चित्रपटात रंगांचा वापर करण्याची सुरुवात १८९५ मध्ये टॉमस एडिसनच्या ॲनाबेल्ज् डान्स या चित्रपटापासून झाली, असे मानले जाते. त्या काळात चित्रपटाची रिळे हाताने रंगवून त्यांत रंग भरले जात. फ्रेंच चित्रपटदिग्दर्शक जॉर्ज मेल्यस (१८६१–१९३८) याच्या ट्रिप टू द मून या गाजलेल्या चित्रपटातही अशा प्रकारे रंग भरले होते. १८९९ साली एडवर्ड रेमंड टर्नर याने त्रिरंगी प्रणाली विकसित केली. यात मूळ कृष्णधवल चित्रफितीसमोर लाल, हिरव्या आणि निळ्या रंगांच्या गाळण्या (Filters) लावून दृश्य चित्रित केले जाई. त्यानंतर ते प्रक्षेपित करताना प्रक्षेपकालाही तशाच रंगांच्या गाळण्या लावून ते रंग पडद्यावर उमटावे, अशी योजना होती. मात्र, ते प्रक्षेपित करताना तीन भिन्न रंग नेमकेपणाने पडद्यावर उमटू शकले नाहीत. त्यानंतर १९०५ साली ‘पार्थे फेरेʼ (Parthes Frères) या फ्रेंच कंपनीने चित्रपटाची रिळे रंगविण्यासाठी स्टेन्सिल्स तयार केली. त्यांद्वारे रिळे रंगविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होऊ लागली.
१९०८ साली जॉर्ज आल्बर्ट स्मिथ या ब्रिटिश वैज्ञानिकाने ‘किनेमाकलर’ (Kinemacolour) ही दुरंगी रंगप्रक्रिया विकसित केली. त्यात विशिष्ट प्रक्रिया केलेले कृष्णधवल रीळ सेकंदाला बत्तीस चित्रचौकटी (Frames) या वेगाने लाल आणि निळ्या रंगाच्या गाळणीतून फिरविले जात. त्यानंतर प्रक्रिया केलेल्या रिळाद्वारे तशाच लाल आणि हिरव्या रंगांच्या गाळण्या असलेल्या प्रक्षेपकातून समोरच्या पडद्यावर प्रतिमा उमटविल्या जात. प्रक्षेपकातून हे रीळ कॅमेऱ्याच्याच, म्हणजे सेकंदाला बत्तीस चित्रचौकटी या वेगाने फिरविले जात असे. प्रेक्षकाला दृष्टीसातत्यामुळे लाल आणि हिरवा रंग एकरूप झाल्याचा भास होई. याच प्रक्रियेतून भारतात १९११ साली दिल्ली दरबार या पहिल्या रंगीत चित्रपटाची निर्मिती झाली.
१९१० साली लेपनप्रक्रियेने चित्रपटाची रिळे रंगवायला सुरुवात झाली. यात पूर्ण रीळ एकाच रंगात बुडवून रंगविले जात असे. विशिष्ट परिणाम साधण्यासाठी विशिष्ट रंगांचा वापर करण्याची सुरुवात येथूनच झाली. उदा., रात्रीसाठी निळा, आगीसाठी लाल किंवा फुलांसाठी पिवळा इत्यादी.
१९२१ साली विल्यम ग्रीन याने ‘बायोकलर’ (Biocolour) ही प्रक्रिया जगासमोर आणली. ही प्रक्रिया बरीचशी ‘किनेमाकलर’ या प्रक्रियेसारखीच होती. विल्यम ग्रीन याने जॉर्ज स्मिथलाच आपल्या वडिलांची मूळ कल्पना चोरल्याच्या आरोपावरून न्यायालयात खेचले; तथापि त्याच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकला नाही.
१९२९ साली ईस्टमन कोडॅक कंपनीने विविध रंगांमध्ये रंगविलेली कच्ची कृष्णधवल चित्रफीत (Film Stock) ‘सोनोक्रोम’ (Sonochrome) या नावाने बाजारात आणली. ही चित्रफीत सतरा विविध रंगांमध्ये उपलब्ध असे. सोनोक्रोम बऱ्यापैकी लोकप्रिय झाली. त्याचा परिणाम म्हणून त्या काळच्या अनेक चित्रपटांमध्ये एक रीळ निळ्या, तर पुढचे रीळ सेपिया रंगात असे बऱ्याचदा दिसून येते.
