वंगण तेलांचे प्रामुख्याने दोन वर्ग आहेत : (१) वाहतुकीच्या वाहनांसाठी वापरली जाणारी मोटर तेले आणि (२) औद्योगिक क्षेत्रामधील यंत्रसामग्रीसाठी वापरली जाणारी औद्योगिक (industrial) तेले. आंतरराष्ट्रीय पातळीवर या तेलांची त्यांच्या गुणवत्तेवरून वर्गवारी केलेली असल्याने त्यांच्या निर्मिती व वापर यांमध्ये एकसंघता आली आहे.
एंजिन तेल वर्गीकरण : ठराविक तापमानाला एंजिन तेल किती प्रवाहक्षम आहे यावर एंजिन तेलाची श्यानता अवलंबून असते. कमी तापमानाला पातळ तेलांची श्यानता कमी असल्याने ती प्रवाही असतात, तर त्याच तापमानाला जाडसर तेले श्यानता अधिक असल्याने कमी प्रवाही असतात. थंड तापमानाला पातळ तेले एंजिनामधील घर्षण कमी करून एंजिन लवकर चालू होण्यास मदत करते. जाडसर तेले घर्षणयुक्त पृष्ठभागांमधील पटलसामर्थ्य (film strength) आणि तेलाचा दाब उच्च तापमानाला टिकवून ठेवतात.
आतापर्यंत विशिष्ट तापमानाला वापरता येणारी एंजिनासाठीची एकश्रेणी (monograde) वंगण तेले वापरात होती. या तेलांची वर्गवारी सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह एंजिनिअर्स (SAE) या जागतिक पातळीवरच्या संस्थेतर्फे केली जाते (तक्ता १).
एंजिन तेलाचे वर्गीकरण त्याच्या श्यानतेवरून केले जाते. एंजिन तेलाची श्यानता XW-XX या संकेतनाने (notation) करतात. XW मधील X हे इंग्रजी अक्षर -१७.८ ० से. (०० से.) तापमानाला तेलाची श्यानतानिदर्शक आहे. म्हणजेच हा अंक जितका कमी असेल, तितके थंड तापमानाला तेल कमी गोठले जाईल. तर XW पुढील अंक १००० से. तापमानाला तेलाची श्यानतानिदर्शक आहे. म्हणजेच उच्च तापमानाला तेलाची द्रवीभूत रोधकता (resistance to thinning) दर्शविते.
बहुश्रेणी (multigrade) तेलाचा वर्ग (SAE grade) | थंडतापसह क्षमता (सीमांत संक्रमणकारी तापमान-Borderline Pumping Temperature-BPT, ० से.) | उष्णतापसह श्यानता (१००० से.ला. सेंटिस्ट्रोकमध्ये ) |
० W | -३५ | किमान ३.८ |
५ W | -३० | किमान ३.८ |
१० W ३० | -२५ | ९.३ ते १२.५ |
१५ W ४० | -२० | १२.५ ते १६.३ |
२० W ५० | -१५ | १६.३ ते २१.९ |
२५ W | -१० | किमान ९.३ |
उदा., 5W30 वर्गातील तेल 10W30 वर्गातील तेलापेक्षा थंड तापमानाला कमी गोठले जाईल. 5W30 वर्गातील तेल 5W40 वर्गातील तेलापेक्षा उच्च तापमानाला लवकर द्रवीभूत होईल.
हिवाळ्यामध्ये आणि थंड प्रदेशातील वाहनांना थंडतापसह एंजिन तेले उपयुक्त ठरतात. उन्हाळ्यामध्ये आणि उष्ण प्रदेशातील वाहनांना उच्चतापसह एंजिन तेले उपयुक्त ठरतात.
गिअर तेल वर्गीकरण : गिअर तेलाचेसुध्दा एसएईतर्फे वर्गीकरण करून त्यांच्या निर्मिती व वापरावर नियंत्रण ठेवले आहे (तक्ता २).
एसएई वर्ग | १५०००० सेंटिपोईस श्यानतेसाठी लागणारे कमाल तापमान ( ० से.) | १००० से.ला. श्यानता (सेंटिस्ट्रोकमध्ये) |
७५ W | -४० | किमान ४.१ |
८० W | -२५ | किमान ७ |
८५ W | -१२ | किमान ११ |
९० | – | १३.५ ते २४ |
१४० | – | २४ ते ४१ |
मात्र औद्योगिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या वंगण तेलाचे वर्गीकरण इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन (ISO) या संस्थेने दिलेल्या श्यानता (viscosity) वर्गानुसार होते. या वर्गवारीनुसार वंगण तेलांची ४०० से. ला २ ते १५०० सेंटिस्ट्रोक श्यानतेपर्यंत वर्गवारी होते. विशिष्ट श्यानता वर्ग असलेल्या तेलाची श्यानता + १०% च्या दरम्यान असायला हवी हे पुढील तक्त्यावरून स्पष्ट होईल (तक्ता ३).
आयएसओ वर्ग | किमान श्यानता (४० ० से. ला) | कमाल श्यानता (४० ० से. ला) |
२ | १.९८ | २.४२ |
१० | ९ | ११ |
२२ | १९.८ | २४.२ |
१०० | ९० | ११० |
२२० | १९८ | २४२ |
१५०० | १३५० | १६५० |
याशिवाय गाड्यांच्या प्रारकासाठी (radiator) शीतनक (coolant) आणि ब्रेकसाठी गतिरोधकद्रव (brake fluid) तसेच धातूचे पत्रे गंजू नयेत म्हणून वापरली जाणारी तात्पुरती गंजरक्षक तेले ही काही रासायनिक स्वरूपाची वंगणे असतात.
संदर्भ :
- https://www.lubricants.total.com/consumers/maintenancetips/Oil-viscosity-and-oil-grades
- अनघा प्रकाशन, काळे सोने (दुसरी आवृती-२०१२), ठाणे.
समीक्षक – राजीव चिटणीस