मधुराविजयम् : दक्षिण भारतातील विजयनगर घराण्याच्या ऐतिहासिक महाकाव्यांमधील एक महत्त्वाचे संस्कृत काव्य.गंगादेवी (गंगाम्बिका) या स्त्री कवयित्रीने हे काव्य रचले आहे.मधुरेवर अर्थात मदुरा नगरीवर आपल्या पराक्रमी नवऱ्याने मिळवलेल्या विजयाची कथा तिने मधुराविजयम् या आपल्या काव्यात अतिशय रमणीय पद्धतीने रंगवली आहे.ती वीर कंपराय या राजाची राणी आहे.
गंगादेवी ही आंध्रप्रदेशातील उरुगल या प्रांताजवळची राजकन्या होती. तिचा कालखंड १३४३ ते १३७९ हा आहे. विजयनगरचा राजा वीर कंपराय याच्याशी १३४०च्या आसपास तिचा विवाह झाला. सौगंधहरणम् या काव्याचे रचयिता विश्वनाथ हे तिचे गुरू. प्रतापरुद्र देव यांच्या दरबारात कवी असणाऱ्या आपल्या गुरूंकडे तिने सर्व शास्त्र आणि कलांचा अभ्यास केला. वेद, पुराण, तत्त्वज्ञान, कामन्दकीय राजनिती, अश्वारोहण, अश्वचिकित्सा, संगीत, वराह संहिता, युद्धशास्त्र अशा तिच्या विविधांगी अभ्यासाचे प्रतिबिंब तिच्या काव्यात पडले आहे. आधीच्या महाकाव्यांचा तिने उत्तम अभ्यास केलेला आहे. अनेक मान्यवर कवींच्या रचना आणि त्यांची वैशिष्टये तिने आपल्या काव्यात सुरूवातीलाच गुफंली आहेत. त्यात तेलगू कवी तिक्कण्णा यांचा तिने विशेष उल्लेख केला आहे. मधुरा अर्थात मदुरा या राज्याच्या विजयाचे चित्रण करणारे मधुराविजयम् हे वीररसपूर्ण काव्य आहे. महाकाव्याला साजेसा शृंगार, करुण, बीभत्स अशा नवरसांचा परिपोष, उत्तम निसर्गचित्रण, राजवर्णने, पुरांची वर्णने याने हे काव्य परिपूर्ण झाले आहे.कवयित्रीने बुक्कराजाचे चित्रण दशरथाप्रमाणे केले आहे. रामाने रावणाचा वध केला तसाच राजा वीर कंपराय याने मुस्लिम राज्यकर्त्यांचा वध केला, याप्रमाणे चित्रण करत रामायण काव्याशी नाते सांधले आहे.
यातील काव्यगुणांच्या बरोबरीने ऐतिहासिक चित्रणही महत्त्वाचे आहे.दक्षिण भारतातील विजयनगर साम्राज्याची स्थापना तुघलक शासना विरुद्ध विद्रोह करत हरिहर प्रथम आणि भाऊ बुक्काराय प्रथम यांनी इ.स.१३३६ मध्ये केली. बहमनी साम्राज्याच्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी सतत या भूभागावर स्वारी करून तो ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. दक्षिण भारतातील विजयनगरचे साम्राज्य उभे करणाऱ्या बुक्काराय या राजापासून ते वीर कंपरायाच्या विजयापर्यंतचा इतिहास या काव्यात आला आहे.कंपराय हा त्यांचा ज्येष्ठ युवराज. सुरवातीचा काही काळ त्याने कांचीपुरम् येथे राज्य केल्याचा उल्लेख काव्यात आला आहे. कंपरायाने मुस्लिम राज्यकर्त्यांचा मांडलिक असलेल्या चंपराय यावर स्वारी केली. कंपरायाने चंपरायाचा वध केल्याचे वर्णन काव्यात आले आहे; मात्र इतिहासकारांच्या मते कंपरायाने वध केलेला नाही.कंपरायाने मुस्लिम राजांचा अनेकवेळा पराभव केल्याचे उल्लेख काव्यात आले आहेत. त्याने पांडय, चोल आणि केरळचे राजे यांच्यावर विजय मिळवला. इतर ऐतिहासिक काव्यात सहसा न आढळणारे युद्धातील अश्व आणि अस्त्रांचे उत्तम वर्णन कवयित्रीने केले आहे. तसेच मुस्लिम राजांच्या कपडयांचे, दागिन्यांचे स्वाभाविक वर्णन कवयित्रीने केल्यामुळे मुस्लिम राज्यकर्त्यांच्या राहणीमानाचा अंदाज करायला मदत होते.
