कारले : (हिं.कारेला; गु.कारेलो; क.हागलकाई; सं.कंदुरा, करवल्ली, सुषवी; इं.कॅरिलाफ्रुट, बिटर गोर्ड; लॅ. मॉमोर्डिका चॅरॅंशिया, कुल-कुकर्बिटेसी). या वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) वेलीची बरीच लागवड भारत, मलाया, चीन, श्रीलंका, आफ्रिकेतील उष्ण प्रदेश, इ. प्रदेशांत सर्वत्र करतात. ही कडवंचीच्या वंशातील आणि कुकर्बिटेसी कुलातील असल्याने अनेक शारीरिक लक्षणे त्यात वर्णिल्याप्रमाणे आहेत. सर्व भाग कमीअधिक केसाळ; साध्या प्रतानांनी (तनाव्यांनी) ही वर चढते; फांद्या अनेक व पाने साधी, वाटोळी, हस्ताकृती व अर्धवट विभागलेली व लवदार असतात; फुले पिवळी जर्द व लहान, एकलिंगी; वंध्य केसर तीन; किंजपुट उभट, किंजल्के तीन; कच्ची फळे हिरवी किंवा पांढरी व पक्व फळे गर्द नारिंगी, ५–१५ सेंमी. लांब व कडू असून फळांवर लहान मोठ्या पुटकुळ्या असतात; ती भाजीकरिता उपयुक्त असतात. कडवटपणा कमी करण्यास फोडी कढत पाण्यात अगर मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवतात व नंतर काढून शिजवितात. फळ थंड व पौष्टिक असून खाल्ल्यावर पचनक्रिया सुधारते; सांधे दुखी, प्लीहा (पांथरी), यकृत यांच्या विकारांवर गुणकारी; त्यात अ,ब आणि क ही जीवनसत्त्वे असतात.
कारले हे पावसाळी हंगामातील फळभाजीचे पीक आहे. बागायती जमिनीमध्ये १·५–२ मी. अंतरावर आळी करुन खत घालून बिया लावतात. तांबड्या भोपळ्याच्या पिकात मिश्रपीक म्हणून लावतात, स्वतंत्र पीक सहसा लावीत नाहीत. लागणीपासून दोनएक महिन्यांत फळे येऊ लागतात. वेल आळ्यात पुरलेल्या झाडांच्या फांद्यांवर चढविल्यास जोमात वाढतात व फळे जास्त येतात. पांढरी लांब आणि हिरवी तोकडी अशा दोन जाती आहेत. पांढरी लांब फळे येणाऱ्या जाती लोकप्रिय आहेत. कोवळी फळे तोडण्याचे काम दोन महिने चालते. हेक्टरमधून ४,०००–५,००० किग्रॅ. फळभाजी मिळते.
उत्तर भारतात उन्हाळ्यातील ‘जेठुया’ व पासाळ्यातील ‘बार-मासिया’ असे दोन प्रकार पिकवितात. बारमासिया प्रकार वर्षभर फळे देतो. दक्षिण भारतात निरनिराळे नऊ प्रकार लागवडीत आहेत.
कारले व काकडी यांच्यावर येणारे रोग आणि किडी सारख्याच आहेत.