विश्वगुणादर्शचम्पू : वेंकटाध्वरी यांनी लिहिलेली विश्वगुणादर्शचम्पू चम्पूवर्गातील एक संस्कृत कलाकृती.भौगोलिकदृष्टया हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. चम्पूरचनांप्रमाणेच याही रचनेत गद्य व पद्याचे मिश्रण दिसते. वेंकटाध्वरी हा आत्रेय गोत्राचा सर्वशास्त्रपारंगत विद्वान असून कांचीचा रहिवासी होता. याच्या पित्याचे नाव रघुनाथ तर आईचे नाव सीताम्बा. याचा काळ सतरावे शतक असे मानण्यात येतो. हा अप्पय्य दीक्षितांचा समकालीन होता.या ग्रंथात अनेक प्रकारची वर्णने येतात.
काश्मीर, चोल, पम्पासर, कुंतल, महाराष्ट्र, वाराणसी ही ठिकाणे; कैलास, वेंकटगिरी, सह्याद्री ही पर्वतराजी, कावेरी, कृष्णा, गंगा, गोदावरी, सरस्वती, तुंगा, सिंधू, यमुना या नद्या; शंकर, यम, कुबेर, विष्णू, लक्ष्मी, सूर्य या देवता; एकाम्रेश्वर, कामाक्षी, श्रीनिवास अशा तीर्थस्थानीय देवता; पाणिनी, पतंजली, कुंभकर्ण, जैमिनी, प्रल्हाद, अप्पय्य दीक्षित, श्रीहर्ष, कालिदास, जटायु, रामानुजाचार्य इ. व्यक्ती, अशा अनेक विषयांवर चर्चा दिसून येते.यापैकी काही वर्णने अत्यंत वाचनीय आहेत.
या ग्रंथाचे स्वरूप संवादात्मक आहे. विश्वावसु आणि कृशानु या दोन गंधर्वांच्या संवादातून हा ग्रंथ साकारलेला आहे. हे दोन गंधर्व आकाशमार्गाने विश्वपरिक्रमेसाठी निघतात. आकाशातून दिसणाऱ्या भारत देशाबद्दल यांच्यात चर्चा घडते. देशाचा भूभाग, जनपदे, नद्या, जनता, आचरण इ. विषयांवर यांच्यात होणारी चर्चा यात आली आहे. परंतु विश्वावसु आणि कृशानु यांच्यात अंतर दिसते आणि ते म्हणजे विश्वावसु हा असूयाहीन व गुणग्राही असतो आणि कृशानु हा अत्यंत छिद्रान्वेषी व दोषग्राही वृत्तीचा असतो. यामुळे विश्वावसु हा प्रत्येक गोष्टीचे कौतुक करतो तर कृशानु प्रत्येक गोष्टीतील दोष काढत असतो.दोष काढत असल्याने तो ईश्वराच्या संतापास कारणीभूत ठरतो आणि स्वतःची दृष्टी यामुळे गमावतो. पण नंतर तो श्रीनिवाससहस्रम् आणि लक्ष्मीसहस्रम् अशे दोन स्तोत्रे रचून क्षमायाचना करतो आणि स्वतःची दृष्टी पुनः मिळवतो असा कथाभाग यामध्ये आला आहे.एकाच वर्णनाच्या दोन बाजू या दोन वृत्तींच्या व्यक्तींमुळे मांडण्याची संधी लेखकाला मिळाली आहे.
सामान्यतः चम्पू रचनेसाठी रामायण,महाभारतासारखे प्रसिद्ध विषय निवडले जातात; मात्र विश्वगुणादर्शचम्पूची कथा काल्पनिक आहे. प्रत्येक वस्तूची सर्व बाजूने चिकित्सा करण्याची वेंकटाध्वरीची प्रतिभा असामान्य आहे.ग्रंथाची भाषा अत्यंत विदग्ध आहे. समासप्रचुर शब्दप्रयोग, अनुप्रासाची पखरण आणि शब्दांची सुयोग्य योजना यावरून लेखकाची भाषेवरील पकड दिसून येते. त्याचे उदाहरण म्हणून विश्वावसुच्या मुखातील हा श्लोक पहावा –
कोलं भुवि कोऽलं जगदालम्बमवैतुं
स्वामी शुभकामी किल भूमीमसुरार्ताम् |
वाराशिगम्भीराम्भसि काराभवनेऽभि-
ग्रस्तामिव मुस्तामिव यस्तामुदहार्षीत् || (श्लोक ३८७)
(अर्थ- या विश्वात जगाचे आश्रयस्थान असणाऱ्या वराह भगवानांना जाणून घेण्यास कोण बरे समर्थ आहे? कल्याणकांक्षी विश्वपालक अशा या वराहस्वामींनी, असुरांनी पीडित, समुद्राच्या गंभीर जलरूपी कारागारात बद्ध अशा पृथ्वीला, गवताप्रमाणे वर खेचून आणले).
पुढील काळात या चम्पूग्रंथावर कुरवी राम (इसवी सनाचे १९वे शतक) याने टीका लिहिली. विश्वगुणादर्शचम्पूची शैली स्वीकारून अन्नयार्य याने तत्त्वगुणादर्श या ग्रंथाची रचना केली. यात जय आणि विजय यांच्यातील संवादातून शैव आणि वैष्णव संप्रदायांच्या घटकांवर चर्चां घडविली आहे.
संदर्भ : १. गोखले मंजूषा, माहुलीकर गौरी, वैद्य उमा, अभिजात संस्कृत साहित्याचा इतिहास, मुंबई, २००४. २. शास्त्री सुरेंद्रनाथ, विश्वगुणादर्शचम्पू, वाराणसी, २०११.
समीक्षक : सुनीला गोंधळेकर