणीच स्पर्श करायला तयार होत नाही हे पाहून श्यामची आई श्यामला तिची मदत करण्यास सांगून मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे हे शिकवते. आपल्या मुलाचे वर्तन सदाचारपूर्ण असावे हे श्यामची आई त्याला अशा छोट्याछोट्या प्रसंगांतून व दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांच्या उदाहरणांतून समजावते. श्यामच्या मनातील पोहण्याबद्दलची भीती घालवण्यासाठी, त्याला खोटे बोलण्यापासून परावृत्त करण्यासाठी, शिस्त लावण्यासाठी, त्याने इंग्रजी शाळेत शिकावे म्हणून किंवा तिच्यापासून दूर पाठवण्यासाठी तिला प्रसंगी कठोर व्हावे लागते. मुलाच्या भल्यासाठी ती हे सर्व करीत असते, हे या चित्रपटातल्या मार्मिक प्रसंगांतून अधोरेखित होते. चित्रपटातील भावपूर्ण दृश्यांचे प्रभावी चित्रण ही चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू होय.

या चित्रपटात छोट्या श्यामची भूमिका माधव वझे यांनी साकारली. अभिनेत्री वनमाला ह्यांनी श्यामच्या आईची म्हणजे यशोदाबाईंची भूमिका साकारली. तर शंकर कुलकर्णी ह्यांनी सदुभाऊ म्हणजेच श्यामच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटामध्ये बाबूराव पेंढारकर, सुमति गुप्ते, सरस्वती बोडस, दामूअण्णा जोशी इत्यादी कलाकारांच्या भूमिकाही आहेत. अभिनेत्री वनमाला यांची या चित्रपटातील भूमिका खूप गाजली. अभिनेता माधव वझे यांनी या चित्रपटात श्यामची भूमिका साकारून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली व त्यांच्या ह्या भूमिकेला प्रेक्षकांची दाद मिळाली.

या चित्रपटासाठी वसंत बापट, आचार्य अत्रे आणि राजकवी यशवंत यांनी गीते लिहिली, तर संगीत वसंत देसाई यांनी दिले आहे. या चित्रपटातील “भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदिसी बंधू शोभे नारायण”, ‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम, छम, छम, छम”, “आई म्हणोनी कोणी” इत्यादी गाणी विशेष गाजली. या गाण्याकरिता आशा भोसले, वसंत देसाई यांनी पार्श्वगायन केले आहे. प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडणारी ही गीते तेव्हा अतिशय लोकप्रिय झाली आणि आजही रसिकांच्या मनात विशेष स्थान राखून आहेत.

आई आणि मुलाच्या दृढ नात्याचे चित्रण करणारा श्यामची आई  हा चित्रपट त्या काळी अत्यंत गाजलेला आणि यशस्वी चित्रपट ठरला. प्रल्हाद केशव अत्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन समर्थपणे पार पाडले. सर्व कलाकारांच्या सहजसुंदर अभिनयाने या चित्रपटाला यशाच्या शिखरावर पोहोचवले. या चित्रपटाला भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये मानाचे स्थान मिळाले. श्यामची आई  हा चित्रपट केंद्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा पहिला मानकरी ठरला. १९५४ मध्ये समारंभपूर्वक राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.

समीक्षक : संतोष पाठारे