हस्तलिखित संरक्षणशास्त्र : हस्तलिखित ग्रंथ हा सांस्कृतिक ठेवा असल्याने त्यांचे जतन करणे अत्यावश्यक आहे.आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात त्यातील मजकुराच्या इलेक्ट्रॉनिक प्रती करणे सहज शक्य आहे, तरीही परंपरेच्या स्पर्शाची अनुभूती केवळ मूळ ग्रंथापासूनच मिळते म्हणून त्यांचे जतन करणे हा एकमेव पर्याय ठरतो. तसेच तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांप्रमाणे त्या प्रतींचे दरवेळी परिवर्तन करणे फारच खर्चिक आणि अतिश्रमाचे आहे, त्या तुलनेत ग्रंथ आहे तसा सांभाळणे तुलनात्मक दृष्ट्या कमी खर्चिक आणि सोपे आहे.तरीही अति महत्त्वाच्या दुर्मिळ ग्रंथाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती करून ठेवणे हितावह आहे.
हस्तलिखित संरक्षणशास्त्रात हस्तलिखितांना हानी करणारे घटक, त्यापासून संरक्षण करण्याच्या पद्धती, संरक्षणाच्या उपाययोजना, हस्तलिखित ग्रंथनोंदणी, ग्रंथ ठेवण्याची जागा,आपत्ती व्यवस्थापन तंत्र इत्यादीचा समावेश होतो.

हस्तलिखितांना हानी करणारे घटक

वातावरणातील बाह्यघटक, ग्रंथ बनावटीतील अंतर्गत घटक आणि मानवी निष्काळजीपणा यामुळे हस्तलिखितांची हानी होत असते.अ.बाह्य घटक – यात धूळ आणि हवेतील प्रदूषके, प्रकाश, तापमान आणि सापेक्ष आर्द्रता, कीटक, बुरशी यांचा समावेश होतो.बाह्यघटकामुळे झालेले नुकसान भरून काढणे किंवा होणारे नुकसान टाळणे बऱ्याच अंशी शक्य असते.  १. धूळ आणि हवेतील प्रदूषके – उन्हाच्या कवडशात दिसणाऱ्या तरंगत्या कणांना धूळ असे म्हणतात. या धुळीच्या कणात धातूंची संयुगे, काजळी, बाष्प, सेंद्रिय पदार्थ आणि बुरशीचे बीज,तांबे, लोखंड,मँगेनिझ इत्यादी धातूची संयुगे हे घटक असतात.हवेतील प्रदूषकांमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बनडायऑक्साईड, सल्फरडाय ऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड, अमोनिया आणि क्लोरीन हे वायू असतात. याशिवाय अनेक विषारी रसायने हवेतील काजळीत सामावलेली असतात. २. प्रकाश – सूर्य आणि दिवे हे प्रकाशाचे स्रोत आहेत. या प्रकाशात अल्फा, बीटा, गॅमा,इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हॉइलेट हे किरण असतात. लक्स (LUX) या एककात प्रकाश मोजला जातो. ४० लक्सपेक्षा जास्त प्रकाशात ग्रंथ राहु नयेत असा शास्त्राचा दंडक आहे. ३. तापमान–उष्णतेचे माप म्हणजे तापमान. ते तापमापकाच्या सहाय्याने सेंटीग्रेड अथवा फॅरनहाइट या एककात मोजले जाते. २० ते २५ सेल्सिअस इतके तापमान ग्रंथ संरक्षणासाठी आदर्श मानले जाते. यात सावकाश होणारी वाढ अथवा घट फारशी हानिकारक नसते, मात्र अचानकपणेबदल टाळणे आवश्यक आहे. ४. सापेक्ष आर्द्रता –हवेच्या विशिष्ट आकारमानामध्ये विशिष्ट तापमानाला असणारी आर्द्रता आणि तेवढ्याच हवेमध्ये त्याच तापमानाला राहु शकणारी अधिकतम आर्द्रता म्हणजेच त्या तापमानाला तेवढी हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणारी आर्द्रता यांची तुलना म्हणजे सापेक्ष आर्द्रता. हस्तलिखितांकरिता हवेतील सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण ४० ते ४५% असणे आदर्श असते.
५. कीटक – कीटकांना रहाण्यासाठी आणि आपले अन्न मिळवण्यासाठी उबदार जागेची गरज असते. कीटकांच्या अळ्या हस्तलिखितांची पाने, पुठ्ठे इत्यादींपासून अन्न मिळवतात, उबदार जागेची त्यांची गरजही येथे पूर्ण होते, परंतु त्यांचे पोषण म्हणजे ग्रंथाची हानी. यांत कसर, वाळवी, भुंगेरे, झुरळे आणि इतर काही लाकूड पोखरणारे, कागद खाणारे किडे यांचा समावेश असतो.६.बुरशी–अंधाऱ्या कुबट हवेत बुरशीची वाढ होते. हवेतील आर्द्रता ही बुरशीची वाढ करण्यास कारणीभूत ठरते.

