हस्तलिखितांची साधने : आदिममानवाने भावभावनांच्या अभिव्यक्तीसाठी चित्र काढण्यास सुरवात केली. चित्रांची लिपी अपुरी पडल्यावर तो अक्षरलिपीकडे वळला. महत्त्वाच्या घटना दीर्घकालीन व्हाव्यात या अपेक्षेने लेखनाची टिकाऊ साधने माणसाने शोधली. आपण लिहिलेला मजकूर चिरकाल टिकावा यासाठी शिलालेख कोरले गेले. शिलालेखाला मर्यादा असल्याने ताम्रपट बनवण्यास सुरवात झाली. शिलालेख आणि ताम्रपट हे सामान्य माणसास परवडणारे नसल्याने झाडाच्या साली, पाने यांचा उपयोग लेखनासाठी केला गेला. आज उपलब्ध असणाऱ्या हस्तलिखितग्रंथ संग्रहावरून तत्कालीन हस्तलिखितांची साधने काय होती याचा बोध होतो.लेखनासाठी शाई, रंग,लेखणी अथवा कोरणी,लाकडी फळ्या आणि ज्यावर लेखन केले जाऊ शकते असे कागद,झाडाचे पत्र, प्राण्यांची त्वचा आदी गोष्टींची आवश्यकता असते. शाई, रंग हे जरी सर्वत्र सारखेच असले तरी कागद,झाडाची पाने किंवा साल अथवा प्राण्यांची कातडी हे उपलब्धतेनुसार देश-काळपरत्वे भिन्न भिन्न असतात.

शाई – परंपरागत शाई बनवण्याच्या पद्धती स्थानपरत्वे निरनिराळ्या आहेत. त्यापैकी साधारणतः सर्वत्र आढळणारी पद्धत म्हणजे तिळाच्या तेलाची काजळी तांब्याच्या पत्र्यावर गोळा करून ती नंतर डिंक व पाणी यात घोटून शाई तयार करत असत. दुसऱ्या एका पद्धतीनुसार बाजरीचे कणीस किंवा हिरडा/बेहाडा हे जाळून त्याच्या कोळश्याची वस्त्रगाळ भुकटी डिंकात आणि तिळाच्या तेलात घोटून शाई तयार केली जात असे. याबरोबरच लोखंडाचे क्षार मिसळलेली शाई देखील काही वेळा आढळते; परंतु ती जड असल्याने त्या शाईने लिहिलेला कागद मजकुरावर विरलेला आढळतो. या शाईचा वाप रक्वचितच सापडतो. काजळी घोटतांना त्यात डिंक कमी आणि पाणी जास्त असले तर त्या शाईने लिहिलेला मजकूर हवेतील आर्द्रतेने किंवा पाण्याच्या संपर्कात आल्यावर पसरलेला आढळतो. त्या तुलनेत कोळश्याच्या पुडीपासून बनवलेल्या घट्ट शाईने लिहिलेला मजकूर पाण्याच्या संपर्कात आल्यावरही तसाच राहिलेला आढळतो.

 

प्राचीन ईजिप्तमधील हस्तलिखीतांची साधने

रंग – वैदिक मंत्रांचे स्वर, समास आणि चित्र यासाठी काळ्या शाई व्यतिरिक्त काही रंगांचा उपयोग केला जात असे. ते रंग खनिजांपासून मिळवलेले असत. लाल रंगासाठी अळीता, लाख, शेंदूर, हिंगुळ, पिवळ्या रंगासाठी हरताळ, निळ्या रंगासाठी नीळ, भुऱ्या रंगासाठी गेरू,हिरव्या रंगासाठी तांब्याच्या पत्र्यावरील कळंक, पांढऱ्या रंगासाठी शंख, चुनखडी, जस्ताचा क्षार,चंदेरी रंगासाठी चांदीचा रंग अथवा वर्ख, कथिल, सोनेरी रंगासाठी सोन्याचा रंग अथवा वर्ख या सगळ्यात आवश्यकतेनुसार पाणी आणि डिंक घालून उपयोगात आणत. शाई बनवतांना हिरडा/बेहडा या औषधी वनस्पतींचा आणि खनिज द्रव्यांचा रंगासाठी केलेला उपयोग यांचा वर्षानुवर्षे वातावरणातील धुळीशी संपर्क होऊन काही रासायनिक प्रक्रिया होत असतात.त्याचा परिमाण ते हाताळणाऱ्याच्या आरोग्यावर होऊ शकतो म्हणून हस्तलिखिते हाताळतांना काळजी घेणे आवश्यक आहे.