१४ व्या शतकात दक्षिण भारतावर मुस्लिम राज्यकर्ते मोठया प्रमाणावर आक्रमण आणि अत्याचार करत होते. सर्व प्रजा त्रस्त आणि घाबरलेली होती. त्याचे वर्णन कवयित्रीने आठव्या सर्गात केले आहे.प्रजेचे रक्षण करत विजयानगरचा राजा वीर कंपराय याने हे आक्रमण परतून लावले आणि विजय प्राप्त केला. तोच या महाकाव्याचा नायक आहे.त्याचे वडिल बुक्काराय यांच्या काळापासून काव्याचे कथानक चालू होते. त्यांच्या घराण्यातील बहुपत्नीत्वाची आणि प्रथम पत्नीच्या मुलाला राजपद देण्याची प्रथा यात सांगितली आहे. बुक्काराय यांनी कंपराय याला राजनिती शिकवली. युवराज असतानाही कंपराय याने अनेक स्वाऱ्या जिंकल्याचा उल्लेख या काव्यात आला आहे. कवयित्रीने कंपराय यालाच हरिहर असे म्हटले जात असल्याचे काव्यात सूचविले आहे. बुक्काराय यांच्यानंतर कंपराय म्हणजेच हरिहर द्वितीय याने राज्याचा भार सांभाळला. गंगादेवी यांनी या काव्यात कंपराय यांचे सुंदर चित्रण केले आहे. त्यानुसार त्यांना संगीत आणि काव्यात उत्तम गती होती. त्यांच्या वर्तणुकीमुळे सर्व प्रजेचे ते लाडके होते आणि एखाद्या कल्पतरूप्रमाणे ते इच्छा पूर्ण करत असत. इतिहासकारांनी हरिहर द्वितीय यांच्या विषयी जी माहिती मान्य केली आहे त्याच्याशी या काव्यातील माहिती पुष्कळ मिळतीजुळती आहे.
त्रिवेंद्रम येथे वैयक्तिक संग्रहातून मिळालेले आणि मद्रास येथील शासकीय हस्तलिखित ग्रंथालयात मिळालेले अशी या काव्याची हस्तलिखिते उपलब्ध आहेत. मात्र ती अपूर्ण आणि दोषपूर्ण आहेत. केवळ पहिले आठ सर्ग आणि नवव्या सर्गातील काही भाग उपलब्ध आहे. वैयक्तिक संग्रहातील हस्तलिखित भूर्जपत्रावर लिहिलेले आहे तर शासकीय ग्रंथालयातील हस्तलिखित देवनागरी लिपीत असून ते कागदावर लिहिलेले आहे. पोतुकुच्चि सुब्रह्मण्यशास्त्री यांनी त्यावर भावप्रकाशिका ही टीका लिहिली आहे. एका स्त्री कवयित्रीचे काव्य आणि ते देखिल ऐतिहासिक या दृष्टिनेही हे काव्य महत्वाचे ठरते.
संदर्भ : सुब्रह्मण्यशास्त्री, पोतुकुच्चि, मधुराविजयम्, तेनाली, आंध्रप्रदेश,१९६९.
समीक्षण : नीलिमा पटवर्धन