बृहत्कल्पसूत्र : अर्धमागधी भाषेतील आगमेतर ग्रंथांमधील छेदसूत्रातील महत्त्वाचे सूत्र. याचे मूळनाव ‘कप्प’ असे आहे. परंतु दशाश्रुतस्कंधाच्या आठव्या अध्ययनात पर्युषणकल्पसूत्र आल्यामुळे याला बृहत्कल्पसूत्र असे म्हणतात. याचा कर्ता श्रुतकेवली भद्रबाहु आहे असे मानतात. ‘कल्प’ या शब्दाचे बरेच अर्थ आहेत. परंतु बृहत्कल्पसूत्रात साधु-साध्वींनी काय कल्प्य आहे व काय अकल्प्य आहे हे सांगितले आहे.म्हणजे साधु-साध्वींनी काय करावे व काय करु नये याचे विवेचन-नियम आहेत आणि नियम मोडले तर त्याला प्रायश्चित्त आहे.बृहत्कल्पाचे ६ उद्देशक आहेत.त्यामध्ये एकूण २१८ सूत्रे आहेत.
पहिल्या उद्देशकात – वनस्पतीच्या मूळापासून बीजापर्यंतचे खाण्यायोग्य भाग अचित्त असले तर साधु खाऊ शकतात व मोठेमोठे तुकडे असले व अचित्त असले तरी साध्वी खाऊ शकत नाहीत, साधु-साध्वींना गाव, नगर यामध्ये एक महिना राहता येते, उपनगरात ते अनेक मास-कल्पपर्यंत राहू शकतात,जेथे राहतात तेथेच भिक्षा मागता येते याप्रकारचे नियम सांगितले आहेत. एका काळात राहण्यायोग्य व गमनागमनविषयी नियम,अनेक प्रकारच्या उपाश्रयात राहण्याविषयीचे कल्प व अकल्प नियम, मातीचा लहान घडा सोबत घेण्याचे नियम, मच्छरदाणी ठेवण्यासंबंधीचे नियम, नदी किंवा जलाशयाच्या काठी उभे राहणे याचे नियम, यजमानाचे संरक्षण घेणे किंवा न घेणे याचे नियम,क्लेशाला पूर्ण उपशांत करणे यासंबंधीचे नियम, विचरण काल व क्षेत्राच्या मर्यादेविषयीचे विचारयाचे नियम,विरोधी राज्यात येजा करण्याविषयी नियम, गोचरीला गेले असता साधु-साध्वीनी वस्त्र घ्यावे की न घ्यावे याचे नियम, रात्री आहार व विहार करण्याविषयीचे नियम, तसेच अन्नछत्रात न जेवण्यासंबधीचे विचार व रात्री उपाश्रयाच्या सीमेबाहेर न जाण्याविषयीचे नियम अशाप्रकारचे विविध नियम साधू-साध्वी यांच्यासाठी पहिल्या उद्देशकात नमूद केले आहेत.
दुसऱ्या उद्देशकात धान्य, सुरा, पाणी, अग्नि, दीप व खाद्यपदार्थयुक्त घरात राहण्याविषयीचे नियम, असुरक्षित स्थानाविषयी, एकशय्या स्वामीची आज्ञा घेण्याविषयी, यजमानाच्या हुकमतीत बनवलेल्या जेवणाविषयीचे नियम, कल्पनीय वस्त्र व रजोहरणाचे प्रकार वगैरे विषयांचे वर्णन आले आहे.तिसऱ्या उद्देशकात साधु-साध्वीनी एकमेकांच्या उपाश्रयात उठण्या बसण्या विषयीचे नियम आहेत. तसेच चर्मग्रहण करण्याविषयीचे व वस्त्रग्रहणासंबंधीचे विचार व दीक्षेच्या वेळेस घेण्याच्या उपकरणाविषयी, दीक्षा पर्यायाच्या क्रमाने वंदन वगैरे करण्याविषयी, गृहस्थाच्या घरात बसून त्यांच्याशी गप्पा मारत बसण्याबाबतचे नियम, अंथरुण व पांघरुण संबंधीचे नियम, नवीन आलेल्या साधुविषयीचे नियम, जेथे सैन्याचा पडाव असेल त्यागावात गोचरीला जाण्याविषयीचे नियम व उपाश्रयाच्या क्षेत्रात (हद्दीत) जाण्या-येण्याविषयीच्या नियमांचे विवरण आहे.