बांबूच्या कामटीपासून तयार केलेले बोरू

कागद आणि भूर्जपत्रावर लिहिण्यासाठी बांबूच्या कामटीपासून तयार केलेले बोरू आणि टाकयांच्या सहाय्याने लेखन करत.लोखंड किंवा चांदी या धातूपासून बनवलेल्या कोरणीच्या सहाय्याने मजकूर कोरून नंतर भूर्जपत्रावर त्यात शाई भरली जात असे.कोऱ्या कागदावर लेखन एका ओळीत येण्यासाठी फळीला दोन्ही बाजूने एकसारख्या अंतरावर छिद्र करून समोरासमोरील छिद्रातून दोरा घालत आणि मागच्या बाजूने त्याची टोकं बांधून टाकत. फळीवरील ओळींचे ठसे अंगठ्याने कागदावर उमटवून त्यानुसार लेखन करत.

ज्यावर लेखन केले जाते ती हस्तलिखितांची साधने प्रामुख्याने असेंद्रिय आणि सेंद्रिय या दोन प्रकारात विभागली जातात.अग्नीच्या संपर्कात आल्यावर तसेच राहणारे असेंद्रिय पदार्थ तर अग्नीशी संपर्क आल्यावर जे कार्बनरूपाने शिल्लक राहतात ते सेंद्रिय पदार्थ होत.असेंद्रिय लेखन साहित्यात शिलालेख, ताम्रपट, मुन्मुद्रा यांचा समावेश होतो आणि सेंद्रिय लेखनसाहित्यात प्राणीजन्य व वनस्पतीजन्य असे दोन उपप्रकार आहेत.
अ) असेंद्रिय – १.शिलालेख– पाषाणावर लेख लिहिण्यापूर्वी तो घासून गुळगुळीत करत त्यावर काळ्या शाईने किंवा खडूने मजकूर लिहून नंतर छिन्नीने तो कोरला जातो. सम्राट अशोकाचे शिलालेख हे भारतातील आज उपलब्ध असणाऱ्या लेखात सर्वात प्राचीन मानले जातात.शैलगृहांमध्ये असे शिलालेख आजही पाहायला मिळतात.

ताम्रपट

 

२.ताम्रपट – तांब्याच्या पत्र्यावर मजकूर लिहून नंतर तो कोरला जातो. दोन पत्र्यांवरील मजकूर एकमेकांवर घासला जाऊ नये यासाठी पत्र्याच्या कडा किंचित आत वळवल्या जातात. पत्रे एकत्र एका तांब्याच्या कडीत घालून त्यावर मुद्रा लावतात.ताम्रपट हे प्रामुख्याने दानपत्र असतात. निरनिराळ्या राजवटींचा इतिहास समजून घेण्यास ते उपयुक्त ठरत आहेत.

३.मृन्मुद्रा – मातीच्या मुद्रेवर मजकूर कोरून नंतर ती मुद्रा/वीट भट्टीत भाजली जाते.बौद्ध धारणीसूत्रे आणि पहिल्या शतकातील राजे दाममित्र आणि शिलवर्मन यांनी यज्ञ केल्याचे लेख मातीच्या विटांवर आहेत. मेसोपोटेमियामध्ये नद्यांच्या परदेशात अतिशय मऊ गाळ उपलब्ध आहे तेथे क्युनिफॉर्म लिपीतील कितीतरी मृन्मुद्रा सापडतात.

