प्रतिष्ठा तिलक : (सुमारे १२ वे शतक). आचार्य नेमिचंद्र रचित प्राकृत, संस्कृत भाषेतील मूर्तीप्रतिष्ठा व स्थापनेसंबंधी हा जैनग्रंथ आहे. एखादी प्रतिमा निर्माण केल्यानंतर त्यावर विशेष मंत्रसंस्कार आदींनी जो विधी केला जातो त्याला प्रतिमाप्रतिष्ठाविधी असे म्हटले जाते. या प्रतिष्ठेचाही विशिष्ट विधी कथन करण्यासाठी जैन आचार्यांनी अनेक ग्रंथ रचले आहेत त्यांना प्रतिष्ठाग्रंथ असे संबोधले जाते. अनेक प्रतिष्ठा ग्रंथांपैकी नेमिचंद्राचार्य या श्रेष्ठ रचनाकाराने जो ग्रंथ लिहिला तो प्रतिष्ठा तिलक या नावाने ओळखला जातो. हा ग्रंथ संस्कृत भाषेत असून विशेष प्रसंगी प्राकृत मंत्रसंस्कार ही देण्यात आले आहेत. हा ग्रंथ १७ परिच्छेदात रचला असून मूर्ती प्रतिष्ठेसंबंधी विविध १०९ विषयांची यादी देण्यात आली आहे.

लेखकाच्या वंशपरंपरेचे संपूर्ण वर्णन प्रतिष्ठा तिलक  ग्रंथाच्या अंतिम प्रशस्तीत आले आहे. त्यानुसार वर्तमानकाळातील २४ तीर्थंकरांपैकी भगवान आदिनाथांचे पुत्र भरतेश यांनी ब्राह्मण वर्णाची उत्पत्ती केली. अनेक उत्कृष्ट ब्राह्मण तयार केले. त्यापैकी या ब्राह्मणांनी अर्थात पूजकांनी जिनधर्माचा विधी विशेष प्रकारे प्रसारित केला. विशाखाचार्यांनी त्यापैकी अनेकांना सदुपदेश देऊन जिनशास्त्रात निपुण केले. हे ब्राह्मण बालपणापासून साधक राहात, तरूणपणी श्रेष्ठी व राजे यांच्याकडून सन्मानपूर्वक भोगोपभोग घेत असत व त्याच काळात निर्मळ बुद्धीने निर्ग्रंथ दीक्षा घेऊन आत्मकल्याण करीत. त्याप्रमाणेच यांच्या कुळात अनेक व्रतपालक ब्राह्मण होऊन गेले. वंशपरंपरेने प्राप्त उल्लेखानुसार चोल राजाच्या काळात लोकपालाचार्य नामक श्रेष्ठ पंडित ब्राह्मण होऊन गेले. त्यांना समयनाथ व पार्श्वनाथ अशी मुले होती. पार्श्वनाथांना ब्रह्मदेव व ब्रह्मदेवांना देवेंद्र अशी परंपरा पुढे आली. देवेंद्र व त्यांची धर्मपत्नी आदिदेवी यांना आदिनाथ आणि नेमिचंद्र व विजयंत अशी तीन मुले होती. त्यापैकी नेमिचंद्र यांनी प्रतिष्ठातिलक ग्रंथाची रचना केली.

ग्रंथातील भाषा व उल्लेखावरून हा ग्रंथ पंधराव्या शताब्दीतील आहे असे वाटते. अन्य समानांतर उल्लेखावरून हा ग्रंथ १२ व्या शतकाच्या शेवटचा अथवा १३ व्या शतकाच्या प्रांरभीचा असावा असे काही आचार्यांचे मत आहे. जैनशासनात अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय व साधू हे पाच परमेष्ठी मानले आहेत. संसारातून मोक्षाकडे जाण्यासाठी जे व्रत धारण करतात, गृहत्याग करून सर्व परिग्रहांचा त्याग करत आत्मसाधना करतात अशा दिगंबर मुनींना साधू म्हटले जाते. या साधू पदातील विशिष्ट त्यागी आहेत ते ज्ञानसाधना ग्रहण केल्यानंतर नवसाधूंना सिद्धांतशास्त्राचे पठन-पाठन करतात. त्यांना उपाध्याय असे म्हटले जाते. साधू व उपाध्याय अशा संघाला संचालन करणाऱ्या प्रमुख साधूंना आचार्य असे म्हटले जाते. विशिष्ट पुण्यबंधाने अरिहंत पद प्राप्त करून जे स्वकल्याणाबरोबर परकल्याणासाठी समवसरणाच्या माध्यमातून सर्व सामान्यांना उपदेश देतात, त्यांना अरिहंत असे म्हटले जाते. सर्व कर्मांपासून मुक्त होऊन जे विश्वाच्या उच्च पदावर, सिद्धशिलेवर स्थिर होतात अर्थात्‌ मुक्ती प्राप्त करतात, त्यांना सिद्ध असे म्हटले जाते.  जिनशासनामध्ये प्रामुख्याने या पंच परमइष्ट देवतांच्या प्रतिमा बनविल्या जातात. त्याचबरोबर त्यांचे अन्यही सेवक, यक्ष-यक्षिणी तसेच दशदिक्पाल आदींच्याही प्रतिमा जैन शास्त्रानुसार आढळून येतात.