अशा प्रकारे चित्रपटाच्या रिळांना बाहेरून रंगविण्याचे किंवा गाळण्यांद्वारे ते पडद्यावर प्रक्षेपित करण्याचे अनेक तोटे होते. गाळणीतून पडद्यावर प्रक्षेपित केलेली प्रतिमा मूळ प्रतिमेपेक्षा खूपच फिकट आणि अस्पष्ट असे. त्याचा खर्चही जास्त येई. त्यामुळे लवकरच नव्या पद्धतीचा शोध सुरू झाला आणि त्याला यशही आले.
अंतर्गत रंगयोजन :
चित्रपटाच्या रिळाला आतून रंग देण्याची प्रक्रिया कोडॅक कंपनीने १९१६ साली विकसित केली. त्याला त्यांनी ‘कोडॅक्रोम’ (Kodachrome) असे नाव दिले. या प्रक्रियेत चित्रीकरणाच्या वेळीच कॅमेऱ्याच्या नेत्रभिंगाला गाळण्या लावल्या जात. त्यातून उमटणाऱ्या प्रतिमा कृष्णधवल रिळावर पाठपोट छापल्या जात. प्रक्रिया केल्यावर त्यांचा रंग चंदेरी होत असे. त्यांच्यावर लाल आणि हिरव्या रंगद्रव्यांची आणखी प्रक्रिया केल्यानंतर त्या रंगीत होत.
१९१७ साली विल्यम केली (William Kelly) याने विकसित केलेली ‘प्रिझ्मा’ (Prizma) ही अंतर्गत रंगयोजनप्रक्रिया म्हणजे चित्रपट खऱ्या अर्थाने रंगीत करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल होय.
हर्बर्ट कॅलमस आणि डॅनियल कॉमस्टॉक यांनी १९१५ पासूनच अंतर्गत रंगयोजनप्रक्रियेसंबंधी विविध प्रयोग सुरू केले होते. त्यात दोन प्रकाशछिद्रे असलेल्या कॅमेऱ्याचा वापर केला. त्यात प्रत्येक प्रकाशछिद्राला स्वतंत्र गाळणी जोडून चित्रण करण्याची सोय होती. मात्र त्यातून मिळणारे परिणाम फारसे समाधानकारक नव्हते. पुढे १९२० च्या सुमाराला प्रक्रिया केलेल्या दोन चित्रफिती एकत्र जोडून प्रक्षेपण करण्याचे तंत्र विकसित झाले. त्यातूनच ‘टेक्निकलर’ या कंपनीचा जन्म झाला. १९२२ साली निर्माण झालेला टोल ऑफ द सी हा पहिला टेक्निकलर चित्रपट. तो चेस्टर फ्रँकलिनने दिग्दर्शित केला. १९३२ साली टेक्निकलरने तीनरंगी चित्रफीत निर्माण करून चित्रपटांमधील रंगवापरात क्रांती घडवली. नेत्रभिंगातून येणाऱ्या प्रकाशाचे लाल, निळा आणि हिरवा या तीन रंगांत विभाजन करणाऱ्या कॅमेऱ्याच्या शोधामुळे हे शक्य झाले. ल कुकुराशा हा या तंत्रज्ञानातून चित्रित झालेला पहिला चित्रपट (१९३३). गॉन विथ द विंड या चित्रपटाने टेक्निकलरला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली (१९३५).
टेक्निकलरची एकाधिकारशाही पुढे ईस्टमन कोडॅक कंपनीने ईस्टमन कलर प्रक्रिया आणून मोडीत काढली. जर्मन आग्फाकलर, रशियन सोवोकलर, इटालियन फेरानियाकलर आणि बेल्जियन-फ्रेंच गेवाकलर या सगळ्यांनी तीनरंगी चित्रफीत लोकप्रिय केली.