मृन्मुद्रा

) सेंद्रिय – अ) प्राणीजन्य – पार्चमेंट. पार्चमेंट म्हणजेच प्राण्याच्या आतड्यांवर दोन्ही बाजूने लिहिता येते. मध्यपूर्व आणि युरोपमध्ये याचा उपयोग केला जायचा. याचा शोध इसवी सनपूर्व १९७-१५९ मध्ये लागला. कोणत्याही प्राण्याच्या कातडीवर एकाच बाजूने लिहिलेली हस्तलिखिते मिळतात. शक्यतो आवरणासाठी याचा उपयोग होतो. प्राण्यांची हाडे, हस्तिदंत, प्राण्याचे दात यावरही लेखन केले जात असे. रोमन साम्राज्यात इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील हस्तिदंतावरील लेख सापडतात. हस्तिदंताचे दोन अथवा अधिक तुकडे धातूच्या कडीत ओवून किंवा दोरा-लेदरने एकमेकांना बांधून ठेवतात.रानटी प्राण्यांच्या दातांवरही लेखन केलेले सापडते.
पाश्चिमात्य देशात लेखनासाठी प्राणीजन्य पदार्थांचा उपयोग केला आहे.भारतात याचा वापर फारसा आढळत नाही, कारण भारतातील लेखन हे धार्मिक साहित्यासंदर्भात असल्याने प्राणीजन्य पदार्थांचा उपयोग टाळला असावा. क्वचितप्रसंगी बाडांचे आवरण चामडयापासून केलेले आढळते.

)     वनस्पतीजन्य – यात भूर्जपत्र, ताडपत्र, कडितास, सांचिपट, पपायरस आणि कागद इत्यादींचा समावेश होतो.  भूर्जपत्र –उत्तर भारतात विशेषतः काश्मीरमध्ये यावर लिहिलेली हस्तलिखिते सापडतात. हिमालयाच्या उतारावर आढळणाऱ्या भूर्ज झाडाच्या खोडाचा वरचा कठीण थर काढुन आतल्या सालाचा उपयोग लेखनासाठी केला जात असे. या सालाची एक बाजू गडद लाल रंगाची आणि दुसरी बाजू गुलाबी रंगाची असते. ही साल सावलीत वाळवून त्याचे गुलाबी रंगाच्या बाजूने दोन थर डिंकाच्या सहाय्याने एकमेकांना चिटकवले जातात आणि नंतर गडद लाल रंगाच्या बाजूने लिहिण्यासाठी उपयोगात आणतात.कार्टिअस या ग्रीक ग्रंथकाराने आणि भारतीय कवी कालिदासाने भूर्जपत्राचा उल्लेख केला आहे. भूर्जपत्रावरचा सर्वात प्राचीन ग्रंथ धम्मपद हा इसवी सनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकात खरोष्टी लिपीत लिहिला आहे.संयुत्तागम हा इसवी सनाच्या चौथ्या शतकातला आहे.