बाह्य घटकांचे ग्रंथांवर होणारे परिणाम

१. हवेतील आर्द्रतेशी सल्फर-डाय-ऑक्साईडचा संपर्क होऊन सल्फ्युरिक आम्ल तयार होते. या आम्लाशी धुळीतील लोखंड तांबे इत्यादी धातूंचा संयोग होऊन गंजासारखा थर तयार होतो.कागदाचा सल्फ्युरिक आम्लाशी संपर्क आल्याने कागदाचे रासायनिक विघटन होते. धुळीतल्या धातुंशी हायड्रोजन सल्फाइडचा संयोग होऊन क्षार तयार होतात आणि कागदातल्या सेल्युलोजचे रासायनिक विघटन होते.अमोनिया वायू आर्द्रता शोषून घेतो आणि ती साठवून ठेवतो. या वायूचे त्या ठिकाणच्या हवेतील प्रमाण अधिक असल्यास त्या ठिकाणच्या आर्द्रतेचे प्रमाण वाढते आणि त्याबरोबर हवेची रासायनिक क्रियाशीलताही वाढते.हवेतील काजळी ही आम्लशोषक असते. ती विशेषतः सल्फ्युरिक आम्ल शोषून स्वतः मध्ये साठवते.प्रकाशातील अल्फा, बीटा, गॅमा, इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हॉइलेट या किरणांमुळे शाई आणि रंग फिकट होतात.इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हॉइलेट किरण उष्ण असतात. त्यांच्या संपर्कामुळे हस्तलिखिते कोरडी होऊन त्यातील सेल्युलोजच्या साखळ्या खंडित होतात. परिणामी ती वाकडी होतात, फाटतात अथवा विरतात.अधिक प्रकाशात उष्णतेमुळे अनेक रासायनिक क्रियांची साखळी सुरु होते अथवा तिला बळ मिळते.वाढणाऱ्या तापमानाबरोबर हस्तलिखिते, हवा, फर्निचर इत्यादी घटक सुक्ष्म प्रमाणात प्रसारण पावतात तर घटणाऱ्या तापमानाबरोबर त्यांचे आकुंचन होते.अधिक तपमानामध्ये हस्तलिखितातील आर्द्रता कमी होऊन ती ठिसूळ बनतात. तापमान कमी असतांना आर्द्रता कमी असली तरी परिणाम घडू शकतो.तापमान वाढले की रासायनिक प्रक्रियांना उर्जा मिळून त्यांचा वेग वाढतो.२.उबदार वातावरणात कीटक आणि बुरशी यांची वाढ जलद गतीने होते. कसर हा चंदेरी रंगाचा कीटक कागदाचे वरचे पापुद्रे खातो त्यामुळे कागदावरील मजकूर निघून जातो.वाळवी हे पांढऱ्या रंगाचे कीटक मातीचे बोगदे बांधून त्यातून प्रवास करतात. यांना मोकळी हवा, सूर्यप्रकाश यांचे वावडे असते. हे कीटक हस्तलिखितांची पाने, लाकूड इत्यादी खातात. भुंगेरे अनेक प्रकारचे असतात. कागद गुळगुळीत करण्यासाठी वापरली जाणारी द्रव्ये ते खातात.हस्तलिखितांना बांधलेल्या कापडाची खळ, पुस्तकाच्या बांधणीत वापरला गेलेला डिंक अथवा सरस हे पदार्थ झुरळे खातात. पुस्तकाची बांधणी फाडतात.बुरशीमुळे कागदावर डाग पडतात, तसेच ती कागदातील आर्द्रता शोषून घेते.

