गस्ती,भीमराव : ( १० मे १९५० – ८ ऑगस्ट २०१८ ).कर्नाटक,महाराष्ट्र,आंध्र प्रदेशातील बेरड,रामोशी जमातीच्या विकासासाठी, वन्य जमाती,भटके विमुक्त,आदिवासी व समाजातील उपेक्षित देवदासींसाठी अथकपणे कार्य करणारे आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त, सेवाभावी कार्यकर्ते, लेखक.जन्म कर्नाटकातील बेळगावजवळील यमनापूरसारख्या डोंगराळ भागातील एका निरक्षर, गरीब, बेरड जमातीतील  कुटुंबात झाला. यमुनापूर येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले.त्यानंतर वडिलांच्या प्रोत्साहनामुळे दहावी पर्यंत शिक्षण झाल्यावर बी.एस्सी (इंजिनिअरिंग) करण्यासाठी ते आंध्र प्रदेशात गेले.

या पदवी परीक्षेत ते मागासवर्गीय विद्यार्थ्यांत विद्यापीठात सर्वप्रथम आले.नंतर उस्मानिया विद्यापीठातून ते एम्.एस्सी. झाले. १९७२ मध्ये त्यांना जैविक रसायनशास्त्रातील संशोधनासाठी इंडो-सोव्हिएट कल्चरल असोसिएशनची फेलोशिप मिळाली. मास्कोमध्ये (रशिया) दीडवर्षांचे संशोधन पूर्ण करून हैद्राबाद येथील C.S.I.R.च्या भूगर्भशास्त्र विभागात सहाय्यक म्हणून एक वर्ष काम केले; मात्र  हैद्राबादमधील चांगली नोकरी सोडून ते समाजकार्याकडे वळले.

बेळगावातील सीमाभागातील बेरड समाजाच्या सान्निध्यात आलेले अनुभव, त्या समाजाचे जीवन याविषयी त्यांनी साधना, दैनिक सकाळ,तरुण भारत (बेळगाव), दैनिक लोकमत इ. ठिकाणी लेख, कथा लिहिल्याने त्यांच्या कार्याचा आणि बेरड जमातीच्या दयनीय अवस्थेचा परिचय सामान्य माणसाला झाला. रणझुंजार दैनिकात सतत चार वर्षे त्यांनी बेरड समाजाविषयी लेखन केले त्यानंतर बेरड (१९८७ ) हे त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध झाले.आक्रोश (आत्मकथन),सांजवारा (२००२) कौरव (कादंबरी) तसेच क्रांतिवीर उमाजी नाईकएक राष्ट्र पुरुष ही त्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. आक्रोश हे बेरड समाजाविषयी त्यांनी चालविलेल्या चळवळीचे स्वकथन आहे.इतर आयुष्यात आलेले बेरड जमातीचे वास्तव अनुभव कथारूपात त्यांनी सांजवारा (२००२) मध्ये लिहिले आहेत.

बेळगावच्या सीमाभागातील यमनापूर परिसरात बेरड समाज मोठ्या संख्येने राहतो. सामाजिक, आर्थिकदृष्ट्या हा समाज मागासलेला आहे. पोलिसांचा ससेमिरा सतत मागे लागल्याने गुन्हेगारीचे जीवन जगावे लागणार, तेव्हा या लोकांना त्यांच्या चुका दाखवून, सरळ मार्गावर आणायचे, त्यांचे प्रश्न जाणून घेऊन, त्यांची प्रगती साधावी, जागृती निर्माण करून त्यांना संघटित करावे या उद्देशाने गस्तींनी  १९७४ मध्ये बेरड-रामोशी सेवा संघाची स्थापना केली. बेरड-रामोशी मुक्ती लढ्यासारखे अनेक कार्यक्रम यासाठी हाती घेतले.याच काळात यमुनापूर येथे इंडाल कंपनीचा ॲल्युमिनिअम कारखाना सुरू झाला. या कारखान्यासाठी बेरड लोकांच्या जमिनी, अल्पदराने, खोटे-नाटे सांगून खरेदी करण्यात आल्या होत्या. या कारखानाग्रस्त शेतकऱ्यांची संघर्ष समिती १९७४ मध्ये गस्तींनी स्थापन केली आणि कंपनीविरूद्ध लढा दिला. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिली. यमुनापूर, मुत्तेनहट्टी, बसवानकोळ येथील अनेक युवकांना इंडालमध्ये नोकरीची संधी मिळवून दिली. जगण्याचे साधन मिळावे व पोलिसांचा त्रास कमी व्हावा या मागण्यांसाठी १९८२ मध्ये दड्डी येथे झालेल्या मेळाव्याला दहा हजार बेरड जमले होते. सरकार दरबारी याची दखल घेतली गेली आणि चंदगड तालुक्यातील चारशे कुटुंबांना जंगल खात्याची सतराशे एकर पडीक जमीन मिळाली.

१९९० मध्ये त्यांनी उत्थान संस्थेची स्थापना केली. उपेक्षितांना स्वावलंबी बनविणारी, त्यांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आदर्श संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. उत्थानच्या कार्याच्या निमित्ताने बेळगाव हुक्केरी, चंदगड, गोकाक इ. भागात फिरत असताना, निराधार देवदासींच्या प्रथेविरुद्ध कार्य केले. उत्थान संस्थेच्या माध्यमातून महिलांना हस्तकला, शिवणकलेचे प्रशिक्षण देऊन स्वत: च्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली.

त्यांच्या  कार्याची दखल घेऊन त्यांना अरुण लिमये पुरस्कार (१९८९), मुंबई मराठी साहित्य संघातर्फे बा.सी.मर्ढेकर साहित्य पुरस्कार, (१९९०) कर्नाटक राज्य साहित्य पुरस्कार (१९९०), महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार (१९९०), समता साहित्य पुरस्कार,बेळगाव (१९९१),  नातू फौंडेशन पुरस्कार, पुणे (१९९२), फाय फाउंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार (१९९४), सेवासदन संस्थेचा देवधर पुरस्कार(१९९५), लोकमान्य सेवा संघ(१९९९), आगरकर पुरस्कार, पार्ले, संत गाडगेबाबा पुरस्कार आणि  रेडक्रॉस सोसायटीचा एलिझाबेथ विल्यम पुरस्कार,महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले .महाराष्ट्र सरकारने त्यांची भटक्या-विमुक्त जमातीच्या अभ्यास समितीवर निवड केली होती.

कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.