हे ऋग्वेदाचे उपनिषद आहे.ऋग्वेदाच्या ऐतरेय आरण्यकाच्या दुसऱ्या विभागातील तत्त्वज्ञानात्मक अथवा ज्ञानकांडात्मक असलेल्या चार ते सहा अध्यायांना ऐतरेयोपनिषद म्हटले जाते. या उपनिषदाचा कर्ता महिदास ऐतरेय आहे. त्यानेच ४० अध्यायांचा ऐतरेय ब्राह्मण हा ग्रंथही लिहिला. या उपनिषदाचा रचनाकाळ इ.स.पू. ६०० पूर्वीचा मानला जातो.
या उपनिषदात तीन अध्याय आणि पाच खण्ड आहेत. पहिल्या अध्यायात तीन खण्ड, दुसऱ्या व तिसऱ्या अध्यायात प्रत्येकी एक खण्ड आहे. या पाच खण्डांमध्ये अनुक्रमे ४,५,१४,६ आणि ४ असे एकूण ३३ मंत्र आहेत.
प्रत्येक उपनिषदाचा प्रारंभ शांतिमंत्राने प्रार्थना करून होतो. या उपनिषदाच्या शांतिमंत्रात प्रार्थना केली आहे, “माझी वाणी मनामध्ये स्थिर व्हावी आणि मन वाणीमध्ये स्थिर व्हावे. अर्थात, माझी वाणी आणि मन परस्परांना अनुकूल होवोत. हे अव्यक्त परमेश्वरा, माझ्यासाठी आपण प्रकट व्हावे. हे परमात्मन्, वेदांनी सांगितलेले सत्य मला चांगल्या प्रकारे समजावे, आत्मसात् व्हावे. शिकलेले ज्ञान मी कधीही विसरू नये. स्वाध्याय करताना रात्रंदिवस अध्ययन घडावे. मी नेहमी सत्याचाच विचार करावा, सत्यच बोलावे. ते सत्य ते ब्रह्म माझे रक्षण करो, माझ्या गुरुंचे रक्षण करो.”
या उपनिषदाच्या पहिल्या अध्यायात सृष्टीची उत्पत्ती सांगितलेली आहे. पहिल्या अध्यायाच्या पहिल्या खंडात आलेल्या वर्णनानुसार प्रारंभी जगत् इत्यादि काही नसून केवळ आत्मा एकच होता, दुसरे काहीही नव्हते. त्या आत्म्याने विचार केला की, मी विविध लोकांची रचना करीन. लोकांच्या उत्पत्तीचा संकल्प करून त्याने प्रथम अम्भलोक उत्पन्न केला. सर्वांत वरच्या स्थानी असलेला, द्युलोकाच्या पलीकडे असलेला परंतु द्युलोक किंवा स्वर्गलोक आधार असलेला तो अम्भलोक. हा लोक मेघांना धारण करणारा असल्यामुळे त्याचे अम्भ हे नाव सार्थ आहे. अम्भलोकाच्या खाली मरीचिलोक आहे. या मरीचिलोकाचा आधार अन्तरिक्ष आहे. किरणांशी संबन्धित असल्यामुळे याचे मरीचिलोक हे नाव सार्थ आहे.मरीचिलोकाच्या खाली मरलोक आहे ज्याचा आधार पृथ्वी आहे. या लोकामध्ये मृत्यू आहे म्हणून याला मृत्युलोकही म्हणतात आणि यामुळेच मरलोक हे नाव सार्थ आहे. मरलोकाच्या खाली आपलोक आहे. पृथ्वीच्या खाली असलेल्या या लोकामध्ये पाणी अधिक असल्यामुळे आपलोक हे नावही सार्थ ठरते. यालाच पाताळलोकही म्हटले जाते.
