ज्या ठिकाणी द्रव अगर अर्धद्रव वंगणे वापरणे शक्य नसते अगर सोयीचे नसते अशा ठिकाणी घन स्वरूपातील वंगणे वापरली जातात. ही घन वंगणे चूर्णाच्या स्वरूपात किंवा ग्रिजे, खनिज तेले, पाणी, ग्लिसरीन व इतर द्रव पदार्थ ह्यांच्याशी एकत्र करून वापरली जातात.
गुणधर्म : ही वंगणे पुढील गुणधर्मांची असणे आवश्यक असते : (१) ताण सहन करण्याची क्षमता, (२) धातूंच्या घर्षणभागावर चांगली पकड, (३) उष्णता संवहन, (४) रासायनिक दृष्ट्या निर्धोक, (५) वितळबिंदू उच्च व जास्त उष्णतेत टिकाऊपणा, (६) सर्व पृष्ठभागावर पसरणे, (७) अपघर्षक अपद्रव्यांपासून मुक्त.
घनवंगणाची भेदकता : फिरत्या यंत्रांसाठी द्रवरूपातले वंगणतेल वापरले तर ते निसटून जाते, त्यासाठी घनस्वरूपातील ग्रीज वंगणे वापरली जातात. ग्रीज तयार करताना त्यांत गरजेनुसार निरनिराळी रासायनिक पुरकेदेखील मिसळली जातात. इंजिनाच्या बॉल-बेअरिंग, चाक-बेअरिंग (wheel bearing), साटा (chasis),गिअर, धक्काशोषक (shock absorber) या विविध यंत्रभागात गरजेनुसार वेगवेगळी ग्रीज वापरले जाते. उदा., साट्यासाठी कॅल्शियम साबणाचे मऊ ग्रीज तर चाक-बेअरिंगसाठी सोडियम साबणाचे कठीण ग्रीज वापरले जाते. तसेच लाटण-बेअरिंगसाठी (roller bearing) उच्च तापमानाला टिकणारे लिथियम साबणाचे ग्रीज वापरतात.
एखादे ग्रीज किती कठीण आहे व मऊ आहे हे तपासण्यासाठी त्याची दृढता-चाचणी (consistency) करावी लागते, त्यासाठी त्याचा भेदनबिंदू (penetration point) आजमावा लागतो. भराभर फिरणाऱ्या यंत्रभागांच्या गतीत अडथळा येऊ नये म्हणून मऊ ग्रीज वापरावे लागते, तर हळूहळू फिरणाऱ्या यंत्रभागांसाठी जाडसर ग्रीज उपयुक्त ठरते.
शंक्वाकार भेदनबिंदूमापक (cone penetrometer) : ग्रीजची भेदकक्षमता मोजण्यासाठी २५० से. तापमानाला आणलेला ग्रीजचा नमुना एका विशिष्ट आकारमानाच्या धातूच्या नमुनाधारक साच्यात भरतात. त्याच्या सपाट केलेल्या पृष्ठभागावर विशिष्ट वजनाचा व टोकाला सुई असलेला धातूचा शंकू ५ सेकंदाकरिता घुसविला जातो. तो शंकू नमुन्यात किती आत घुसतो हे त्यावर असलेल्या गोलाकार दर्शकावरील निर्देशांकाने मोजले जाते. त्या चकतीवर सुईला जोडलेला एक फिरता काटा आणि एक-दशांश मिलीमीटर एककचे आकडे असतात, म्हणजेच तो काटा २०० आकड्यावर स्थिर होतो तेव्हा ती सुई ५ सेकंदात २० मिलीमीटर ग्रीजच्या नमुन्याच्या आत घुसलेली असते.
इंटरनॅशनल लुब्रिकेटिंग ग्रीजेस इन्स्टिट्यूट (N.L.G.I.) या संशोधन संस्थेने ग्रिजांची वर्गवारी पुढीलप्रमाणे केली आहे:
एन.एल.जी. आय.वर्गवारी | आय.एस.ओ. २१३७ चाचणी पध्दतीनुसार भेदनक्षमता | ग्रीजचे स्वरूप |
००० | ४४५-४७५ | खूपच मऊ |
०० | ४००-४३० | |
० | ३५५-३८५ | मऊ |
१ | ३१०-३४० | |
२ | २६५-२९५ | मध्यम प्रकार |
३ | २२०-२५० | |
४ | १७५-२०५ | |
५ | १३०-१६० | कठीण |
६ | २५-२१५ | |
७ | ४०-७० |
भिन्न भिन्न ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या ग्रीजमध्ये रासायनिक पूरके मिसळून त्यांची गुणवत्ता व उपयोगिता वाढवली जाते. ही निरनिराळी पूरके बहुवारिक स्वरूपाची असून त्यातील जलरोधी (water repellant) स्वरूपाची रसायने ग्रीजची जलरोधकता वाढवितात, त्यामुळे यंत्र कार्यरत असताना पाण्याचा अंश आत घुसण्यास अटकाव होतो. ओलसर वातावरणात हवेच्या संपर्कात आलेल्या धातूला गंज धरू नये यासाठी काही रसायने धातूवर पातळ थर देऊन रक्षण करतात. तसेच प्रतिऑक्सिडीकारक (antioxidant) प्रकारची रसायने उच्च तापमानाला व उच्चदाबसह (extreme pressure) रसायने अति दाबाखाली त्याचे विघटन होऊ देत नाहीत.
संदर्भ :
- Indian Directory of Lubricants: 2003, SARBI Engineering and WHG Pvt Ltd., Mumbai.
- The Lubricants Industry Magazine, Issue no 54, British Lubricants Federation Ltd., London.
- The MAK handbook, Industrial Lubes and Fuels, BPCL, Mumbai.
समीक्षक – राजीव चिटणीस