भाष्य : स्वाभाविकपणे एखाद्या विषयाचे विवरणपूर्वक वर्णन करणे, अर्थ विस्ताराने सांगणे म्हणजे भाष्य होय.संस्कृत भाषेमध्ये प्राचीन काळापासून बरेच शास्त्रीय ग्रंथ लिहिले गेले.निरनिराळ्या शास्त्रांमधील हे ग्रंथ सूत्ररूपात म्हणजेच संक्षिप्त, सारगर्भ वाक्यांच्या रूपात होते. त्या संक्षिप्तस्वरूपातील शास्त्रीय तत्त्वाला स्पष्ट करण्यासाठी भाष्य या ग्रंथप्रकाराची निर्मिती झाली. सूत्रांमध्ये संकुचित स्वरुपात सांगितलेला अर्थ सुबोध पद्धतीने स्पष्ट करणे हे भाष्यग्रंथांचे मुख्य काम असते. भाष्य शब्दाच्या व्याख्या – १) “भाष्यते विवृत्तया वर्ण्यतेइति” म्हणजे, एखाद्या विषयाचे विवरणपूर्वक वर्णन करणे म्हणजे भाष्य होय (शब्दकल्पद्रुम ). २) “सूत्रोक्तार्थप्रपञ्चकंभाष्यम्” म्हणजे, सूत्रात सांगितलेला अर्थ विस्ताराने सांगणे म्हणजे भाष्य होय (हेमंचंद्र).३) सूत्रार्थो वर्ण्यते यत्र पदै: सूत्रानुकारिभि: |स्वपदानि च वर्ण्यन्ते भाष्यंभाष्यविदोविदु: || सूत्रातील शब्दासारख्याच शब्दांनी ज्या ठिकाणी सूत्राचा अर्थ दाखवला जातो आणि स्पष्टीकरणार्थ उच्चारलेल्या शब्दांचाही अर्थ सांगितला जातो, त्याला भाष्य म्हणतात (पराशरपुराण ).

भाष्यग्रंथांमध्ये सूत्रातील संदिग्धपणा, अस्पष्टपणा व दुर्बोधपणा जाऊन तिथल्या प्रतिपाद्य विषयाचे सुगमरीत्या स्पष्टीकरण केलेले असते. ग्रंथगत विषय, संशय, पूर्वपक्ष, उत्तरपक्ष व सिद्धांत अशा पाच प्रकारांनी भाष्याची मांडणी करायची असते. संस्कृतभाषेतील व्याकरणाच्या परंपरेत भाष्य या शब्दाने महाभाष्य  या पतंजलीमुनिकृत ग्रंथाचा उल्लेख केला जातो. इस.पू. सहाव्या शतकात पाणिनीने रचलेल्या अष्टाध्यायी  या सूत्ररूप ग्रंथावर इस.पू. पहिल्या शतकात पतंजली मुनींनी विवरणात्मक असा प्रश्नोत्तर स्वरूपातील विस्तृत ग्रंथ लिहिला. व्याकरणपरंपरेतील या भाष्यग्रंथाचे वैशिष्ट्य असे की, यामध्ये रोजच्या व्यवहारातील उदाहरणे घेऊन विषय अगदी सोपेपणाने पुढे नेला आहे. यामध्ये सूत्राला धरून भाष्य केले आहे. तरीही स्वतःचे विवरण व उदाहरणे जागोजागी देऊन, व्याकरणासारखा विषय अत्यंत मनोरंजकपणे मांडला आहे.

व्याकरणाखेरीज इतरही शास्त्रांमध्ये सूत्रग्रंथावर भाष्यग्रंथांची निर्मिती झाली. महत्त्वाचे मूळ ग्रंथ व भाष्यग्रंथ पुढीलप्रमाणे-

          मूळ ग्रंथ            भाष्य
निघण्टु निरुक्त ( यास्क )
अष्टाध्यायी महाभाष्य (पतञ्जली)
जैमिनीयसूत्रे शाबरभाष्य
गौतमसूत्रे वात्स्यायनभाष्य
साङ्ख्यकारिका गौडपादभाष्य
न्यायसूत्रे पक्षिस्वामींचे न्यायभाष्य
वैशेषिकसूत्रे प्रशस्तपादभाष्य

सूत्रग्रंथांच्या सर्वांगीण ज्ञानासाठी त्यावरील भाष्यग्रंथ हे प्रकाशक समजले जातात व म्हणूनच परंपरेमध्ये भाष्यग्रंथांचे महत्व अजूनही अबाधितपणे टिकून आहे. भाष्यग्रंथांचे स्वरूप आणि टीकाग्रंथांचे स्वरूप बरेचसे सारखे असते. तरीही भाष्यग्रंथांच्या प्राचीनत्वामुळे त्यांना परंपरेने एक पावित्र्य मिळाले आहे. तसेच प्राचीन भाष्यग्रंथच इतके विस्तृत व विवरणात्मक झाले की तेच आकारग्रंथ म्हणून मान्यता पावले आणि त्या भाषाग्रंथावरही आधारित अनेक टीकाग्रंथ पुढील काळात निर्माण झाले.

संदर्भग्रंथ : १.अभ्यंकर, का. वा. श्रीमद्भगवत्पतञ्जलिकृत व्याकरणमहाभाष्य (मराठी अनुवादासह, प्रस्तावना खंड, भाग ७),संस्कृत विद्या परिसंस्थान, पुणे, २००६. २.जोशी, पं. महादेवशास्त्री, तर्कतीर्थ होडारकर, सौ पद्मजा (संपा.), भारतीय संस्कृतीकोश (खंड सहावा), भारतीय संस्कृतीकोश मंडळ, पुणे, १९६८.