माधव, हर्षदेव : (जन्म. २० ऑक्टोबर १९५४). भारतीय साहित्यातील आधुनिक संस्कृत कवी. नाटक, समीक्षण आणि संपादन कार्यातही त्याचे विपुल योगदान आहे. पारंपरिक आणि रुढ संस्कृत आणि पाश्चात्य काव्यप्रकारांद्वारा त्यांनी त्यांच्या काव्यातून आधुनिक संवेदनशिलता व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांची संस्कृत कविता ही भाषा, निवेदन आणि संस्कृती या संदर्भात लक्षणीय आहे. त्यांचा जन्म गुजरात मधील भावनगर येथे एका गुजराती कुटुंबात झाला. आई-वडील यांच्या शैक्षणिक संस्कारात मोठे झालेले हर्षदेव माधव यांनी एम.ए.पीएच.डी.पर्यंत शिक्षण घेऊन १९९० पासून संस्कृत विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या संशोधनाचा संशोधनाचा विषय हा वैदिक साहित्य यासंदर्भात आहे.
कविता, कथा, कादंबरी व अनुवाद या चारही साहित्य प्रांतात हर्षदेव माधव यांनी महत्त्वपूर्ण लेखन केले आहे. रथ्यासु जम्बूवर्णाना शिराणाम (१९८५),अलकनन्दा (१९९०), मृगया (१९९४), शब्दाना निर्मक्षकेषु ध्वसावशेषेषु (१९९३), लावारसदिग्धा स्वप्नमयः पर्वता (१९९६), बृहन्नला, निष्क्रान्ता सर्वे (१९९७), पुरा यत्र स्त्रोत: (१९९८), मृत्युशतकम (१९९९ ), कालोस्मि (१९९९), भाति से भारतम हे निवडक संस्कृत काव्यसंग्रह; मृत्यस्य कस्तुरीमृगोस्ति(१९९८),कल्पवृक्ष ही नाटके; महाकवी माघ,संस्कृत समकालीन कविता, नखाना पण्डित्यम, नखचिन्ह, नखदर्पण हे समीक्षाग्रंथ आणि याशिवाय संस्कृत शालेय पाठ्यपुस्तके आणि अनुवादकार्य असे विपुल लेखनकार्य हर्षदेव माधव यांनी केले आहे.
त्यांच्या काव्यामध्ये उदारता व नवनिर्मितीचा एक अभूतपूर्व संयोग आपणास पहावयास मिळतो. आधुनिक संस्कृत काव्यामध्ये मोलाची भर घालणारे त्यांचे काव्य समाज वास्तवाला उजागर करणाऱ्या कल्पकतेची ओळख देणारे आहे. भाषा, संस्कृती, मानवी जीवन, धर्म, श्रद्धा या सर्व प्रतीकांचा वापर करून समकालीन जीवनातील निराशा त्यांनी त्यांच्या कवितेतून मांडली आहे. निवेदनाच्या संदर्भात त्यांची कविता वैशिष्ट्यपूर्ण आहे. लेखनासाठी संस्कृत ही अभिजात भाषा, पारंपारिक छंदोरचना, त्याचबरोबर हायकु, तान्का, सिझो, मोनाईमेज ह्या जपानी-कोरियन काव्यप्रकारांचा वापर इत्यादी वैशिष्ट्यांनी त्यांची कविता युक्त आहे. संस्कृत काव्याचे आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण ही बाब त्यांनी त्यांच्या कवितेतून साध्य केली आहे.
त्यांच्या साहित्य कार्याची दखल घेवून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये कविलोक शिशुकाव्य पुरस्कार (१९८०), कल्पवल्ली पुरस्कार, कोलकाता (१९९०), रामकृष्णन संस्कृत अवार्ड (१९९८), अखिल भारतीय संस्कृत पुरस्कार (२००१), साहित्य अकादमी पुरस्कार (२००६) या पुरस्कारांचा समावेश होतो.
संदर्भ : http://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/harshdev_madhav.pdf