मराठी परिभाषेत ‘संमती’ या शब्दाला अनुमोदन, रुकार, परवानगी असे अनेक समानार्थी शब्द आहेत; परंतु कायद्याच्या परिभाषेत या शब्दाच्या विविध छटा या शब्दाचा अर्थ सांगतीलच, असे नाही. कायद्याच्या परिभाषेत ‘संमती’ असण्याला खूप महत्त्व आहे. ‘संमती’ नसेल, तर त्यामुळे येणारी जबाबदारीही महत्त्वाची ठरते. संमती या शब्दाला विविध कायद्यांमध्ये विविध प्रकारांनी वापरले असून ‘संमती’ नसेल, तर त्याचे वेगवेगळे परिणाम दर्शविले आहेत. उदा., व्यक्तिगत कायद्यात (Personal Laws) वैध विवाहासाठी वधू आणि वराची संमती अत्यावश्यक असते. संमती नसेल, तर ज्याची संमती नसेल त्या व्यक्तीला (वधूला अथवा वराला) विवाह रद्दबातल ठरविता येतो. त्यासाठी न्यायालयात तसा अर्ज करावा लागतो. म्हणजेच संमती नसेल, तर विवाह न्यायालयाकडून अवैध घोषित करून विवाहबंधनातून मुक्त होता येते. तसेच परस्पर संमतीने विवाहित व्यक्ती घटस्फोटही घेऊ शकतात.

कराराच्या कायद्यातही संमती आवश्यक असते. या कायद्यानुसार नुसती ‘संमती’ नव्हे, तर ‘मुक्त संमती’ (Free Consent) आवश्यक असते. अशी मुक्त संमती नसेल, तर करार रद्दबातल ठरवता येतो. अर्थात तेव्हाही न्यायालयात अर्ज करून तसे घोषित करून घ्यावे लागते (Law of Contract).

भारतीय दंड विधान कायद्यात ‘संमती’ या शब्दाचा वापर करून एखाद्या कृतीला ‘गुन्हा’ मानला जात नाही. उदा., जेव्हा एखादा रोगी वैद्यकाकडे उपचारसाठी जातो, तेव्हा तो स्वसंमतीने त्याचे उपचार स्वीकारतो. त्या उपचारामुळे रोग्यास कोणतीही इजा झाली, तरी वैद्यकाला दोषी धरता येत नाही. अर्थात यामध्ये वैद्यकाचा कोणताही हलगर्जीपणा नाही, हे सिद्ध करावे लागते.

म्हणजेच एकदा एखाद्या गोष्टीसाठी आपण संमती दिली, तर त्या संमतीच्या अनुषंगाने होणाऱ्या परिणाम अथवा दुष्परिणामांची जबाबदारी संमती देणाऱ्याला स्वीकारावी लागते (Doctrine of Estoppels). कोणत्याही न्यायप्रविष्ट दिवाणी प्रकरणामध्ये वादी व प्रतिवादींना न्यायालयबाह्य समझौता दिवाणी कायद्याने मान्य केला आहे.

फौजदारी कायद्यानुसारही भारतीय दंड विधान संहितेतील काही विशिष्ट गुन्हे वगळता गुन्ह्याच्या बळीच्या संमतीने गुन्ह्याची शिक्षा कमी करता येते अथवा गुन्हा माफ करता येतो. अशा वेळी गुन्हेगाराची कारावासाची शिक्षा कमी अथवा रद्द करून त्याला दंड भरून शिक्षा भोगावी लागते.

संदर्भ :

                                                                                                                                          समीक्षक : दिनकर कांबळे