पंचकोश ही आध्यात्मिक आणि योगशास्त्रीय संकल्पना तैत्तिरीयोपनिषदातील दुसर्‍या व तिसऱ्या अध्यायात वर्णिली गेली आहे. त्यामुळे या उपनिषदात या संकल्पनेचा उगम दिसून येतो.

संकल्पनेचे स्वरूप : आपले अस्तित्व हे पाच कोशांचे बनलेले असते. या संकल्पनेच्या अनुषंगाने असे मानले जाते की, आपले दृश्यमान असलेले बाह्य शरीर हे अन्नामुळे बनलेले असते. त्यामुळे ते दृश्यमान शरीर म्हणजे अन्नमय कोश होय. अन्नमय कोशाच्या आत दुसरा प्राणमय कोश असतो. हा पाच प्राणांचा म्हणजे पाच वायूंचा बनलेला असतो. हे पाच वायू म्हणजे प्राण, अपान, समान, व्यान, उदान हे होत. या प्राणमय कोशाने अन्नमय कोश व्यापलेला असतो. त्याच्याही आत मनोमय कोश असतो. त्याने प्राणमय कोश व्यापलेला असतो. या मनोमय कोशाला विज्ञानमय कोशनामक पुरुषविध कोशाने व्यापलेले असते. त्याच्याही आत पुरुषविध असा आनंदमय कोश असतो आणि त्याने विज्ञानमय कोश पूर्णपणे व्यापलेला असतो. एकाच्या आत एक अशाप्रकारच्या रचनेत ते कोश किंवा देह प्रत्येक व्यक्तिमत्त्वात अस्तित्वात असतात. यातील प्रत्येक कोश विशिष्ट क्रमाने दुसर्‍या कोशाच्या आत असतो. या कोशांना ‘पंचकोश’ असे म्हणतात. एकाच आत्म्याभोवती हे पाच कोश क्रमाने असतात.

सदानंद योगींद्र यतींच्या वेदान्तसार या छोट्याशा पण महत्त्वपूर्ण ग्रंथातील पंधराव्या प्रकरणात पंचकोशांचे आणि त्या संदर्भात इतर आनुषंगिक संकल्पनांचे जे विस्तृत विवेचन दिले आहे, ते खालीलप्रमाणे :

व्यक्तीचे चार देह : पंचकोशांची संकल्पना समजून घेताना प्रत्येक जीवाच्या चार देहांची संकल्पना लक्षात घ्यावी लागते. प्रत्येक व्यक्तीला स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह असे चार देह किंवा शरीरे असतात, असे वेदान्त मानतो.

  • स्थूल देह : दृश्यमान असलेले असे जीवाचे जे शरीर असते, त्याला स्थूल देह असे म्हणतात. जीवाने ग्रहण केलेल्या अन्नामुळे आणि अन्नातून हे उत्पन्न झालेले असते.
  • सूक्ष्म देह : सूक्ष्म शरीर म्हणजेच लिंग देह होय. यामध्ये पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच वायू, बुद्धी (निश्चयात्मक वृत्ती) आणि मन (संकल्प‒विकल्पात्मक वृत्ती) यांचा अंतर्भाव होतो.
  • कारण देह : वेदान्तसार या ग्रंथात असा उल्लेख आहे की, व्यक्तीच्या बाबतीत तिचे मूळ अज्ञान हे सुषुप्ती अवस्थेतील आत्म्याची उपाधी आहे. त्यालाच कारण देह असे म्हणतात.
  • महाकारण देह : हा देह वरील तिन्ही देह-संकल्पनांच्या पलीकडे असतो. स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहांचा जो द्रष्टा असतो आणि जो पंचकोशांपेक्षा वेगळा असतो, त्याला हे ज्ञान होते की, ‘तू आत्मा आहेस’. ज्याला हे ज्ञान होते, होऊ शकते तो महाकारण देह असतो.

सूक्ष्म पंचमहाभूते : पंचकोशांची संकल्पना समजून घेण्यासाठी सूक्ष्म पंचमहाभूते ही संकल्पनादेखील समजून घ्यावी लागते. वेदान्तसार या ग्रंथानुसार तमोगुण प्रधान असणारी विक्षेप शक्ती असणाऱ्या आणि अज्ञानाचा आरोप झालेल्या चैतन्यापासून प्रथम आकाश उत्पन्न होते. नंतर आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी अशा क्रमाने ही सूक्ष्म पंचमहाभूते उत्पन्न होतात. या आकाशादी सूक्ष्म महाभूतांच्या ठिकाणी सत्व, रज, तम हे गुण असतात. या सूक्ष्म महाभूतांनाच ‘तन्मात्रा’ असे म्हणतात. यांच्यापासून सूक्ष्म शरीरे आणि स्थूल पंचमहाभूते निर्माण होतात.

पंचकोश : पृथ्वीतलावर दृश्यमान असलेल्या प्रत्येक जीवाचे शरीर हे पाच कोशांनी युक्त असते. हे पाच कोश खालीलप्रमाणे आहेत :

१) अन्नमय कोश : प्रत्येक जीवाचे दृश्यमान असलेले जे शरीर असते, ते स्थूल शरीर त्या जीवाने ग्रहण केलेल्या सर्व प्रकारच्या अन्नातून आणि अन्नामुळे उत्पन्न झालेले असते. या दृश्यमान कोशाला म्हणजे आवरणाला अन्नमय कोश असे म्हणतात (वेदान्तसार १६:५७).