१९९० च्या दशकानंतर हळूहळू डिजिटल कॅमेरा जम बसवू लागला आणि चित्रफीत वापरून चित्रीकरण करण्याची पद्धत इतिहासजमा होत गेली. २०१० नंतर संपूर्ण डिजिटल कॅमेऱ्यावर चित्रित झालेल्या चित्रपटांचं प्रमाण वाढलं. त्यांचं रंगसंयोजनही संगणकावर होण्यास सुरुवात झाली.
भारतीय चित्रपटांत रंग :
१९३३ साली ⇨ व्ही. शांताराम यांनी सैरंध्री हा रंगीत चित्रपट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र चित्रित झालेल्या रिळांवर जर्मनीत झालेली प्रक्रिया पुरेशी समाधानकारक नव्हती. त्यामुळे प्रक्षेपणाच्या वेळी चित्रपट रंगीत न दिसता कृष्णधवलच दिसला. त्यानंतर चार वर्षांनी प्रदर्शित झालेला, मोती गिडवानीदिग्दर्शित आणि अर्देशिर इराणीनिर्मित किसान कन्या हा पहिला भारतीय रंगीत चित्रपट ठरला. मात्र १९५२ साली प्रदर्शित झालेल्या मेहबूब खान यांच्या आन या चित्रपटापासून खऱ्या अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टीत रंगांनी जम बसवला. पहिला मराठी रंगीत चित्रपट प्रदर्शित होण्यास मात्र १९६५ साल उजाडावे लागले. इये मराठीचिये नगरी हा व्ही. शांतारामनिर्मित–दिग्दर्शित पहिला मराठी रंगीत चित्रपट असला, तरी त्याला फारसं यश न मिळाल्याने मराठीत कृष्णधवल चित्रपटांची मातब्बरी कायम राहिली. पुढे १९७२ साली व्ही. शांताराम यांच्याच पिंजरा या चित्रपटाने मराठीत रंगीत चित्रपटनिर्मितीला पोषक वातावरण निर्माण केले.
चित्रपटातील रंगांचे सौंदर्यशास्त्र :
रशियन दिग्दर्शक आणि विचारवंत ⇨ स्यिर्ग्येई म्यिकायलव्ह्यिच आयसेन्स्तीन याने चित्रपटातील रंगांच्या कलात्मक वापराविषयी सर्वप्रथम महत्त्वाचा सिद्धांत मांडला. त्याने रंगांच्या लय, ध्वनी, संगीत अशा विविध घटकांशी असलेल्या नात्याचा सतत शोध घेतला. रंगांचे चित्रपटाच्या अभिव्यक्तीशी असलेले घनिष्ट नाते त्याने आपल्या लेखनातून वारंवार अधोरेखित केले. डॅनिश दिग्दर्शक-विचारवंत कार्ल थिओडोर ड्रायर याने चित्रपटातील रंगांचा गतिमानतेशी असलेला संबंध आपल्या लेखनातून स्पष्ट करून दाखवला. जील दल्यूज या फ्रेंच विचारवंतानेही चित्रपटातील रंगांचे लयीशी असलेले नाते उलगडून दाखवले. तसेच फ्रेंच विचारवंत जॅक औमो याने चित्रपटातील रंग या विषयावर मूलभूत आणि विपुल लेखन केले आहे.
जागतिक चित्रपटांत जॅक डेमी, झान ल्यूक गॉदार्, मायकेलअँजेलो आंतोनियोनि, क्रिश्तोफ किश्लोव्सकी, पेद्रो आल्मोदोवार, मोहसिन मखमलबाफ अशा अनेक महत्त्वाच्या दिग्दर्शकांनी चित्रपटातील रंगवापराचा सखोल अभ्यास केला. बेलाटार सारख्या दिग्दर्शकाने कारकिर्दीच्या उत्तरार्धात जाणीवपूर्वक कृष्णधवल चित्रपटाची वाट पतकरली. आन्द्रे तारकॉव्हस्की किंवा एडगर राईश या दिग्दर्शकांनी रंग आणि कृष्णधवलता एकाच चित्रपटात प्रसंगाच्या भावस्थितीनुसार वापरली. आज जागतिक चित्रपट प्रामुख्याने रंगीत असले, तरी कलात्मक परिणामासाठी आजही कृष्णधवल चित्रपट निर्माण होत आहेत.
समीक्षक – गणेश मतकरी