चुआंग त्झू : (इ.स.पू.सु. ३६९—इ.स.पू.सु.२८६). चिनी तत्त्वज्ञ. चिनी उच्चार ‒ ज्वांग जू. त्याचा जन्म चीनच्या मेंग (सध्याचे शांग-जो शहर) प्रदेशात झाला. त्याचे मूळ नाव चोऊ. हा मेंगमधील चियुआन येथे छोटा अधिकारी होता असे म्हणतात. हा काळ चीनमधील सरंजामशाहीचा काळ होता. देश निरनिराळ्या राजवटींमध्ये विखुरला गेला होता. या काळात चीनमध्ये तत्त्वज्ञानाच्या अनेक शाखा प्रचलित होत्या. कन्फ्यूशस मताच्या विचारवंतांना राज्य हे एखाद्या कुटुंबव्यवस्थेप्रमाणे चालावे असे वाटत होते, तर मो-इस्ट अथवा मो-वादी विचारवंतांना सामाजिक दायित्व महत्त्वाचे वाटत होते. यीन्-यांग-ज्या अथवा विश्वोत्पत्तीविषयक संप्रदायाने व्यक्तिविकासाला अग्रक्रम दिला, तर मींग-ज्या किंवा फन्-ज्या (तार्किक अथवा तर्कवादी संप्रदाय) या संप्रदायाने तर्कशास्त्राला प्राधान्य दिले. फा-ज्या अथवा निर्बंधवादी (लीगॅलिस्ट) तत्त्वज्ञांना कायद्याचे राज्य आदर्शवत वाटले. या सार्‍यांहून ताओ संप्रदाय वेगळा होता आणि चुआंग त्झू हा याच तत्त्वज्ञानाचा प्रतिनिधी होता. लाओ-त्झू याचा हा मार्ग माणसाला निसर्गाकडे परतण्याची शिकवण देतो. चुआंग त्झूने आपल्या साहित्यात लाओ-त्झूच्या ताओ-ते-चिंग (दाव-द-जिंग) या पुस्तकामधील अनेक अवतरणे दिली आहेत. त्याच्या प्रमुख ग्रंथाचे नावदेखील चुआंग त्झू हेच आहे.

एक काल्पनिक चित्र

त्याच्या चुआंग त्झू या ग्रंथाची ३३ प्रकरणे असून इ.स.च्या पहिल्या शतकात ५२ प्रकरणांची प्रत उपलब्ध असल्याचे संकेत मिळतात. हा ग्रंथ तीन भागांत म्हणजे १ ते ७ प्रकरणे ही अंतरंग प्रकरणे (Inner Chapters), ८ ते २२ ही बहिरंग प्रकरणे (Outer Chapters) आणि २२ ते ३३ संकीर्ण (Miscellaneous) अशा तर्‍हेने विभागला आहे.

चुआंग त्झूच्या जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. जी माहिती अवगत आहे ती विख्यात चिनी इतिहासकार सुमा चियेन (स्स-मा-च्यन) याने शी ची (इं.शी. हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स) या ग्रंथात दिली आहे. चिनी दप्तरांवरून असे आढळते की, चुआंग त्झू हा लियांग राज्याचा राजकुमार हुई आणि चि राज्याचा राजकुमार सुआन यांचा समकालीन होता. त्याचे लेखन जवळपास एक लाख शब्दांपर्यंत भरते आणि ते सारे प्रतिकात्मक स्वरूपाचे आहे. त्याच्या लेखनात वैविध्य आहे. त्याच्या इतर साहित्यात द ओल्ड फिशरमॅन, रॉबर चे आणि ओपनिंग ट्रंक्स इत्यादी उल्लेखनीय ग्रंथ असून त्याने आपल्या साहित्यात कन्फ्यूशस व मो-इस्ट यांच्या तत्त्वज्ञानावर हल्ला चढवलेला आहे. चुआंग त्झू हा आपल्या लेखनामुळे लोकप्रिय असावा. त्याचे लेख उच्च दर्जाचे होते.

चीनमधील एक श्रेष्ठ गूढवादी तत्त्वज्ञ म्हणून चुआंग त्झूची ख्याती आहे. ताओ सिद्धांतांची त्याने विस्तारपूर्वक व सखोलपने पद्धतशीर मांडणी केली व ताओवादाला पूर्णत्व देण्याचे मोठे कार्य केले. ‘निसर्गविरोधी कृती करू नका’ हे ताओंच्या तत्त्वज्ञानाचे मुख्य सूत्र त्याने स्वीकारले व त्याला आध्यात्मिक अधिष्ठान व प्रतिष्ठा मिळवून दिली.

चुआंग त्झूने आपला बराच काळ एकांतवासात घालविला. असे म्हटले जाते की, निसर्गाचे सामर्थ्य आणि त्यातील आश्चर्ये यांचे विलक्षण आकर्षण त्याला होते. त्याची शिकवण ही पुराच्या जोरदार पाण्याप्रमाणे आहे, जे कसल्याही बंधनाला न जुमानता आपल्या इच्छेनुसार पसरते. त्याच्या या बंधनाला न जुमानणार्‍या स्वभावाशी निगडित एक गोष्ट प्रसिद्ध आहे. चू राज्याचा राजकुमार वेई याने चुआंग त्झूची लोकप्रियता ऐकून त्याच्याकडे मौल्यवान नजराणे घेऊन आपला दूत पाठवला आणि त्यास आपल्या राज्याचा पंतप्रधान होण्याचे निमंत्रण दिले. चुआंग त्झूने राज्याच्या नोकराची तुलना बळी देण्यासाठी खायलाप्यायला घालून जाडजूड केल्या जाणार्‍या बैलाशी केली. जेव्हा बळी देण्याचा दिवस येईल, तेव्हा तो बैल एखाद्या चिखलात लोळणार्‍या छोट्या डुकराची जागा घ्यायलाही आनंदाने तयार होईल. पण तेव्हा उशीर झालेला असेल. हे रूपक त्याने राजकुमाराच्या दूताला ऐकवून निमंत्रण नाकारले आणि गुलाम होण्यापेक्षा मला स्वतःच्या इच्छेने जगणे पसंत आहे, असा जवाब दिला. ताओंच्या गूढवादानुसार सत्तेपेक्षाही व्यक्तिस्वातंत्र्य त्याने महत्त्वाचे मानले.

त्याचा मृत्यू कसा व कोठे झाला या संदर्भातली माहिती उपलब्ध नाही.

संदर्भ :

  • Giles, Herbert A. Trans. Chuang Tzu, Mystic, Moralist and Social Reformer, London, 1889.
  • http://sino-platonic.org/complete/spp048_chuangtzu_zhuangzi.pdf

                                                                                                                                       समीक्षक : अमिता वाल्मिकी