ब.अंतर्गत घटक – यात आम्लीय रंग आणि शाई, बनावटीतील त्रुटी यांचा समावेश होतो. अंतर्गत घटकामुळे झालेले नुकसान भरून काढणे किंवा होणारे नुकसान टाळणे बऱ्याच अंशी अशक्य असते.१. रंग–आम्लीय रंग आणि बाह्य घटक यांची रासायनिक प्रकिया होऊन ग्रंथाचे नुकसान होते. शाई – लोखंडाचा क्षार असलेल्या शाईमुळे कागद अक्षरावर फाटतो. पाण्याचा अंश असलेल्या शाईने लिहिलेला ग्रंथ पाण्याच्या संपर्कात आल्यावर त्यावरचीशाई पसरते, आणि मजकूर कळत नाही. काही शाई कालांतराने पूसट होतात. कागद बनवण्याच्या प्रक्रियेत तो पांढरा स्वच्छ दिसावा यासाठी त्यावर क्लोरीन वायू सोडला जातो. त्या क्लोरीनचा वातावरणातील घटकांशी संपर्क आल्यावर रासायनिक प्रक्रिया सुरु होते आणि कागदाचे नुकसान होते.२.मानवी निष्काळजीपणा –ग्रंथ हाताळणे, एकाठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाणे, ठेवणे या मानवी क्रियांमध्ये अव्यवस्थितपणा असल्यास नुकसान होते.हल्ली कागदाचे रक्षण म्हणजे प्लॅस्टिक लॅमिनेशन करणे अशी एक पद्धत रूढ झाली आहे, ते कधीही करु नये. कारण कागद आणि प्लॅस्टिक यांचे गुणधर्म भिन्न आहेत. कागद हा नैसर्गिक घटकांपासून बनवलेला असतो तर प्लॅस्टिक हे कृत्रिम घटकांपासून बनवलेले असते. त्यांच्या मजबुतीतही फरक असतो. वातावरणातील बाह्यघटकांचा प्लॅस्टिकवर परिणाम होतो आणि हस्तलिखिताचे नुकसान होते.

हस्तलिखित संरक्षणाच्या पद्धती

हस्तलिखितांचे संरक्षण आणि जतनाच्या दोन पद्धती आहेत. प्रतिबंधात्मक जतन (Preventive conservation), आणि उपचारात्मक जतन (Curative conservation). १. प्रतिबंधात्मक जतन  – हस्तलिखित खराब होऊ नये यासाठी जी काळजी घेतली जाते त्याला प्रतिबंधात्मक सरंक्षण असे म्हणतात.हस्तलिखितांना हानी करणाऱ्या बाह्यघटकांपासून संरक्षण यात अपेक्षित असते. प्रत्यक्ष ग्रंथांवर कोणतीही प्रक्रिया न करता वातावरणातील ज्या घटकांनी हस्तलिखितांना हानी होते त्यांचा प्रतिबंध यापद्धतीत केला जातो.हा प्रतिबंध पारंपरिक किंवा आधुनिक अशा दोन्ही पद्धतीने केला जातो. हे उपाय योजण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता नाही, परंतु ही नियमित करण्याची प्रक्रिया आहे. २. उपचारात्मक जतन  – अंतर्गत अथवा बाह्य घटकांमुळे खराब झालेले हस्तलिखित नीट करणे याला उपचारात्मक संरक्षण म्हणतात.यात खराब झालेल्या हस्तलिखितांचे परीक्षण करून त्याच्या हानीची कारणे तपासली जातात आणि नंतर त्यावर प्रत्यक्ष रासायनिक प्रक्रिया केली जाते. ते करण्यासाठी तज्ज्ञांची आणि प्रयोगशाळेची आवश्यकता असते. वेळोवेळी प्रतिबंधात्मक जतन करावेच लागते.

हस्तलिखित संरक्षणाच्या उपाययोजना

आधुनिक आणि पारंपारिक अशा दोन्ही पद्धतीने हस्तलिखितांचे जतन केले जाते.१. धुळीपासून आणि हवेतील प्रदूषकापासून संरक्षण – हस्तलिखितसंग्रह धुळीपासून मुक्त असलेल्या जागी ठेवणे, इमारतीच्या सभोवती आवश्यक तिथे फरशी घालणे, संग्रह असलेल्या खोलीची दारे आणि खिडक्या विनाकारण उघड्या न ठेवणे, दारात काथ्याची पायपुसणी घालणे, खिडक्यांसमोर काही अंतरावर पसरट पानांची झाडे लावणे, हस्तलिखित शक्य तितक्या बंदिस्त स्थितीत ठेवणे, खोली आणि कपाटे वेळोवेळी स्वच्छ करणे, अभ्यासक,कर्मचारी, पाहुणे यांना पादत्राणे घालून हस्तलिखितांच्या खोलीत येण्यास प्रतिबंध करणे.
२. प्रकाशापासून संरक्षण – ग्रंथसंग्रह ठेवलेल्या जागी अतिरिक्त प्रकाश रोखण्यासाठी प्रशासकीय कामाची जागा आणि वाचनकक्ष हे एकमेकांपासून वेगवेगळे असावेत. दारे खिडक्यांना पडदे लावून अतिरिक्त प्रकाश रोखावा. कपाटात आणि शोकेसमध्ये दिवे लावू नयेत. इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हॉइलेट किरण शोषणारे फिल्टर्स लावावे. आवश्यक असेल तेव्हाच दिवे लावावेत. शोकेसवर कापड अंथरून ठेवावे.
३. तापमानापासून संरक्षण – तापमान नियंत्रित करण्यासाठी पंखे, कुलर इत्यादी उपकरणांचा योग्य उपयोग करावा. ग्रंथ शक्यतो लाकडी कपाटात ठेवावेत, ते शक्य नसल्यास स्टीलच्या कपाटात आतून जाड हातकागद लावून त्यात ग्रंथ ठेवावे.
४. सापेक्ष आर्द्रतेपासून संरक्षण – सिलिका जेलचे खडे कागदात बांधून कपाटात ठेवावेत, त्याने आर्द्रता शोषली जाते.
५. कीटक, बुरशी यापासून संरक्षण– ग्रंथसंग्रहाच्या ठिकाणी अन्नपदार्थांचे सेवन केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. वेळोवेळी स्वच्छता करावी. कपाटात कीटकरोधक द्रव्ये ग्रंथांना स्पर्श होणार नाही अशा ठिकाणी ठेवावीत. बुरशीच्या नाशासाठी थायमॉलचा वापर करावा.
६. ग्रंथ पूजनाची परंपरा –भारतात गुढीपाडवा आणि दसरा या दोन सणांना ग्रंथपूजनाची परंपरा आहे. शिशिरऋतू संपून वसंत लागतांना गुढीपाडवा येतो आणि वर्षा ऋतू संपून शरद सुरु होतांना दसरा येतो. सहा सहा महिन्याच्या अंतराने येणाऱ्या या दिवशी ग्रंथ स्वच्छ करून कोवळे ऊन दाखवणे, नवीन कापड लावणे हे कर्म ग्रंथ संरक्षणासाठीच असावे. प्रत्यक्ष ग्रंथाना हळदी-कुंकू,फुल वाहिणे हे यात अपेक्षित नाही,ते कर्म ग्रंथाच्या आरशातील प्रतिबिंबावर करण्यास स्मृती ग्रंथांत सांगितले आहे.