भूर्जपत्रावरचा सर्वात प्राचीन ग्रंथ धम्मपद : पृष्ठप्रत

ताडपत्र –श्रीलंका, ब्रह्मदेश, थायलंड, दक्षिण भारत, ओरिसा आणि गुजराथ-राजस्थानचा काही भाग या प्रदेशात ताडपत्रावर लेखन केले जाते.ताडवृक्षाची कोवळी पाने तोडून ती चिखलात भिजवून ठेवतात. नंतर सावलीत सुकवून हळदीच्या पाण्यात उकळवून परत सावलीत सुकवतात. ही प्रक्रिया ते पान लिहिण्या योग्य होईपर्यंत केली जाते. कोरणीच्या सहाय्याने त्यावर मजकूर कोरून त्यात शाई भरली जाते. गुजराथ-राजस्थानमध्ये जाड कुंचल्याच्या सहाय्याने यावर लेखन करतात. बौद्ध जातकात लिहिण्यासाठी पण्ण म्हणून जो उल्लेख आहे तो बहुधा ताडपत्रासाठीच असावा. त्रिपिटक हा ग्रंथ ताडपत्रावर लिहिला आहे असे युआन च्वांगने म्हंटले आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून ताडपत्रावर लिहिलेले ग्रंथ आढळतात. इसवी सनाच्या सातव्या शतकात लिहिलेले ताडपत्रावर लिहिलेले ग्रंथ जपानमध्ये आहेत.
कडितास – कापडावर चिंचोक्याचे पीठ लावुन त्याची शंखाने घोटाई करतात आणि नंतर त्यावर पांढऱ्या रंगाने लिहिले जाते. कर्नाटकात चौदाव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत हे ग्रंथ आढळतात. शृंगेरी मठात अशा हस्तलिखितांचा खूप मोठा संग्रह आहे.सांचीपट – ईशान्य भारतात आगरु वृक्षाची साल भूर्जपत्राप्रमाणे लिहिण्यासाठी उपयोगात आणतात. त्याचा उच्चार हाँसीपट असा होतो.आसाम, त्रिपुरा, मेघालय येथे सतराव्या शतकापासूनचे सांचीपटावरचे ग्रंथ उपलब्ध आहेत.पपायरस –ही एक प्रकारची झाडाची साल असून तिचा उपयोग इजिप्तमध्ये लेखनासाठी केलेला आढळतो.
कागद – कागदाचे हातकागद आणि यांत्रिक कागद असे दोन प्रकार आहेत.हातकागद –वनस्पतीची पाने, कापूस आणि जुना हातकागद, हिरडा, बेहडा हे एका हौदात लगदा होईपर्यंत भिजवून ठेवतात. तो लगदा कुटून एकजीव होईपर्यंत परत भिजवतात नंतर चाळणीच्या सहाय्याने जमिनीला समांतर उचलून सावलीत सुकवतात आणि नंतर शंखाने घोटाई करून लिहिण्यासाठी उपयोगात आणतात. यांत्रिक कागद –वनस्पतीची पाने, फांद्या, खोडाचे लाकूड रासायनिक पाचकांमध्ये भिजवून आवश्यकतेनुसार रंग घालून त्यावर क्लोरीन वायू सोडला जातो आणि यांत्रिकरोलरवर कागद तयार केला जातो.

अलेक्झांडर बरोबर आलेल्या निआर्कसने भारतीय लोक कापूस कुटून कागद तयार करत असल्याचे नमूद केले आहे, त्यावरून भारतीयांना हातकागद बनवण्याची कला आधीपासून अवगत होती, असे काही विद्वान मानतात तर काही विद्वानांच्या मते कागद बनवण्याची सुरवात चीनमध्ये इसवी सन१०५ मध्ये झाली, सातव्या शतकात कागद चीनमधून मध्य आशिया आणि इराणमध्ये पोहचला. दहाव्या शतकानंतर हे तंत्र मध्य आशियाच्या मार्गे युरोप आणि भारतात आले. भारतात साधारणतः बाराव्या शतकानंतर हातकागदावरची हस्तलिखिते सापडतात.एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतात यांत्रिक कागद बनवायला सुरवात झाली, त्यापूर्वीचा कागद हा प्रामुख्याने हातकागदच होता.

संदर्भ : १. जोशी, महादेवशास्त्री, भारतीय संस्कृती कोश, खंड १०, भारतीय कोश मंडळ, पुणे,२००२.                                                                                                   २. बापट, श्रीनंद, जपून ठेवा आपुला ठेवा, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर, पुणे, २००५.

समीक्षक : श्रीनंद बापट