२) प्राणमय कोश : प्राण, अपान, व्यान, उदान, समान या पाच वायूंनी युक्त असलेल्या कोशाला प्राणमय कोश असे म्हणतात. हा कोश पाच कर्मेंद्रिये म्हणजे वाक्, पाणि, पाद, पायु, आणि उपस्थ यांनीही युक्त असतो (वेदान्तसार १५:४७).

३) मनोमय कोश : पाच ज्ञानेंद्रिये (श्रोत्र, त्वक्, चक्षु, जिव्हा, घ्राण) आणि मन यांचा मिळून मनोमय कोश होतो. मनोमय कोशाच्या ठिकाणी इच्छाशक्ती असते. त्यामुळे तो साधनरूप मानला जातो (वेदान्तसार १५:४४).

४) विज्ञानमय कोश : पाच ज्ञानेंद्रिये (श्रोत्र, त्वक्, चक्षु, जिव्हा, घ्राण) आणि बुद्धी यांचा विज्ञानमय कोशात अंतर्भाव होतो. या कोशाचे वैशिष्ट्य असे की, हा ‘मी कर्ता आहे, मी  भोक्ता आहे’ इत्यादी प्रकारची अभिमान-जाणीव बाळगतो. या कोशाला वेदान्तसारकार ‘इहलोक-परलोकगामी’ (म्हणजे इहलोकातून परलोकी जाणारा व्यावहारिक जीव) असे संबोधतात. या विज्ञानमय कोशाच्या ठिकाणी ज्ञान-शक्ती असते. त्यामुळे तो ‘कर्तृस्वरूपी’ मानला जातो (वेदान्तसार १५:४३).

५) आनंदमय कोश : आनंदप्रचुर किंवा आनंदप्रधान असूनही एखाद्या कोशाप्रमाणे नित्यशुद्ध आनंदाला झाकणारा असल्यामुळे या सर्वांत आत असलेल्या कोशाला आनंदमय कोश असे म्हणतात. याचा संबंध कारण आणि महाकारण देहाशी असतो (वेदान्तसार १४:२७).

थोडक्यात, ‘प्राज्ञ’ असलेल्या म्हणजे सुषुप्त अवस्थेत असलेल्या चैतन्याचे कारण देह हे आनंदप्रचुर आणि कोशाप्रमाणे झाकणारे आच्छादक असल्यामुळे याला ‘आनंदकोश’ असे म्हणतात. शांत-चित्त होऊन परब्रह्माची उपासना करणाऱ्या योगी व्यक्तींच्या स्थूल आणि सूक्ष्म देहांचे याच ठिकाणी लय होत असल्यामुळे याला स्थूल-सूक्ष्म देहांचे लयस्थानदेखील म्हणतात.

स्थूल शरीर हे अन्नमय कोशाचे बनलेले असते. सूक्ष्म शरीर हे प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश यांचे बनलेले असते. या दोन्ही शरीरांचा लय या आनंदमय कोशात, कारण शरीरात, अज्ञानात, म्हणजे सुषुप्तीत होतो. मोक्षावस्थेत मात्र या तिन्ही शरीरांचा आणि पाचही कोशांचा लय झालेला असतो, असे वेदान्तसार (१४:२७) या ग्रंथात म्हटले आहे.

ही संकल्पना आध्यात्मिक दृष्टीने महत्त्वाची आहेच पण त्याचबरोबर मानसशास्त्रीय, जीवशास्त्रीय आणि वैद्यकीय दृष्टीनेदेखील महत्त्वाची आहे.

संकल्पनेतील परिवर्तन : पंचकोश ही मूळ संकल्पना वरीलप्रमाणे आहे हे खरे. तरी शंकराचार्यांनी असे मत मांडले की, आत्म्याचे हे पंचकोश जरी खरे असले, तरी ते कल्पनागम्य असून आपण विवेकाने या पाच कोशांतील भेद समजून घ्यावेत आणि स्थूल देह, तसेच प्राण, मन, बुद्धी, आनंदकोश यांच्याही पलीकडे, अगदी आत आत्मा आहे हे समजून घ्यावे.

संकल्पनेची प्रस्तुतता : या संकल्पनेची आध्यात्मिक स्तरावरील सार्वकालिक प्रस्तुतता अशी की, ती ‘ब्रह्मज्ञानप्राप्तीची सोपानपंक्ती’ आहे, असे मानले जाते.

आधुनिक योगोपचार पद्धतीत आजाराचे रूप ठरवताना तो आजार नेमक्या कोणत्या कोशात झालेल्या बिघाडामुळे झाला आहे याचा विचार करून अन्नमय कोशासाठी आसने, प्राणमय कोशासाठी प्राणायाम, मनोमय व विज्ञानमय कोशांसाठी ध्यानधारणा अशा प्रकारच्या उपाययोजना सूचविल्या जातात.

पंचकोश ही संकल्पना व्यक्तिमत्त्व विकासासाठीही उपयुक्त असून तिचा जागतिक शिक्षण क्षेत्रात व्यक्तिमत्त्व विकासाची भारतीय पद्धती म्हणून अवलंब केला जातो.

संदर्भ :

  • फडके, पुरुषोत्तमशास्त्री; दुनाखे, अंशुमती, सार्थ छांदोग्य, ऐतरेय, तैत्तिरीय व श्वेताश्वतर उपनिषद, पुणे, २०१४.
  • रानडे, रा. द.; अनु. गजेंद्रगडकर, कृ. वें. उपनिषद्रहस्य, निंबाळ, २००३.
  • साने, जनार्दन भालचंद्र, वेदांतसार आणि त्याचा मराठी अनुवाद, वाशिम, १८६९.

                                                                                                                                                                समीक्षक : ललिता नामजोशी