चौथ्या उद्देशकात अनुद्घातिक,पारांचिक (एखाद्या साधूला शिक्षा म्हणून कायमचे संघाबाहेर काढणे),अनवस्थाप्य (एखाद्या साधूलाकाही काळासाठी शिक्षा म्हणून संघाबाहेर काढणे) वगैरे प्रायश्चित्ताविषयीची माहिती, दीक्षा, वाचनावशिक्षा (शासन किंवा प्रणाली) याच्या योग्य व अयोग्यते विषयी, मैथुनभावाच्या प्रायश्चित्ताविषयी, आहाराचे क्षेत्र व कालाच्या मर्यादेविषयी, अनैषणीय आहाराच्या उपयोगाविषयी, कल्पस्थित व अकल्पस्थित याविषयीचे वर्णन आले आहे. अध्ययनाकरता इतरगणात जाण्याविषयीचे नियम, मृत्युपावलेल्या साधुचे कलेवर एकान्तात नेऊन सोडून देण्याविषयीचे नियम, दुःखी (रुग्ण) साधुला कोठे ठेवावे याविषयी, परिहार तपाचरण करणाऱ्या भिक्षुच्या प्रति असलेल्या कर्तव्याची, नदीपार करण्यासंबंधी, गवत वगैरे उगवलेल्या (उजाड, मोडक्या, कोणी राहात नसलेल्या) घराविषयीचे सविस्तर वर्णन आहे.
पाचव्या उद्देशकात रात्री भोजन व त्याच्या प्रायश्चित्ताविषयीचे विचार आहेत तसेच संसक्त आहाराच्या विवेकाविषयी, साध्वीने एकटे राहू नये व आतापना (कायाक्लेश) घ्यावी का न घ्यावी याविषयी, तसेच प्रतिज्ञाबद्ध आसन करु नये याविषयीची माहिती, अनेक उपकरणाच्या कल्प्य व अकल्प्यते विषयीचे वर्णन, परस्परांच्या मूत्राच्या उपयोगासंबंधीचे वर्णन, परिवासित (शिळेअन्न) आहार व औषधे यासंबंधीचे नियम, पारिहारिक भिक्षुचे अतिक्रमण व पौष्टिक आहाराविषयीचे नियम वर्णिले आहेत.
सहाव्या उद्देशकात साधु-साध्वींना सहा प्रकारची वचने अकल्प्य आहेत. कोणाही साधुवर (किंवा इतरांवर) खोटे आरोप लावू नये. त्यामुळे स्वतःलाच प्रायश्चित घ्यावे लागते. साधु-साध्वी एकमेकांच्या पायातील काटा किंवा डोळ्यात काही गेले तर ते काढू शकतात. सूत्रात सांगितलेल्या परिस्थितीतच साधु साध्वीला सहारा देऊ शकतो. सेवा सुद्धा करु शकतो. साधु-साध्वीनी संयमाचा नाश करणाऱ्या दोषांचा त्याग करायला हवा व संयम पालन करणाऱ्यांनी सहा प्रकारच्या आहार मर्यादा पाळायला हव्यात असे विवेचन केले आहे.
बृहत्कल्पावर भद्रबाहु विरचित निर्युक्ति,संघदासगणींचे लघुभाष्य ही महत्त्वपूर्ण भाष्ये आहेत.बृहत्कल्पचूर्णि मूलसूत्र व लघुभाष्यावर आधारित आहे.चूर्णीचे पीठिका व सहा उद्देश आहेत. आचार्य मलयगिरी व आचार्य क्षेमकीर्तीनी लिहिलेल्या निर्युक्ति व लघुभाष्यावर पीठिकावृत्ति आहे. आचार्य मलयगिरींनी लिहिलेल्या पीठिकेमध्ये ६०६ गाथा आहेत. बृहत्कल्पासंबंधी शुब्रिंगची जर्मन भाषेतील टिपणी प्रसिद्ध आहे. बृहत्कल्पाचा डॉ. जीवराज घेलाभाई दोशी यांचा गुजराथी आणि आगम अनुयोग प्रकाशनाचा हिंदी अनुवाद प्रकाशित झाला आहे.
संदर्भ : चतुरविजय-पुण्यविजय(संपा), बृहत् कल्पसूत्रम्, श्री जैन आत्मानंद सभा, भावनगर, २००२.
समीक्षक : कमलकुमार जैन