केळकर,अशोक रामचंद्र  : (२२ एप्रिल १९२९ – २० सप्टेंबर २०१४). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक. भाषाविज्ञानाबरोबरच आस्वाद, समीक्षा आणि मीमांसा या तिन्ही दृष्टीने साहित्याचा सखोल विचार त्यांनी त्यांच्या लेखन – संशोधनातून केला आहे.जन्म पुणे येथे. शिक्षणही पुण्यातच. इंग्रजी भाषा व वाङ्मय हा मुख्य विषय आणि फ्रेंच हा उपविषय घेऊन पुणे विद्यापीठातून एम्. ए. भाषाविज्ञानाच्या अभ्यासासाठी रॉकफेलर प्रतिष्ठानची अभ्यासवृत्ती मिळवून अमेरिकेत कॉर्नेल विद्यापीठात त्यांनी संशोधन केले आहे. १९५८ मध्ये याच विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी प्राप्त. याच कालावधीत त्यांना काळात लिली प्रतिष्ठानतर्फे तौलनिक साहित्य व समीक्षा यासाठी अभ्यासवृत्ती मिळाली.भारतात परत आल्यानंतर आग्रा येथील के. एम्. इन्स्टिट्यूट ऑफ हिंदी स्टडीज अँड लिंग्विस्टिक्स या संस्थेत ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून ४ वर्षे कार्यरत होते. त्यानंतर पुण्यात डेक्कन महाविद्यालयात प्रारंभी प्रपाठक व नंतर प्रोफेसर म्हणून त्यांनी अध्यापन केले. तेथील भाषाविज्ञानाच्या प्रगत अध्ययन केंद्राचे ७ वर्षे संचालक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. तेथूनच १९८९ मध्ये ते निवृत्त झाले. त्यांनी हिंदी, इंग्रजी व मराठी अशा तिन्ही भाषांमध्ये विपुल लेखन केले.

 

‘मराठी व्याकरणाची नवी दिशा’ हा त्यांचा मराठीतील पहिला लेख सत्यकथा मासिकात छापून आला (१९६५). मराठी भाषेत त्यांची पुढील पुस्तके प्रसिद्ध आहेत: मराठी भाषेचा आर्थिक संसार (१९७८), प्राचीन भारतीय साहित्य मीमांसा (१९७९),भेदविलोपन: एक आकलन (१९९५), वैखरी : भाषा आणि भाषाव्यवहार (१९९६) आणि रुजुवात. त्यांचा पीएच्.डी. साठी लिहिलेला मराठी भाषेसंबंधीचा ‘लँग्वेज इन सिमॅओटिक पर्स्पेक्टिव्ह: द आर्किटेक्चर ऑफ अ मराठी सेन्टेन्स’ हा प्रबंध इंग्रजीत प्रकाशित झाला आहे. त्यांच्या प्राचीन भारतीय साहित्य मीमांसा या ग्रंथाचे हिंदी व गुजराती अनुवादही प्रकाशित झाले आहेत. स्टडीज इन हिंदी-उर्दू: इंट्रोडक्शन अँड वर्ड फोनोलॉजी (१९६८) हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे तसेच त्यांच्या हिंदीत लिहिलेल्या लेखांचा संग्रह त्रिवेणी: भाषा-साहित्य-संस्कृती (२००४) या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरील भाषाविषयक अनेक चर्चासत्रे, परिषदा यांत शोधनिबंधांचे वाचन तसेच त्यासाठीच्या समित्यांवर राहून मार्गदर्शन केले आहे. म्हैसूरच्या भारतीय भाषा संस्थान या संस्थेने त्यांचे सर्व लेखन इ-बुकच्या स्वरुपात प्रकाशित केले आहे. भारतीय भाषा संस्थान ही संस्था आणि महाराष्ट्रातील राज्य मराठी विकास संस्था यांच्या रूपरेखाही केळकरांनीच तयार केल्या होत्या. भाषा आणि जीवन  या मराठीत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार मिळालेल्या त्रेमासिकाचेही स्वरूप व धोरणे त्यांच्याच मार्गदर्शनातून आकाराला आलेली आहेत.त्यांनी या मासिकाचे संपादनही केले आहे.

त्यांच्या भाषाविज्ञान व साहित्य अनुवाद, कलासमीक्षा, तत्त्वज्ञान अशा क्षेत्रांमधील मौलिक कामगिरीबद्दल भारत सरकारने २००२ मध्ये पद्मश्री हा किताब बहाल करून त्यांचा गौरव केला. त्यांच्या रुजुवात या ग्रंथालाही २०१० या वर्षीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.

Keywords: #Ashok Kelkar, #Indian Linguist, #Bhasha Ani Jeevan, #Deccan College.