प्रतिष्ठा तिलक  हा ग्रंथ खरोखरच नावाप्रमाणे प्रतिष्ठेतील श्रेष्ठ तिलक आहे. यातील नेमिचंद्रांच्या प्रतिष्ठातिलकातील चौथ्या श्लोकानुसार नावाच्या सार्थकतेबद्दल सांगताना रचनाकार म्हणतात – प्रतिष्ठानां प्रधानत्वात्‌ प्रतिष्ठातिलकं मतम्‌| प्रतिष्ठास्थापनान्यासो जिनादे: प्रतिमादिषु || अर्थात्‌ अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय, साधू किंवा श्रुतस्कंध, यक्ष-यक्षिणी आदींच्या सुवर्ण, चांदी, तांबे इ. धातूंची बनविलेली यंत्रे, यांची विधीपूर्वक स्थापना करणे याला प्रतिष्ठा असे म्हणतात. लाकूड, पुस्तक, चित्र आदींची प्रतिष्ठा केल्याचे काही ठिकाणी उल्लेख आढळतात. अशा प्रकारे विविध टप्प्यातील संस्कारांचे एकत्रीकरण करून प्रमाणबंध अशा प्रतिष्ठा तिलक ग्रंथाची रचना नेमिचंद्र यांनी केली आहे. सदर ग्रंथ अनेक पूर्वाचार्यांच्या ग्रंथांचा व विद्वानांच्या रचनांचा अभ्यास करून तयार करण्यात आला आहे. विशेष करून इंद्रनंदी प्रतिष्ठाग्रंथास रचनाकाराने विशेष महत्त्व दिले आहे.

सदर ग्रंथातील प्रथम परिच्छेदात पूजेचे प्रकार व त्यांचे लक्षण, श्रावकांचे कर्तव्य, प्रतिष्ठाविधीची प्रस्तावना, यंत्र- आराधना, भक्तिपठण, सकलीकरण अशा १६ घटकांचे वर्णन आले आहे. द्वितीय परिच्छेदात प्रतिष्ठेपूर्वी दिक्पाल-सत्कार, पुण्याह मंत्र इ. ४ विधींचे वर्णन आले आहे. तृतीय परिच्छेदात शांतिहोम विधी, होममंडप, मंडपलक्षण, जलहोमविधान इ. ४ विधींचे वर्णन आले आहे. चौथ्या परिच्छेदात यज्ञशाला-प्रवेश, लघुशांती, नवग्रह-पूजा विधी व वेदी बनविण्याचे वर्णन आले आहे. प्रतिष्ठेपूर्वीची तयारी यामध्ये उत्कृष्टपणे सांगितली आहे. पाचव्या परिच्छेदात ध्वजारोहण, बृहद्शांती, भेरीताडण इ. ६ विधींचे वर्णन आले आहे. ध्वजारोहण झाल्यावर ती ध्वजा कोणत्या दिशेस फडकते त्यावरून विधीचा परिणाम भविष्यात काय होणार आहे या संबंधीचे सुंदर तर्क यामध्ये सांगितले आहेत. सहाव्या परिच्छेदात यागमंडल-आराधना व वेदीप्रतिष्ठा विधीचे वर्णन आहे. सातव्या परिच्छेदात गर्भकल्याणकविधी अंतर्गत चोवीस मातांचा सत्कार, गर्भशुद्धी, मातेला पडणारी १६ स्वप्ने व त्याचे फळ, धामसंप्रोक्षण अर्थात्‌ जिनमंदिर शुद्धी संबंधीचे वर्णन आहे. आठव्या परिच्छेदात तीर्थंकर बालकाच्या जन्माभिषेक कल्याणकाच्या अंतर्गत कलश स्थापना, जन्मकालीन १० अतिशय स्थापना, धूलीकलशाभिषेक, नामकरण-विधान व ज्या त्या तीर्थंकरांच्या जीवनातील प्रसंगानुसार पट्टाभिषेक व राजलीलेचे वर्णन आले आहे. या परिच्छेदातील अभिषेक विधीनुसारच जैन परंपरेत मूर्तीचा अभिषेक केला जातो.

