अमृतबिन्दु उपनिषद् हे कृष्ण यजुर्वेदाचे उपनिषद् आहे. ह्या उपनिषदामध्ये मन, ब्रह्म, आत्म्याचे एकत्व, शब्दब्रह्म इत्यादी संकल्पनांचा विचार केला आहे.

या उपनिषदानुसार मन हेच बंध आणि मोक्षाचे कारण आहे. कामनारहित असलेले मन शुद्ध असते, तर अशुद्ध मन कामनांनी युक्त असते. विषयवासनेत रमलेले मन मनुष्याला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात बांधून ठेवते, तर वासनारहित मन मुक्तीला कारण होते. मोक्षाची इच्छा करणाऱ्या साधकाने मन विषयांपासून अलिप्त ठेवले पाहिजे. मनाचा निरोध केल्याने ध्यान करणे शक्य होते.

या उपनिषदात ब्रह्माचे स्वरूप पुढीलप्रमाणे सांगितलेले आहे. ब्रह्म हे निष्कल, निश्चल व शांत आहे. स्वर म्हणजे ॐ च्या साधनेने ब्रह्माशी योग साधावा. ‘निष्कल, निर्विकल्प, निरंजन ब्रह्म मीच आहे’ अशी भावना केल्यास ब्रह्म प्राप्त होते. ब्रह्म अनादी, अनंत व अप्रमेय आहे असे जाणल्यामुळे साधक मुक्त होतो. जसे घटाच्या आकाराप्रमाणे विविध आकार धारण करणारे आकाश भिन्न नसून एकच असते तसा जाग्रत, स्वप्न व सुषुप्ती ह्या अवस्थांमध्ये असणारा आत्मा वेगवेगळा नसून एकच आहे. तसेच विविध जीवांतील आत्मा देखील भिन्न नसून एकच आहे.

साधकाने ब्रह्मप्राप्तिसाठी उपनिषदे इत्यादी ग्रंथांचा अभ्यास करावा. श्रवण, मनन व निदिध्यास (एकाग्र चिंतन) यांद्वारे ब्रह्माचे यथार्थ ज्ञान झाले असता ग्रंथांचे अध्ययन थांबवावे. ध्यान हे ब्रह्माच्या साक्षात्काराचे साधन आहे. गायी वेगवेगळ्या रंगाच्या असल्या तरी त्यांच्या दुधाचा रंग एकच असतो. त्याप्रमाणे ब्रह्म जाणणाऱ्या साधकांचे ज्ञान एकच असते. दुधामध्ये वास करणाऱ्या तुपाप्रमाणे प्रत्येक प्राणिमात्राला अविरत चिंतनाद्वारे प्राप्त झालेले विशेष ज्ञान हे एकच असते.

साधक हा ब्रह्मच असल्यामुळे त्याची कधीही जीव या रूपात उत्पत्ती झाली नाही, तो बद्ध नसल्यामुळे तो मुक्त असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, हेच परम सत्य होय.

पहा : यजुर्वेद.

समीक्षक – प्राची पाठक