अशा प्रकारे अम्भ, मरीचि, मर, आणि आप या लोकांची रचना केल्यानंतर या लोकांच्या रक्षणासाठी लोकपाल निर्माण करण्याचा संकल्प त्या आत्म्याने (ईश्वराने) केला. त्यासाठी प्रथम जलातून एक पुरुष निर्माण करून त्याच्या ठिकाणी अवयव निर्माण केले. त्या विराट पुरुषाच्या ठिकाणी प्रथम मुख उत्पन्न करून नंतर वाणी, नाक, डोळे, कान, त्वचा हृदय इत्यादी अवयव निर्माण केले. तसेच प्राणादी इंद्रिये निर्माण केली.
पहिल्या अध्यायाच्या दुसऱ्या खंडात आलेल्या वर्णनानुसार पुरुषाच्या ठिकाणी भूक आणि तहान निर्माण केली. त्या वेळी इंद्रियाभिमानी देवतांनी त्यांच्यासाठी अन्नग्रहण करण्यासाठी आश्रयस्थान सांगावे, असे परमात्म्याला म्हटले. परमात्म्याने त्यांना गाय, घोडा यांची आकृती दाखवली. परंतु देवतांना ती त्यांच्यासाठी योग्य वाटली नाही. नंतर पुरुषाकृती त्यांच्यासमोर आणल्यावर देवतांना ती सुंदर वाटली. म्हणून परमात्म्याने इंद्रियाभिमानी देवतांना त्या पुरुषरूपी आश्रयस्थानात प्रवेश करण्यास सांगितले. त्यानुसार सर्व इंद्रियांनी त्या आकृतीत प्रवेश केला आणि मनुष्य निर्माण झाला.
पहिल्या अध्यायाच्या तिसऱ्या खंडात आलेल्या वर्णनानुसार त्या ईश्वराने लोक आणि लोकपालांसाठी अन्न निर्माण केले. अन्नग्रहणासाठी व्यवस्था निर्माण केली आणि नंतर त्या आकृतीत अर्थात शरीरात ईश्वराने प्रवेश केला. अशा प्रकारे परमात्म्याने केलेली सृष्टीची निर्मिती पहिल्या अध्यायात वर्णिली आहे.
दुसऱ्या अध्यायात पुनर्जन्माची निश्चितता आणि शरीराची अनित्यता यांचे निरूपण केले आहे.
तिसऱ्या अध्यायात उपास्य देवाचे वर्णन आले आहे. या उपास्य देवाचे वर्णन करताना ‘प्रज्ञानं ब्रह्म’ हे महावाक्य या उपनिषदात आले आहे. सर्वांना सर्व प्रकारची शक्ती देणारा प्रज्ञानस्वरूप परमात्मा उपास्य आहे. या उपास्यदेवाला जाणून ज्ञानी मनुष्य अमृतत्व प्राप्त करतो. अर्थात, प्रज्ञानस्वरूप ब्रह्माची अनुभूती मुक्ती मिळवून देणारी आहे.
याप्रमाणे पहिल्या अध्यायात परमात्म्याचे, दुसऱ्या अध्यायात जीवात्म्याचे आणि तिसऱ्या अध्यायात ब्रह्माचे वर्णन करून या उपनिषदाने मोक्षाचा मार्ग दाखविलेला आहे.
संदर्भ :
- अभ्यंकर, शं. वा. भारतीय आचार्य, आदित्य प्रतिष्ठान, पुणे, २००१.
- गोयंदका, हरिकृष्ण दास, ईशादि नौ उपनिषद, गीता प्रेस, गोरखपूर, २०१६.
- जोग, द. वा. संपा. सुबोध उपनिषत्संग्रह (भाग पहिला), डोंबिवली, २००७.
- देवधर, स. कृ. ऐतरेय, तैत्तिरीय व प्रश्नोपनिषद, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९८८.
- http://vedicheritage.gov.in/upanishads/aitareyopanishad/
- http://sivanandaonline.org/public_html/?cmd=displaysection§ion_id=587
समीक्षक : भाग्यलता पाटस्कर