नवव्या परिच्छेदात तीर्थंकर मूर्तीवरील दीक्षाकल्याणक संस्काराचे वर्णन आले आहे. प्रत्येक तीर्थंकरांना वैराग्याचे कारण कसे निर्माण झाले? या संबंधीचे वर्णन व मंत्रसंस्कार यात आले आहे. विविध संस्काराप्रसंगी साधू व त्यागींनी प्राकृतमंत्र पठन कसे करावेत, याचेही वर्णन या परिच्छेदात आहे. दहाव्या परिच्छेदात तीर्थंकरांना तपश्चर्येनंतर केवलज्ञान प्राप्त होते यासंबंधीचे वर्णन आहे. या अंतर्गत कल्याणमालारोपण, संस्कारमालारोपण, मंत्रन्यासविधान, गंधयंत्रआराधना, द्वाविंशति आशीर्वाद, समवसरणाचे विस्तृत वर्णन, देवकृत चौदा अतिशय व जिनसहस्त्रनामाचे वर्णन आले आहे. मूर्तिप्रतिष्ठेत या कल्याणकाला अत्यंत महत्त्व आहे. या मंत्रसंस्कारानेच विशिष्ट तीर्थंकरांच्या आकारात घडविलेला पाषाण पूजनीय होतो. समवसरणाच्या माध्यमातून तीर्थंकर जनसामान्यांना जो सदुपदेश देतात याचे वर्णन यात आहे. अकराव्या परिच्छेदात निर्वाण अर्थात्‌ मोक्षकल्याणकाचे संस्कारविधी कथन केले आहेत. या अंतर्गत गुणरोपण, अष्टगुणपूजा इ. चा विधी देण्यात आला आहे. बाराव्या परिच्छेदात शांतिक विधान, महाभिषेक, १२ प्रकारच्या अवतरणविधींचे वर्णन आहे. तेरा, चौदा व पंधराव्या परिच्छेदात विधिकुंभविन्यासचे वर्णन करून मध्यम व संक्षेप प्रतिष्ठाविधी कसा करावा याचेही वर्णन आहे. सोळाव्या परिच्छेदात तीर्थंकरांव्यतिरिक्त सिद्ध, आचार्य, श्रुतदेवता, यक्ष-यक्षिणी आदी प्रतिमांच्या प्रतिष्ठेचे वर्णन आले आहे. शेवटच्या सतराव्या परिच्छेदात प्रतिष्ठेसंबंधीच्या विविध उत्सवांचे वर्णन आहे. त्याचबरोबर ग्रंथकर्ता नेमिचंद्रांच्या वंशपरंपरेचे व काळ यासंबंधीचे वर्णन आले आहे. या परिच्छेदात मूर्ती कशी निर्माण करावी व तिचे प्रमाण काय असावे या संबंधीचे वर्णन बारकाईने केले आहे. मूर्तीला माध्यम मानून आत्मसाधना कशी करावी याचेही वर्णन यात आहे. एकंदरीत विविध परिच्छेदांतून राहिलेले सर्व विषय, यंत्रांची माहिती, आकार या संबंधीचेही वर्णन आहे.

मूर्तीचे पाषाण, मूर्तिकार, प्रतिष्ठाकार, प्रतिष्ठाचार्य हे सर्व कसे असावेत व प्रतिष्ठेतील विकार कोणते या संबंधीचे उत्कृष्ट वर्णन यात आले आहे. संपूर्ण भारतातच नव्हे तर अन्य देशातही जैनमूर्ती स्थापन करताना हा ग्रंथाला आधारभूत मानला जातो. मूर्तींच्या प्रतिष्ठापनेवेळी त्याच्या पट्टावर जी प्रशस्ती कोरली जाते त्यामध्येही या ग्रंथाचे वर्णन आले आहे.

संदर्भ :

  • उपाध्याय,सुशील कुमार (संपा), प्रतिष्ठा तिलक, आचार्य नेमिचंद्र दक्षिण भारत उपाध्याय समिती, कोल्हापूर,१९९२.

समीक्षक : कमलकुमार  जैन