हस्तलिखित ठेवण्याची जागा

जुन्या वाड्यात एखाद्या मोठ्या खोलीच्या आत ऊन, वारा, धूळ यापासून मुक्तछोटी अंधारी खोली असते. भिंतीत दोन खुंट्याच्या आधारे असलेल्या फळीवर ग्रंथांचे गठ्ठे भिंतीला स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने ठेवले जातात.सागवानी अथवा शिसम लाकडाची कपाटे हस्तलिखितांच्या साठवणुकीसाठी वापरतात. आधुनिक बनावटीच्या प्लायवूडची कपाटे टाळतात.आता स्टीलच्या कपाटात आत सगळ्या बाजूने जाड हातकागदाचा थर देऊन त्याच्या आत हस्तलिखित ग्रंथ ठेवले जातात. त्या कपाटांचा भिंतीला स्पर्श होणार नाही अशी रचना केली जाते.पारंपारिक पद्धतीत अनेक हस्तलिखिते कापडात बांधून ते गठ्ठे एकावर एक असे रचून ठेवले जातात तर आधुनिक पद्धतीत प्रत्येक ग्रंथाला स्वतंत्र,त्या-त्या मापात रसायन विरहीत पुठ्ठ्याचा आधार देऊन पुस्तकाप्रमाणे उभी मांडणी केली जाते.ग्रंथाचे आवरण मिठाच्या गरम पाण्याने दोनदा तीनदा धुवून, खळ काढलेल्या सुती कापडाचे असते. पारंपारिक पद्धतीत कापड सर्व बाजूने गुंडाळले जाते तर आधुनिक पद्धतीत त्याच्या दोन बाजु मोकळ्या सोडल्या जातात.कपाटात कीटक प्रतिबंधकद्रव्ये ग्रंथाला स्पर्श न होता ठेवतात, आणि त्या द्रव्याची उपयुक्तता कमी झाल्यावर बदलतात.वेखंड पावडर, काळेमिरे, लवंग, कडूलिंबाची पाने, सापाची कात, मोरपीसही काही पारंपारिक कीटक प्रतिबंधकद्रव्ये आहेत. सापाची कात आणि मोरपीसयांची उपयुक्तता अजून वैद्यानिक दृष्ट्या सिद्ध झालेली नाही, परंतु अनेक संग्रहात ते परंपरेने ठेवलेले आढळते.आधुनिक कीटक प्रतिबंधक द्रव्यात सध्या ओडोनीलच्या वड्या आणि डांबराच्या गोळ्या वापरतात.

संदर्भ : १.Bobade, Bhujang, Manuscriptology From Indian Sources, Pacific Publication,Delhi,2012.  २.Gupta,K.K.(Edi.), Rare Support Materials for Manuscripts and their Conservation, National Mission For Manuscripts & IGNCA, New Delhi,2010  ३.बापट, श्रीनंद, जपून ठेवा आपुला ठेवा, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे, २००५.

 

 

समीक्षक : श्रीनंद बापट